Breaking

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या
पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक

0

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 20 – शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM-KISAN) लाभ यापुढे आधार क्रमांकास जोडलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यानुसार ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न नसेल अशा लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाती आधार संलग्न करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. बँक खाते आधार क्रमांकास संलग्न करणेसाठी लाभार्थ्यांनी व्यक्तीश: संबंधित बँकेत जावून स्वत:चे बँक खाते आधार संलग्न करुन घ्यावे.
तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले असून त्याशिवाय लाभार्थ्याला शासनाकडून या योजनेचा पुढील हप्ता वितरीत होणार नाही. ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही ई-केवायसी प्रमाणीकरण केले नाही त्यांना पीएम किसान पोर्टलच्या https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावर Farmer Corner मधील ई-केवायसी या टॅबमधून ओटीपीद्वारे स्वतः ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल. तसेच लाभार्थ्यांना ग्राहक सेवा केंद्रावरुन (CSC) बायोमॅट्रिक पध्दतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र (CSC) केंद्रावर बायोमॅट्रिक पध्दतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रमाणीकरण शुल्क दर 15/- रु. मात्र निश्चित करण्यात आला आहे.
तरी जळगाव जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न करणे बाकी असेल अशा लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधारशी संलग्न करुन ई-केवायसी प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here