Breaking

वाढदिवस विशेष पाचोरा शिवसेनेच्या पाया उभारणीत मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांचा सिंहाचा वाटा & माझ्यावर असलेले वैयक्तीक उपकार
संदीप महाजन

0

पाचोरा- आज 22 ऑगष्ट माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा वाढदिवस.! या निमित्त आज पर्यंत निवडणुक काळ असो की, त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त विशेष पुरवणी असो ... आजपर्यंत त्यांचे अनुभव व पैलु उलगडत असतांना त्यांच्या बाल, शालेय, महाविद्यालयीन तसेच राजकीय जीवनातील अनुभव- व्यक्तिमत्वाचे पैलु मांडण्यात आले. परंतु

आज मी पाचोरा *"शिवसेना पाया उभारणीत दिलीपभाऊ वाघ यांचा सिंहाचा वाटा"*- हे शिर्षक दिल्यानंतर अनेकांचा विश्वास बसला नसेल.

परंतु ... हो वास्तव आणि कटु सत्य तसेच काही लोक याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत.

पाचोरा शहर व परीसरात 83-84 च्या काळात कट्टर हिंदुत्ववादी जहाल विचाराची समजल्या जाणाऱ्या पतीत पावन संघटनेचा जोरदार झंझावात सुरु होता.पतीत पावन संघटनेचा सभासद ही ओळख म्हणजे एका कानात चांदीची बाळी असायची. ती बाळी तयार करण्याची देखील त्यावेळी कोणाची हिंम्मत नव्हती. कट्टर युवक कानात ती बाळी घालून सक्रिय असत.पाचोऱ्यात त्यावेळी म्हणजे हल्लीची साहेबरावआबा गजमल बॅक जवळ पुर्वी कोपऱ्यावर एक टपरी होती, त्याचे प्रोप्रा. शशिकांत सोनार हेच त्यावेळी एकमेव काम करीत असत. गांधी चौक भागातील तात्कालीन धाडीवाल किराणा दुकाना समोरील रहीवाशी त्यावेळी राजु बावीस्कर & परिवार यांच्याकडे नांद्रा येथील बाबा यांचे सेवेकरी या अध्यात्माच्या ओळखीच्या निमीत्ताने मालेगावस्थित भिमादादा गवळी यांचे येणे-जाणे होते. अनेकवेळा पोलीस कारवाईच्या वेळी भिमादादांनी पाचोरा परिसराचा आश्रय देखील घेतला होता. कारणही तसेच होते. कारण त्याकाळात पुण्या नंतर धुळे- मालेगाव शहर हे पतीत पावन संघटनेच्या मुख्य हालचालीचे केंद्र बिंदु होते. किंबहुना त्यावेळी मालेगावस्थित भिमादादा गवळी सारख्या जहाल हिंदुत्ववादी व्यक्तीचे एकछत्री नेतृत्व नासीक विभागाला लाभले होते. तर पाचोऱ्यात त्यावेळी पतीत पावन संघटनेत सुनिल शिंदे, विलास भावसार, भिकन लायन, अशोक कुऱ्हाडकर यांच्या सारख्या व्यक्तीचे संघटनासाठी नेतृत्व लाभले होते. परंतु पोलीस प्रशासनाचा त्रास देखील तेवढाच होता. पतित पावन संघटनेत दाखल होणे म्हणजे घराच्या उंबरठ्यावर तुळशीपत्र ठेवणे व बाहेर पडणे असे वातावरण त्याकाळी होते. याच काळात शिवसेनेने 100% समाजकारणसह जय महाराष्ट्रचा नारा देत मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हक्क सांगत मुंबईवर एकतर्फी राज्य निर्माण केले. त्यामुळे आपसुकच शिवसेनेचे संघटनचे वारे गावोगावी पसरत गेले.

आज अनेक वेळा पाचोऱ्यात पुला खालचे शिवसैनीक अशी पुष्टी जोडत निष्ठेचा आव आणला जातो,परंतु त्यांना हे माहीत नसावे ज्यावेळी पाचोरा शहरात शिवसेनेची स्थापना देखील नव्हती तेव्हा पाचोरा तालुक्यात वडगाव टेक ( बापु कुमावत, दुधवाले) , सावखेडा नथ्थुभाऊ, कुऱ्हाड येथील सुभाष चव्हाण & अरुणभाऊ पाटील येथील शिवसेना शाखा सक्रीय होत्या. तर पाचोरा तालुक्यात स्व. गणेशजी राणा, शेंदुर्णीस्थित पंडित जोहरी यांच्या हस्ते सर्वात प्रथम शाखा कुऱ्हाड येथे स्थापन करण्यात आली होती. तर त्यावेळेचे तात्कालीन तालुका प्रमूख म्हणुन लोहारी येथील माजी पं.स.सभापती स्व. भास्करतात्या यांचे पुत्र स्व. मनोज भास्कर पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती.

मुंबई येथील शिवसेनेचे समाजकार्य जगभर पसरल्याने आपसुकच युवावर्ग शिवसेनेच्या छत्राखाली एकत्र होत गेला. त्यामुळे पाचोरा तालुक्यात शिवसेनेच्या शाखा वाढत गेल्या.स्व. मनोज भास्कर पाटील यांच्या भवानी सर्व्हीस सेंटरवर & शिवाजी चौकात लक्ष्मण आर्ट या ठीकाणी मा.आ. दिलीपभाऊ वाघ, पाचोरा माजी नगरसेवक अशोक महाजन, गोराडखेडा येथील बळीरामदादा, दक्ष पोलीस टाईम्सचे संपादक विजय टाटीया, लक्ष्मण सुर्यवंशी व मी अशा आमच्या सर्वांची बैठक असल्याने त्यावेळी आपसुकच सर्वजण शिवसेनेच्या कार्यात सहभागी झालो. किंबहुना दिलीपभाऊंच्या लाल हिरो होंडा गाडीवर शिवसेनेच्या वाघाच्या तोंडाचे स्टीकर पुढे – मागे अनेक वर्षे लावलेले होते. नव्हेतर 35 रु याचा शिवसेना शाखेचा फलक & शाखा स्थापनेच्या वेळी येणाऱ्या जिल्हा प्रमुख, उप जिल्हाप्रमुख शहरात आल्यानंतर किमान त्यांचे जेवण, निवास, नास्ता खर्च करणे यात सिंहाचावाटा स्व. मनोज पाटील & दिलीपभाऊ वाघ यांचा होता.

याच दरम्यान शिवसेनेचा मुंबई दसरा मेळावा जाणेसाठी पाचोरा ग्रामीण भागासह पाचोरा शहरात जरी शिवसेनेची स्थापना नव्हती, तरी शहरातील काही तरूण मुंबई जाणेसाठी तयार झाले. त्यापैकी शिवाजी नगर भागातुन भिमा निकम & मित्र परिवार तर देशमुखवाडी भागातुन माझ्यासह सुनिल महाजन, ओंकार कोळी, सदाशिवआबा यांचे लहान बंधु मनोहर ऊर्फ गोटु पाटील, छोटु महाजन इ. युवक सर्व मुंबई मेळाव्यास जाण्यास निघाले परंतु त्यावेळी कुणीतरी सांगीतले की शिवसेनेचा सभासद असल्या शिवाय जाणे शक्य नाही. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता शिवाजी नगर भागातील भिमा निकम सह आम्ही सर्व तरुणांनी सायकलवर जाऊन वडगाव टेक गाठले तेथील शिवसेना शाखा प्रमुख कुमावत (दुधवाले) यांच्याकडे सभासद पावती फाडून आम्ही सर्व मुंबई रवाना झालो.& दसरा मेळाव्यास उपस्थीत झालो या ठिकाणी स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी रायगडाच्या पायथ्याशी महाड येथे महाराष्ट्रव्यापी दुसरे आधिवेशन होणार असल्याची घोषणा केली. आणि शिवसेना नेत्यापासुन ते शिवसैनीका पर्यंत तयारीला लागण्याचे आदेश दिले.

पाचोरा येथे पोहचल्यानंतर स्व.बाळासाहेबांच्या आदेशा नंतर पाचोरा येथे अर्थात शहरात शिवसेना नसल्याने ग्रामीण भागात महाराष्ट्रव्यापी दुसरे आधिवेशन रायगडाच्या पायथ्याशी महाड येथे जाण्यासाठी तयारी सुरु झाली. तयारी काय? तर आधी जाणे-येणे वाहन कोणते & त्याचा खर्च कोण करणार येथुन सुरवात होती त्यामुळे आपसुकच हा खर्च करण्यासाठी तात्कालीन तालुका प्रमुख स्व मनोज भारकर पाटील & मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांनी वाहन खर्चाची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी सावखेडा, लोहारी, कुऱ्हाड येथील शिवसैनीकांची जाण्याची संख्या मोठया प्रमाणावर होती. यामध्ये पाचोरा शहरातुन फक्त माजी नगरसेवक व होमगार्ड कृष्णापुरी भागातील रहिवाशी अशोकभाऊ बळीराम महाजन यांचे नांव निश्चित झाले. मी वयाने लहान म्हणुन जाणाऱ्यांच्या यादीत माझा नंबर लागला नाही. परंतु ऐनवेळी अशोकभाऊंना ड्युटी लागल्याने त्यांच्या नावावर या आधिवेशनासाठी पाचोरा शहरातुन माझा जाण्याचा योग आला. तेथील वातावरण & नेत्यांची भाषणे व नियोजनासह शिस्तबध्दता नेत्रदिप व आदर्शमय होती. याच अधिवेशनात स्व. शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी
“गर्व से कहो, हम हिंदु है” आता 80% समाज कारणासह 20% राजकारणाची घोषणा केली. आणि गाव तेथे शिवसेनेची शाखा स्थापनेचा आदेश दिला. पर्यायाने शिवसेनेचा वाढता झंझावात थांबण्यासाठी तात्कालीन सत्ताधारी काँग्रेस कडून वाटेल ते सर्व स्तरावरील प्रयत्न सुरु झाले “शिवसेना व शिवसैनिक म्हणजे गुंडाचे संघटन” असे चित्र समाजासमोर निर्माण करण्याचे चित्र पुरेपुर करण्यात आले. प्रसंगी पोलीसी दडपशाहीचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. त्यामुळे शिवसेना पद्‌धिकारी व सैनीक यांचा गणेशोत्सव, शिवजयंती,नवरात्रोत्सव काळात पोलीसी ताब्यात सापडले तर जेल मध्ये , नाहीतर भुमीगत राहुन तालुका- जिल्हयाच्या हद्दी बाहेर काढण्याची वेळ आली. दुसऱ्पा बाजुला सत्ता काँग्रसची & विरोधी बाकावर समाजवादी विचाराचा पगडा असलेला जनता पक्ष असे. यातही स्व. आप्पासाहेब ओ.ना. वाघ यांचे नांव महाराष्ट्रात समाजवादी चळवळी बाबत अग्रेसर होते. त्यामुळे आपसुकच शिवसेनेने गर्व से कहो…… चा नारा देत राजकारणात प्रवेश केल्याने वडीलांचा आदर्श ठेवत काँग्रेसी विचार धारेत वाढलेले मनोज भास्कर पाटील & समाजवादी विचारात वाढलेले व आप्पासाहेबांचा आदर्श असलेले दिलीपभाऊ शिवसेनेच्या प्रवाहा पासुन नाईलाजाने दुर गेले. पाचोरा तालुका प्रमुख पदापासुन काही वर्षे पोरका राहीला. शहरात शिवसेना नसल्याने शिवसेना शहर प्रमुखाचा संबंधच नव्हता, तरी सुद्धा शिवसेनेची वाटचाल सुरु राहीली.

याच दरम्यान पाचोरा शहरात जन्मठेपेची शिक्षा भोगुन आलेले व काहीकाळ मुंबईत राहीलेले राजेंद्र गरबड पाटील यांचे आगमन झाले तेव्हा पासुन शिवसेना वाढण्यास प्रारंभ झाला. पाचोरा शहरात शिवसेनेची पहीली शाखा सुर्यकांत नाईक व बाळू काळे यांच्या नेतृत्वाखाली गिरड रोडवरील हनुमानवाडीत हनुमान मंदीरात नारळ फोडून स्थापन झाली तद्नंतर शहरातील प्रमुख भागात सेनेचे जाळे पसरले तसा विरोध & पोलीसी त्रास सुरु झाला. शेवटी आता कोणीतरी तालुकासह शहर प्रमुखाचे नेतृत्व स्विकारावे यासाठी हालचाली सुरू झाल्यात & संपुर्ण शहरातील शिवसैनीकांची बैठक गॅस बत्तीच्या प्रकाशात नवगजा पुलाखाली घेण्यात आली. तेथील चर्चेनंतर जाहीर बैठक छ.शिवाजी महाराज चौकाजवळील म.गांधी वाचनालयाच्या वरील हॉलमध्ये घेण्यात आली. तोपर्यंत शिवसेनेत संजयभाऊ गोसावी, गोराडखेडा येथील खा. मराठाचे संपादक स्व. राजेंद्र पाटील, स्व. दिलीपभाऊ बोरसे, एकनाथ चौधरी, प्रदीप नागणे यांच्या सारखे बरेचशे तरुण शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रेरीत होऊन सक्रीय झाले होते. बैठक सुरु झाली आणि महाराष्ट्र ट्रान्सपोर्टचा ट्रक पार्क करून कै.अशोक ( बंधु ) मिसाळ नुकतेच आले. & त्यांचे आगमन होताच त्यांना काही कळायच्या आत सर्वानुमते त्यांचे नांव शहर प्रमुखासाठी घोषीत झाले. तर प्रभारी तालुका प्रमुख सावखेडा येथील नथ्थुभाऊ परदेशी यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पाचोरा शिवसेना आगेकुच करतच राहीली. विशेष म्हणजे पाचोरा शिवसेनेत अशोकबंधुपासुन जेपण अग्रेसर राहीले, त्यापैकी 99% स्व. आप्पासाहेबांच्या राजकीय तालमित तयार झालेले पठ्ठे होते. त्यामुळे बऱ्यापैकी कधी आप्पांसाहेबां सोबत संघर्ष तर कधी मार्गदर्शन करीत शिवसेनेची वाटचाल सुरु रहिली.

पाचोरा येथील श्री एम. एम. महाविद्यालयात भारतीय विद्यार्थी सेनेची एकतर्फी पकड होती. सुदैवाने त्याचे तालुका प्रमुख नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली महाविद्यालयातील कोणतेही आंदोलन असो भारतीय विद्यार्थी सेना & संदीप महाजन या एकाच नाण्याच्या दोन बाजु होत्या. तर दुसऱ्या बाजुला महाविद्यालयीन निवडणुक ही 1989 पर्यंत मतदान पध्दतीने होत असल्याने जनता पक्ष/ जनता दल प्रणित छात्र भारती याची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिलीपभाऊ यांच्यावर आली शत्रुचा – शत्रु तो आपला मित्र हे धोरण स्वीकारत काँग्रेसला व त्यांच्याशी संलग्न असलेल्या NSUI या विद्यार्थी संघटनेचा विरोध करतांना प्रसंगी छात्र भारती & विद्यार्थी सेना देखील एकत्र येत असत. वेळ आली तर आपल्या दोघांपैकी कोणीही चालेल पण NSUI चा नको..! अशी भुमीका होती.

याचाच परिपाक म्हणुन 1989 मध्ये भारतीय विद्यार्थी सेनेचा UR होण्यास माझ्यासाठी दिलीपभाऊ वाघ यांची भुमीका महत्व पुर्ण ठरली कारणही तसेच घडले होते. तात्कालीन परिस्थीतीही तशीच होती भारतीय विद्यार्थी सेनेचे पॅनल & UR म्हणजे एकतर्फी विजय याच भ्रमात राहुन 1989 ची महाविद्यालयाची निवडणुक लढवण्यात आली CR & GS सह पॅनल एकतर्फी विजयी देखील झाले. त्यावेळी मी म्हणजे संदीप महाजन TYBA ला असतांना CR पदासाठी 04 विरुध्द 148 मतांनी एकतर्फी विजयी झालो. होतो. शिवाय TYBA च्या दोन डिव्हिजन असल्याने तात्कालीन नियमा प्रमाणे दोघांपैकी एकाच CR ला मतदानाचा हक्क किंवा UR निवडणुकीसाठी पात्र ठरवले जात असे. त्यामुळे एकतर दोघांपैकी एकाची ईश्वर चिठ्ठी निघत असे, किंवा दोघांपैकी एकाने जरी मला मतदानाचा हक्क नको – असे लिहून दिले तरी चालत असे. म्हणुन NSUI टीमने B डिव्हीजनचा CR परधाडे येथील रहिवाशी बबन महादू सोनवणे यास आर्थिक सह विविध आमीष देऊन फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु बबन सोनवणे याने माझे आजोळ व मामांच्या परिवाराशी प्रामाणिकपणा दाखवत माझ्याशी एकनिष्ठ राहिला तर दुसऱ्या बाजुला UR निवडीच्या आदल्या दिवशीच NSUI ने आपल्या सर्व स्तरावरील राजकीय शासकीय बळाचा वापर करीत रात्रीतुनच सर्व CR ताब्यात घेतले. अगदी एवढे षडयंत्र रचले की, मला UR पदासाठी अनुमोदक- सुचकही मिळायला नको , परंतु यातील दोन CR भगिनी या कट्टर शिवसैनिक असल्याने त्यांच्या घरच्यांना पैसे व 10 ते 12 वर्षे गॅस कनेक्शनसाठी प्रतिक्षा यादी असल्याच्या काळात विनामुल्य गॅस कनेक्शनचे आमीष दिले … तरी त्यां भगिनींनी व त्यांच्या घरच्यांनी या आमिषाला भिक घातली नाही . यात प्रामुख्याने नांव घेता येईल गांधी चौकस्थित प्रमोद रामकृष्ण जडे & परिवाराचे मी सकाळी UR होणार या भ्रमात राहून रात्री आनंदात झोपी गेलो. सकाळी बघीतले तर चित्र उलटे होते. माझ्या जवळ फक्त दोनच CR बाकी सर्व NSUI ने तात्कालीन आमदार कै. बापुसाहेब के. एम. पाटील यांचे सहकार्य घेत राजकीय व शासकीय यंत्रणेत सत्तेचा वापर करीत पोलीसांच्या सुरक्षेत अज्ञातस्थळी सर्व CR बंदिस्थ केले. मी UR होणे जवळ-जवळ अनिश्चित झाले होते.

याच वेळी मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांची भुमीका महत्व पुर्ण ठरली. कॉग्रेसने अज्ञात ठिकाणी & पोलीसी सुरक्षेत लपवलेले CR शोधणे ते तेथुन काढणे जिकरीचे होते तरी माझे स्नेही भा.वी. सेनेचे पदधिकारी राजेंद्र बोथरा, रविंद्र वाघ, विकास उर्फ गोटु वाघ, स्व.अशोक दत्तु पाटील व सहकार्यांनी मा.दिलीपभाऊंना गाठले & वस्तुस्थीती सांगीतली मा. दिलीपभाऊंनी क्षणाचाही विलंब न करता स्वतः ची जीपगाडी काढली आणि पोलीसी बंदोबस्तात अज्ञात स्थळी घरात लपवलेले सर्व CR ताब्यात घेतले, आणि विद्यार्थी सेनेच्या स्वाधीन केले. याचा परिणाम एवढा भयंकर झाला की, तात्कालीन फौजदार डी एस पवार आपल्या पोलीस ताफ्यासह कोणताही अधिकार नसतांना पुर्व परवानगी शिवाय महाविद्यालयाच्या इमारतीत दाखल झाले. आणि त्यांनी मा.दिलीपभाऊ वाघ यांच्याशी वाद घातला. त्याचा परिणाम असा झाला की, पी.एस.आय.डी. एस. पवार यांना दिलीपभाऊंच्या हातुन कानशिलात खावी लागली. त्यामुळे पाचोरा कॉलेज मध्ये जणुकाही युद्धभुमीचे स्वरूप आले होते. परंतु अखेर मा. दिलीपभाऊंच्या आशिर्वादाने व शिवसैनीकांच्या प्रयत्नाने मला म्हणजेच भारतीय विद्यार्थी सेनेच्या म्हणजेच शिवसेनेच्या व्यक्तीला UR पदावर बिनविरोध होण्याची संधी मिळाली.

इकडे महाराष्ट्रात शिवसेना उभारतांना कधी राजकीय स्तरावर शिवसेना सत्तेत येईल असे वाटत नव्हते शिवाय जणु काही आम्ही राजकीय सत्तेचे अमृतप्यालेलो आहेत अशा जोशात सत्तेचा माज असलेल्या राष्ट्रीय कॉग्रेसला हल्ली जे वाईट दिवस आले आहेत अशी वेळ काँग्रेसला येईल याचा स्वप्नात देखील विचार केला नव्हता. इकडे पाचोऱ्यात सुध्दा प्रथम ग्रामपंचायत नांद्रा नंतर कोल्हे असा ग्रामपंचायीतीवर भगवा फडकवत वाटचाल करीत पाचोरा शिवसेनेला राजकीय पटलावर चांगले दिवस येऊ लागले. घरच्या भाकरी मंदीरावर खाऊन प्रचार करणारे हाडाचे शिवसैनीक पाचोऱ्यात तयार झाले. परीणातः अवघे फक्त 14 हजार खर्च करून अशोक मिसाळ यांना 27000 मतापर्यंत पोहचवणारे हाडाचे शिवसैनीक काम करीत होते. निस्वार्थ शिवसैनीकांचे काम & त्यांच्या कष्टातुन 27 हजार मिळालेले एकमठ्ठा मते व स्व. अशोक मिसाळ यांचा निसटता झालेला पराभाव यावर डोळा ठेवत दरम्यानच्या काळात पाचोरा शिवसेनेत विधानसभेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगुन मा. नानासाहेब शांताराम सोनजी पाटील, मा. साहेबरावआबा पाटील, स्व. बाळासाहेब पवार सारखे काँग्रेस मधील राजकीय मातब्बरांनी शिवसेनेत प्रवेश केला. परंतु त्यांची चुक अशी होती ते खालुन वर जाण्याचे स्वप्न बघत सेनेत सक्रीय झाले होते. परंतु तात्कालीन नेत्यांची चमचेगिरी व हुजरेगिरी करणाऱ्या प्रा.लि.जोडीने त्यांचा टिकाव लागु दिला नाही. परीणामत: त्यांना आपापल्या राजकीय स्वगृही परतावे लागले. परंतु अत्यंत दुरदृष्ठी ठेऊन वाटचाल करणारे अभ्यासु व्यक्तीमत्व स्व. तात्यासाहेब आर.ओ. पाटील यांनी स्थानीक पासुन तर वरच्या पातळी पर्यत शिवसेनेचा सखोल अभ्यास केला. आणि प्रत्येकाला त्याच्या गरजे प्रमाणे सर्व स्तरावरच्या गरजा पुर्ण करीत मागील नेत्यांप्रमाणे खालुन वर न जाता, थेट वरतुनच फील्डींग लावुन विधानसभा निवडणुकीचे शिवसेनेचे टिकीट पदरात पाडून घेतले. किंबहुना पाचोरा शिवसेनेत जो शिवसैनीक घरच्या भाकरी खाऊन निवडणुक प्रचारात सक्रीय होता त्या शिवसेनेत राजकारण & युद्ध यात सर्व काही माफ असते हे तत्व स्विकारत पाचोरा शिवसेनेत कुपनसेना & निर्मल सेनेचा शिरकाव झाला. आणि पाचोरा राजकारणात स्व. बापु साहेब & स्व. आप्पासाहेब वाघ यांच्या काळापासून ते स्व.अशोक मिसाळ निवडणुकी पर्यत अर्थकारणाला स्थान नव्हेत त्या आर्थिक स्थानाला महत्व स्व.तात्या साहेब आर.ओ.पाटील यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत बघायला व याची देही याची डोळा अनुभवाला मिळाले.

कालांतराने सर्व काही बदलत गेले मा. आ.दिलीपभाऊ वाघ हे आमदार असतांना राजकीय निचतेच्या वृत्तीने तर कळसच गाठला. पैशापुरता मर्यादीत असणारे राजकारण चारित्र हनन पर्यंत पोहचले मग ते नेत्याचे असो की कार्यकर्त्याचे किंवा त्याच्या परिवाराचे असो…. अशा अधम वृत्तीचे व निचप्रवृत्तीचे राजकारण पाचोऱ्यात सुरु झाले आहे. व ते सर्वश्रृत आहे.

असे म्हणतात की “समोरच्या व्यक्तीच्या ताटात आपण जे वाढतो तेच कालांतराने आपल्या पुढे येते” पाचोऱ्याच्या राजकारणात ज्यानी पैशाच्या जोरावर शिरकाव केला त्याच पद्धतीने गेल्या आमदार पदाच्या निवडणुकीत आमदार किशोर आप्पांना निसटता विजय मिळाला. किंबहुना सत्य सांगायचे झाले तर विजय 1 मताचा असो की हजारो लाखो मताने असो विजय तो विजयच असतो परंतु आजच्या स्थीतीला विजय जरी मिळाला असला तरी आजही तो विजयाचा आनंद आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही.
आम्ही शिवसेनेचे कार्य करीत असतांना स्वप्नातही विचार केला नव्हता की राजकारणात शिवसेनेला एवढे चांगले दिवस येतील… किंवा राजकीय सत्येचे अमृतपिल्या सारखे जे काँग्रेसी त्याकाळी वावरत होते, त्यांना शिवसेनेच्या गाडी खालच्या …. सारखे होतील..!

ही झाली दुरची राजकीय स्थिती पाचोरा शहरातीलच उदा. द्यायचे झाले तर जास्त नाही अल्ली- अल्ली माझ्या स्वतः च्या डोळ्यादेखत काही वर्षा पूर्वी पाचोरा मानसिंगकाचे एक वैभव होते. भारतीय सैन्यदलाला तेल पुरवठा करणारी बडी कंपनी म्हणुन त्यांचे देशात नांव होते . अगदी भारतीय तेलाचा केंद्रसरकाचा बजेट देखील मानसिंगकाशेठ यांच्या चर्चे व सहभागा शिवाय सादर केला जात नसे. या कंपनीत सर्व सामान्य नागरीकांना त्याकाळी फक्त गणेशोत्सवाच्या काळात जाण्याचा योग येत असे. मानसिंगका चे वैभव व श्रीमंती नेत्रदीपक होती. त्यांच्या कडुन मिळणारा मुठभर प्रसाद & थोडेफार का असेना आहे ते वैभव पाहून प्रत्येकाचे डोळे फिरल्या वाचुन राहत नसत. परंतु सर्वच दिवस सारखे नसतात जेव्हा ग्रह फीरतात त्याला काळ & वेळ लागत नाही.

शेवटी आज काय आहे. थोडक्यात संगायचे झाले तर एकेकाळी लाखो लिटर उत्पादन करणाऱ्या तेल कंपनीत आज दिवा जाळण्यासाठी तेलसुद्धा बाहेरून विकत आणावे लागत आहे.
अशी उक्ती आहे की “उकीरड्याचे पण दिवस पलटतात” म्हणुन उन्माद कधी करू नये. राजा चा रंक होण्यात वेळ लागत नाही.

आज जी युवापिढी राजकीय स्तरावर स्वतःचे स्थान निर्माण करण्याचे स्वप्न पहात आहे. त्यांना आधी सध्याच्या राजकारणा मधील स्वतःचे वास्तव बघायचे असेल तर एकवेळा नव्हे तर दहा वेळा झेंडा चित्रपट बघुन योग्य तो निर्णय घ्यायचा आहे.

माझ्या खाजगी & राजकीय जिवनाबाबत सांगायचे झाले तर
असे एक ना अनेक उपकार दिलीपभाऊ & वाघ परिवाराचे उपकार व्यक्तीशः माझ्यावर आहेत. तरीसुद्धा PTC च्या श्री गो से हायस्कुल या शाळेत नोकरीतुन कमी केल्याने मी बऱ्यापैकी वाघ परिवारा पासुन दुरावलो गेलो होतो. परंतु पाचोरा न.पा. लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडीच्या वेळी जेव्हा विद्यमान आमदार किशोरआप्पा विजयी झाले, त्याच निवडणुकीत माझा ‘स्व’- दुखावला गेल्याने आमच्या देशमुखवाडी भागातील शिवसेनेच्या तिघंही जागा पराभुत करण्यास माझा एका रात्रीतुन काढलेला सा. ध्येय चा अंक कारणीभूत ठरला. परीणामतः किशोरआप्पा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी विजयी झाल्यानंतर चक्क निवडणुकीचा मार्ग बदलवुन माझ्या घरासमोर गुलालाचा थर साचेपर्यंत धिंगाणा घातला. त्यातील काही दुःखी आत्म्यानी घराची पायरी चढुन बंद दरवाजावर दगड फेक केलीआणि स्वातंत्र्य सैनिक वडीलांच्या नावाच्या पाटीची मोडतोड केली. हा प्रकार हाडाच्या शिवसैनीकांना सहन झाला नाही. त्यांनी घटनेची बारीक सारीक माहीती कथन केली. डोक्यावर बर्फ ठेवत शांततेत वैष्णोदेवीच्या आशिर्वादाने सट्टयाच्या- जुगाराची मस्तीचा जोर ज्यांनी माझ्या घराची पायरी चढुन दाखवला, त्यांचे या अवैध धंद्याचे संपुर्ण अस्तीस्तव स्लो पॉईझन सारखे नष्ट केले. हा भाग नंतरचा परंतु जेव्हा माझ्या घरावर हल्ला झाल्याची घटनेची बातमी कळताच माझ्या निवासस्थानी दिलीपभाऊ वाघ, संजयनाना वाघ यांनी सह परिवार भेट देऊन सात्वन केले.

तद्नंतर विधानसभा निवडणुक लागली स्व. आप्पासाहेबांचे स्वप्न मा. दिलीपभाऊनी आमदार व्हावे हे पुर्ण करण्यासाठी सर्व स्तरातुन प्रतिसाद मिळू लागला. यावेळी माझे स्नेही चंद्रकांत धनवडे & रणजीत पाटील यांनी माझ्याकडे येऊन दिलीपभाऊंना विजयी करण्यासाठी सक्रीय होण्याचा आग्रह केला. माझी PTC ची गेलेली नोकरी व त्याचे दुःख मी त्यांच्या जवळ व्यक्त केले दिलीपभाऊंनी क्षणाचाही विलंब न करता स्व. डॉ.शरदआबा विसपुते यांच्या मध्यस्थींने सदरची नाराजी दुर करण्याचा शब्द दिला आणि मला त्यांच्या प्रचारात सक्रीय होण्यास सांगीतले मी क्षणाचाही विलंब न करता राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश न करता थेट दिलीपभाऊंच्या सोबत विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आणि परिणामाची चिंता न करता दिलीपभाऊ विजयी झाल्यानंतर त्यांच्या सोबत राहुन ज्यांनी सत्तेची फळे चाखली त्या लाभार्थीच्या त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर त्या निवडणुकीत जरी मी दिलीपभाऊंच्या विजयाला कारणीभुत ठरलो नसलो तरी प्रतिस्पर्धी उमेदवार स्व.तात्यासाहेबांच्या पराभवाला निश्चितच कारणीभुत ठरलो. हे कटु सत्य प्रत्यक्षदर्शी पाहणारे सहज सांगतील.
व्यक्तीगत माझ्या कुटूंबीयावर केलेला न विसरण्यासारखा उपकार म्हणजे
पाचोरा नगरपालीकेत मा. आ. दिलीपभाऊ वाघ सत्तेत असतांना वडीलांचे निधन झाले. त्यावेळी स्वातंत्र सैनीक सुपूत्र राजारामशेठ नागो सोनार यांच्याशी चर्चेतुन समजले की, इंग्रज काळात वर्ग 8 वीत शिक्षण घेत असतांना भारतीय स्वातंत्र चळवळीत भाग घेतल्याने ज्यांना बालवयात 6 महीने येरवडा जेलचा कारवास भोगला व तो त्रास सहन करावा लागला. अशी व्यक्ती जळगाव जिल्हयात पाचोरा शहरातील अशी एकमेव नगरपालीका आहे की त्या न.पा. प्रशासनात माझे पिताश्री स्व. स्वातंत्र्य सैनीक दामोदर लोटन महाजन यांनी ऑक्ट्रॉय इन्पेक्टर म्हणुन सेवा बजावुन सेवा निवृत्त झालेत. त्यांनी तातडीने पाचोरा न. पा. समोरील चौकास अशा व्यक्तीचे नांव द्यावे सदरचा विषय पाचोरा न.पा.सभागृहात चर्चेला आणुन हा विषय सर्व पक्षीय एकमताने देखील मंजुर होऊन न. पा. समोरील चौकाचे नामकरण करून तात्कालीन पालक मंत्री यांच्या हस्ते कोनाशिलेचे अनावरण देखील करण्यात आले. असे एक ना अनेक उपकार करणाऱ्या दिलीपभाऊ & वाघ परिवाराचे उपकार तरी मी विसरणे शक्य नाही. किंबहुना जेव्हा-जेव्हा निर्णायक भुमीका घेण्याची वेळ येईल त्या-त्या वेळी मी आणि माझा परिवार वाघ परिवारा सोबत असेल हे आजच्या दिवशी दिलीपभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छासह जाहीरपणे सांगत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here