Breaking

मनमानी वसुली व वीज तोडणी केली तर याद राखा- आ.किशोरआप्पा पाटील

0
440

पाचोरा – पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून शासनाच्या धोरणाची पायमल्ली करून वीज वितरण कडून सुरू असलेली वीज बिलाची मनमानी वसुली व वीज बिल न भरल्यास संपूर्ण विद्युत जनित्राचा खंडित केला जाणारा पुरवठा हा प्रकार बंद केला नाही तर याद राखा अशी तंबी आमदार किशोर पाटील यांनी वीज वितरणच्या अभियंत्यांना देऊन 5 जून पर्यंतचा अल्टिमेटम दिला व वीज वितरण आपली भूमिका न बदलल्यास 6 जून पासून हल्लाबोल आंदोलन करत वीज वितरणच्या अभियंत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही व कार्यालयात खुर्चीतही बसू देणार नाही असा इशारा आमदार किशोर पाटील यांनी दिला.


आमदार किशोर पाटील यांनी शिवालय या आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली त्यात स्पष्ट केले की, पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून दररोज वीज वितरणच्या मनमानी व हुकूमशाही कामकाजा संदर्भात तक्रारी प्राप्त होत आहेत. त्या तक्रारीच्या आधारे विज वितरणच्या वरिष्ठ अभियंत्यांची बैठक घेऊन त्यांना शासनाने दिलेले निर्देश व वीज वितरण कडून त्याची होणारी पायमल्ली, शेतकऱ्यांवर केला जाणारा जाणीवपूर्वक अन्याय यासंदर्भात कान उघाडणी करत शॉक दिला.

संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना जाब विचारला असता त्यांनी वरती विचारावे लागेल अशी उत्तरे दिली. वरती म्हणजे नेमके काय ? हा वरचा नेमका कोण ? ते कळू द्या असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला. त्यांनी स्पष्ट केले की ,राज्य शासनाने 4 महिन्यापूर्वी निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे थकीत विज बिल मुद्दल मध्ये 50 टक्के माफ करून 50 टक्के वसुली 2022 पर्यंत करण्याचे निर्देश दिले आहेत. 50 टक्के वीज बिल वसुलीतील 35 टक्के ग्रामपंचायतीकडे, 35 टक्के तालुका वीज वितरण कडे तर 30 टक्के नियोजन मंडळाकडे निधी जमा करण्याचे आदेश आहेत. तसेच सदरचा निधी त्याच तालुक्यासाठी खर्च करावा असेही शासनाने सूचित केले आहे. असे असताना वीज वितरण कडून 50 टक्के थकीत बिलाची वसुली न करता चालू जादा बिल देऊन त्याची मनमानी व सक्तीने वसुली करीत आहे.

एप्रिल महिन्यात बहुतांश जणांनी कमी-जास्त प्रमाणात वीज बिलाची रक्कम भरली आहे. शासनाच्या आदेशानुसार 2022 पर्यंत वसुली करावयाचे असताना वीज वितरण कडून ट्रांसफार्मरचा वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. सध्या शेती कामाचे दिवस आहेत. मे लागवडीत शेतकरी गुंतला आहे. खरिपाची मशागत सुरू आहे. अशा परिस्थितीत वीज वितरण कडून होणारा छळ शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. ट्रांसफार्मर जळाला, केबल जळाली, ऑईल संपले, पोल तुटला, तारा तुटल्या अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्यास अगोदर बिल भरा नंतर कामे होतील अशी मनमानी केली जात आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. भाजीपाला, अन्नधान्य उत्पादनाचे तीन-तेरा होऊन शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत .आता खते, बी-बियाणे ,मशागत यासाठी शेतकऱ्यांना पैसा आवश्यक असताना वीज वितरण कडून मात्र ब्लॅकमेलिंग केली जात आहे .कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता यांचेकडून देखील शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. प्रथम बिले भरा असे सांगितले जाते.

काही शेतकऱ्यांना तर रिडींग न घेता बिले दिली जातात. अंदाजे आकारणी केली जाते. मीटरचे रिडींग कसे व केव्हा घेतात ? हेही कळत नाही. सरसकट वसुलीचे मनमानी धोरण राबविले जात आहे. शेतकऱ्यांना बिल भरण्याची मुदतही दिली जात नाही .
विशेष म्हणजे संपूर्ण ट्रांसफार्मरचा वीजपुरवठा बंद करून ज्यांनी बिल भरले आहे त्यांनाही वेठीस धरण्याचा संतापजनक प्रकार वीज वितरण करत आहे .यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी पंपाचे वीज बिल देताना रिडींग न घेता दिले जाते. त्या शेतकऱ्याचा वापर किती ? त्याच्या विहिरीला पाणी आहे की नाही ? वीज किती वेळ दिली जाते ? याचा योग्य तो खुलासा वीज वितरणने द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केल्यास त्या शेतकऱ्यावर जास्त अन्याय केला जातो.
50 टक्के थकित बिल वसुलीच्या नावाखाली नको ते प्रकार वीज वितरण तर्फे केले जात आहेत. हा प्रकार अन्यायकारक असून शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून तो सहन केला जाणार नाही .वीज वितरणने 5 जून पर्यंत आपले हे धोरण बदलावे. यात बदल न झाल्यास 6 जून पासून वीज वितरण अभियंते व कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन हाती घेऊ .त्यासंदर्भात कितीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही. अभियंते व अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही व कार्यालयात खुर्चीतही बसू देणार नाही. सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो तरी शेतकऱ्यांवर राजरोसपणे केला जाणारा अन्याय सहन करणार नाही. 6 जून नंतरच्या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी वीज वितरणचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता यांचीच राहील. याबाबत मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, पालकमंत्री यांनाही निवेदने दिली असून शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये .वीज वितरणच्या मनमानी धोरणामुळे होणाऱ्या संपूर्ण नुकसानीची जबाबदारी वीज वितरणची असून त्यांच्याकडून ती वसुली करू असा दिलासाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. आमदारांकडून वीज वितरण अभियंत्यांना देण्यात आलेला हा शॉक त्यांना कितपत वठणीवर आणतो व 6 जून पासून हल्लाबोल कशा पद्धतीने हल्लाबोल होते.याकडे तालुका वासियांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here