Breaking

पाचोरा येथे लाभार्थी वयोवृध्दांची हेळसांड पाचोरा तहसील मधील प्रकार

0

पाचोरा येथील तहसील कार्यालयात हयातीचे दाखले सादर करण्यासाठी येणाऱ्या लाभार्थी वृद्धांची अक्षरश: हेळसांड होत असून यंत्रणेतील संबंधित कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे वृद्धांचा प्रचंड अवमानही होत आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्रस्त वृध्दांकडून व्यक्त होत आहे.
पाचोरा तहसील कार्यालया मार्फत केंद्र व राज्य शासनाच्या विविध लाभार्थी योजनांचा लाभ दिला जातो. त्यात श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, इंदिरा गांधी अपंग योजना अशा योजनांचा समावेश आहे .पाचोरा तहसील अंतर्गत 17 हजार 878 लाभार्थी या योजनांचा लाभ घेत असून धर्मः मिळणारे 600 ते 1000 रुपये अनुदानाचा हा लाभ कायम ठेवण्यासाठी लाभार्थी वृद्धांना नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान आपल्या हयातीचा दाखला सादर करावा लागतो. हे दाखले सादर करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून तहसील कार्यालयात वृद्धांच्या अक्षरश: रांगा लागल्या आहेत. या वृद्धांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे अनेकांना चक्करही येतो .तर काही रांगेत उभे असतांना पडतात देखील. या वृद्धांना बसण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही अथवा पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नाही. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात या वृद्धांना टोकन क्रमांक देऊन आरामात बसू देणे योग्य असताना त्यांना अडचणीच्या जागेत प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत रांगेत तासनतास उभे ठेवले जाते. तरीदेखील किरकोळ लाभासाठी हे निराधार वृद्ध अनेक संकटांचा सामना करत रांगेत उभे राहतात.
प्रत्येक शाळा, महाविद्यालय व शासकीय कार्यालयात अपंग व वृद्धांसाठी रेम्प बंधनकारक असताना पाचोरा तहसील कार्यालयाला मात्र याबाबत अजूनही जाग आलेली नाही त्यामुळे येथे रॅम्पची व्यवस्था नाही. तासनतास रांगेत उभे असणाऱ्या वयोवृद्धांना येथे साधे पिण्याचे पाणीही मिळत नाही. त्यामुळेच समाज मनातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात हे हयातीचे दाखले घेण्यासाठी 2 ते 3 कर्मचारी कार्यरत आहेत. आपले दाखले सादर करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील वृद्ध सकाळी 7 वाजेपासून येथे गर्दी करतात परंतु संबंधित कार्यालयातील कर्मचारी मात्र सकाळी कार्यालय उशिरा उघडतात व सायंकाळी मात्र वेळेवर कामकाज बंद करतात .पुन्हा वेळोवेळी पाणी पिण्यासाठी व नैसर्गिक विधीसाठी कामकाज बंद करतात .त्यामुळे वृद्धांना जास्त वेळ ताटकळत थांबावे लागते. मंगळवार ता 10. रोजी तर या कर्मचाऱ्यांच्या मनमानीने कळसच गाठला. दुपारी दिड -दोनच्या सुमारास या कार्यालयातील एक कर्मचारी कामानिमित्त बाहेर गेला. दुसऱ्या कर्मचाऱ्याने देखील थोडयावेळाने कार्यालयातील वयोवृद्धांना कार्यालयाबाहेर काढून दरवाज्याला अक्षरशः कुलूप लावून कार्यालय बंद केले .हे दोघे कर्मचारी कुठे गेले ? हा संशोधनाचा विषय आहे. एका कर्मचाऱ्याकडे जेवणाचा कार्यक्रम असल्याने हे दोघे कर्मचारी बेकायदेशीररित्या वयोवृद्धांना ताटकळत उभे ठेवत कार्यालय बंद करून निघून गेले अशी चर्चा या ठिकाणी दबक्या आवाजात होती. सुमारे तासाभरानंतर कार्यालयाचा दरवाजा उघडून कामकाज सुरू करण्यात आले. कर्मचार्‍यांच्या मनमानीमुळे उपस्थित वृध्दांमधून संतप्त भावना व्यक्त झाल्या.
या गंभीर प्रकाराची प्रांताधिकारी व तहसीलदारांनी गंभीर दखल घ्यावी व कर्मचार्‍यांच्या मनमानीला लगाम घालून लाभार्थी वयोवृद्धांना न्याय मिळवून द्यावा .अशी मागणी होत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here