Breaking

वृद्ध शेतकऱ्याच्या उताऱ्यावर कर्जाची नोंद, विहीर व वीजपंप उताऱ्यावरून गायब
( महसूल विभागाचा अफलातून प्रताप )

0

पाचोरा – येथील 84 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने कोणत्याही स्वरूपाचे कर्ज घेतलेले नसतांना त्यांच्या सातबारा उताऱ्यावर दोन लाख रुपये कर्जाची नोंद करून व नंतर ती नोंद काढून उताऱ्यावरील शेतातील विहीर व वीज पंपाची नोंद गायब करण्याचा अफलातून प्रताप येथील महसूल विभागाने केला असून वृद्ध शेतकऱ्याने याबाबत माहिती अधिकारात माहिती मागीतली तरी देखील त्यांना माहिती न देऊन त्यांचा मानसिक छळ केला जात असल्याची व्यथा नारायण जगताप या शेतकऱ्याने मांडली आहे .


पाचोरा येथील कोंडवाडा गल्लीत राहणाऱ्या नारायण जगताप (वय 84) यांची सारोळा बुद्रुक (ता पाचोरा) शिवारात गट नंबर 97 मध्ये शेत जमीन आहे. त्यांच्या शेत जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर सारोळा बु॥. वि का सोसायटीचा 2 लाख रुपये कर्जाचा बोजा असल्याची नोंद तलाठ्याकडून करण्यात आली. त्याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सदरची नोंद व बोजा कोणी बसवला? कोणत्या बँकेचे कर्ज, कोणत्या तारखेचा घेतले ?याबाबतच्या कागदपत्रांची मागणी जगताप यांनी जून 2020 मध्ये तहसीलदारांकडे केली. परंतु त्याबाबत कोणताही खुलासा आजपावेतो करण्यात आलेला नाही. सातबारा उताऱ्यावरील 2 लाख रुपये कर्जाचा बोजा कमी करा असा कोणताही अर्ज श्री.जगताप यांनी दिलेला नाही. परंतु जानेवारी 2021 मध्ये सदरचा कर्जाचा बोजा कमी करण्यात आला व सातबारा उताऱ्या वरून शेतातील विहीर व त्यावरील वीजपंप याबाबतची नोंद गायब केली. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचा मनस्ताप वाढला असून त्यांनी याबाबत माहिती अधिकाराद्वारे तहसीलदार व सारोळा बुद्रुकचे तलाठी यांना माहिती अधिकारात अर्ज देऊन सातबारा उताऱ्यावरील 2 लाख रुपये कर्जाचा बोजा कमी कसा झाला? सदरची रक्कम कोणी, कोणत्या बँकेत भरली ? तसेच सातबारा उताऱ्यावरील शेतातील विहीर व त्यावरील वीज पंप याबाबतची नोंद कोणी व का रद्द केली? याबाबतची माहिती मागण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा अर्जही घेण्यात येत नसल्याची व्यथा जगताप यांनी मांडली असून महसूल विभागाच्या या अफलातून प्रतापामुळे मानसिक छळ व मनस्ताप वाढला असून याबाबत योग्य ती चौकशी कार्यवाही होऊन न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा श्री. जगताप यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here