‘मी धोनी किंवा गेल नाही’, टायमिंगवर लक्ष देतो – रोहित शर्मा

क्रीडा

भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने श्रीलंकेविरुद्ध दुस-या वन डेत नाबाद २०८ धावांची शानदार खेळी करीत काल तीन द्विशतके ठोकणारा एकमेव क्रिकेटपटू होण्याचा मान मिळविला आहे.

नवी दिल्ली : भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने श्रीलंकेविरुद्ध दुस-या वन डेत नाबाद २०८ धावांची शानदार खेळी करीत काल तीन द्विशतके ठोकणारा एकमेव क्रिकेटपटू होण्याचा मान मिळविला आहे.
विराट कोहलीने लग्नासाठी विश्रांती घेताच काळजीवाहू कर्णधार अशी जबाबदारी स्वीकारणाºया रोहितने सामन्यानंतर बीसीसीआय टीव्हीला मुलाखत दिली.
संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री यांनी ही मुलाखत घेतल्याचा व्हिडीओ पुढे आला आहे.
तीनपैकी या द्विशतकाचे महत्त्व कसे विशद करशील, असा शास्त्री यांनी सवाल करताच ३० वर्षांचा रोहित म्हणाला, ‘माझ्या मते कुठलेही एक द्विशतक अप्रतिम ठरविणे योग्य नाही. तिन्ही द्विशतके माझ्यासाठी विशेष आहेत. प्रत्येक द्विशतक मी अतिशय कठीण परिस्थितीत ठोकले आहे. २०१३ मध्ये मी आॅस्ट्रेलियाविरुद्ध केलेली २०९ धावांची खेळी मालिकेत निर्णायक ठरली. लंकेविरुद्ध २०१४ मध्ये २६४ धावा करण्याआधी तीन महिने मी सतत जखमेशी झुंज देत होतो. मैदानात येण्याआधी धावा काढू शकेन का, असा विचार सारखा डोक्यात घोंगावत होता.’
मोहालीत मैदानावर स्थिरावण्यास मी प्राधान्य दिले. जितका वेळ फलंदाजी करू शकेन तितके थांबायचे आहे, हाच विचार पुढे ठेवून मैदानात आलो होतो. खेळपट्टी आणि आऊटफिल्ड चांगले आहे, याचा वेध आधीच घेतला होता. आल्या आल्या तुटून पडायला मी काही महेंद्रसिंग धोनी किंवा ख्रिस गेल नाही. हळूहळू सुरुवात केल्यानंतर चेंडूवर नियंत्रण मिळवीत मोठे फटके मारायचे, या डावपेचानुसार खेळलो आणि यशस्वी झालो. फटकेबाजीचे टायमिंग किती अचूक असावे, यावर माझा सारखा भर असतो. कालच्या खेळीत टायमिंग हेच महत्त्वाचे ठरल्याचे रोहितने सांगितले. (वृत्तसंस्था)

‘‘ आमचे ट्रेनर शंकर बासू सरांचा आभारी आहे. ते आमच्यासोबत कठोर मेहनत घेत आहेत. माझी ताकद योग्य टायमिंग आहे. माझ्याकडे खूप काही पॉवर नाही. मी महेंद्रसिंग धोनी वा ख्रिस गेलही नाही. पण टायमिंगवर अधिक भर असल्याने यश मिळते. कालच्या द्विशतकी खेळीत मी हेच केले.’’ – रोहित शर्मा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *