Breaking

मराठी भाषेचा इतिहास गौरवशाली – डॉ.अक्षय घोरपडे

0

सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्यात आला. मराठी विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात जामनेर महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच कवी-समीक्षक डॉ. अक्षय घोरपडे हे प्रमुख वक्ते म्हणून झूम मिटींगच्या माध्यमातून ऑनलाईन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.एन. गायकवाड होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

याप्रसंगी बोलताना डॉ. अक्षय घोरपडे म्हणाले की, मराठी भाषा ही प्राचीन आहे. तिचा इतिहास फार गौरवशाली आहे. महानुभाव संप्रदायातील विद्वान म्हाइंभट यांनी लीळाचरित्र हा पहिला मराठी गद्यग्रंथ लिहिला तर वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी हा पहिला पद्यग्रंथ लिहिला. त्यानंतर अनेक संतांच्या आणि विद्वान यांच्या लेखणीने मराठी भाषेची सेवा केली आहे. मराठी ही भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने बोलली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे तर जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. अनेक बोलीभाषा यांनी मिळून मराठी भाषा बनली आहे. त्या बोलींनीच मराठी समृद्ध केलेली आहे. त्यामुळे या बोली आपण प्राणपणाने जपल्या पाहिजे. जेव्हा जेव्हा मराठीच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा तेव्हा जोपर्यंत या पृथ्वीतलावर मराठी माणूस जिवंत आहे तोपर्यंत मराठी भाषेचे अस्तित्व चिरकाल आहे, असे म्हणावे वाटते. महाराष्ट्र ही संतांची आणि समाजसुधारकांची भूमी आहे. त्यांनी आपल्या लेखणी, वाणी आणि कृतीतून पुरोगामी महाराष्ट्र घडविला आहे. या मातीत मराठी भाषेतून सर्वधर्मसमभावाचा विचार रुजला आहे. महाराष्ट्र आणि मराठी भाषा हे कधीही न बदलणारे समीकरण आहे. आपण आपल्या या भाषेचा सार्थ अभिमान बाळगला पाहिजे आणि तिच्यासाठी जे जे शक्य आहे ते ते सर्व केले पाहिजे. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एन.एन. गायकवाड यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. एल.जी. कांबळे, प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा.ए.एन. भंगाळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.जी. शेलार, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. दिनेश तांदळे, प्रा.शिवाजी पाटील यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी झूम मीटिंगद्वारे या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात ऑनलाईन उपस्थिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख यांनी केले तर आभारप्रदर्शन भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. दीपक मराठे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. एस. भालेराव व वाणिज्य विभागप्रमुख डॉ.सचिन हडोळतीकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here