Breaking

खोटा अँटीजन टेस्ट रिपोर्ट दाखवून खरेदी-विक्री व्यवहार *(Dhyeya Special News) मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या चौकशी अहवाला नंतर रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

पाचोरा – येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी येणाऱ्या अभ्यागतांना कोरोना विषयक अँटीजन रिपोर्ट अनिवार्य करण्यात आला आहे. पाचोरा दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात खोटा कोरोना निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट बनवून देणारी टोळी कार्यरत आहे. पाचोरा नगरपरिषदेने याबाबत चौकशी सुरू केलेली असून लवकरच बनावट कोरोना अँटिजेन रिपोर्ट देणाऱ्या टोळीचा खरा चेहरा जनतेसमोर येणार आहे.

एक महिन्यापूर्वीच लाच लुचपत विभागाचा सापळा यशस्वी झाल्यानंतर पाचोरा येथील दुय्यम निबंधक कार्यालयाची राज्यभरात नाचक्की झाली होती. मात्र पैशाचा हव्यास भल्याभल्यांना पुन्हा पुन्हा बेकायदेशीर कृत्य करायला भाग पाडतो. पाचोरा खरेदी – विक्री (दुय्यम निबंधक) कार्यालयात नगर परिषदेद्वारा करण्यात येणाऱ्या अँटीजेन टेस्टचे खोटे रिपोर्ट सादर करून खरेदी विक्री व्यवहार केले जात आहेत. या नव्या प्रकरणाची सखोल व पुराव्या निशी माहिती पाचोरा नगर परिषद मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांना प्राप्त झाली आहे. याप्रकरणी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर मॅडम यांनी तहसीलदार श्री कैलास चावडे यांचेशी बंद द्वार चर्चा करून मार्गदर्शन घेतले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या बैठकीस पालिका उपमुख्याधिकारी प्रकाश भोसले, दुययम निबंधक श्री गांगोडे उपस्थित असल्याचे कळते.

याप्रकरणी तालुका प्रशासन यंत्रणा व नगरपालिका प्रशासनाला अँटिजेन टेस्ट रिपोर्ट स्लिप मध्ये घोटाळा होत असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले आहे. प्रशासनाने संयुक्तरीत्या मागील काही दिवसांपासून च्या व्यवहारांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. या हालचालीची कुणकुण महसूल कार्यालय परिसरात लागल्याने संबंधित खोटे अँटिजेन टेस्ट रिपोर्ट देणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहे.

खोटा अँटीजेन टेस्ट रिपोर्ट प्रकरणी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी तातडीने दखल घेऊन नगरपालिके द्वारा हुतात्मा स्मारकात करण्यात आलेल्या मागील एक महिनाभराच्या याद्यांची साक्षांकित झेरॉक्स प्रत ताब्यात घेणे गरजेचे आहे. याप्रकरणी उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे साहेब काय दखल घेतात याकडे लक्ष लागून आहे.

तर कोण-कोण असतील दोषी?

कोरोना साथीचा महाभयंकर आजार सुरू असताना शासनाचे निर्देश मोडून खरेदी विक्री व्यवहार करणे प्रचलित कायद्यानुसार व साथरोग कायद्यानुसार गंभीर गुन्हा मानला जाणार आहे. कोरोना आजारास संबंधित खोटे निगेटिव्ह एंटीजेन टेस्ट रिपोर्ट शासन दप्तरी आढळून आले तर खालील प्रमाणे संशयितांवर कारवाई होऊ शकते

  • खोटा टेस्ट रिपोर्ट देणारा अभ्यागत
  • खोटा टेस्ट रिपोर्ट देणारा वेंडर
  • खोटा टेस्ट रिपोर्ट बनवणारा पंटर
  • नगरपालिकेचा खोटा शिक्का बनवणारा रबर स्टॅम्प मेकर
  • खोटा टेस्ट रिपोर्ट असूनही कागदपत्रांची पडताळणी करताना सहेतुक दुर्लक्ष करणारा कार्यालयीन कर्मचारी
  • खोटा अँटीजेन टेस्ट रिपोर्ट असल्याचे निदर्शनास आल्यावरही इतर निरोगी जनतेच्या आरोग्याशी खेळणारा त्या कार्यालयाचा जबाबदार अधिकारी.

याशिवाय येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील अनेक किस्से चर्चेत आहेत. त्यात विशेषतः वकील व वेंडर लोकांना दुय्यम स्थान देऊन पंटंरांना प्राधान्य देणे, पंटर मैत्री ठेवणे, अधिकृत टोकण याव्यतिरिक्त इतर व्यवहारांना प्राधान्य देणे यादेखील बाबी महत्वपुर्ण आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here