Breaking

अन्न परवाना नोंदणीसाठी 1 ऑक्टोबरपासून विशेष मोहिमेचे आयोजन

0

जळगाव- अन्न परवाना नोंदणीसाठी 1 ते 7 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त यो. कों. बेंडकुळे यांनी दिली आहे.

अन्न व्यवसाय करण्यासाठी त्यांनी अन्न सुरक्षा व मानदे अधिनियमांतर्गत परवाना, नोंदणी घेवूनच अन्न व्यवसाय करणे आवश्यक आहे. ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल रूपये 12 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांनी परवाना घेणे आवश्यक आहे. तसेच ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल रूपये 12 लाखांपेक्षा कमी आहे त्यांनी नोंदणी करून घ्यावी. जे अन्न व्यावसायिक विना परवाना, विना नोंदणी अन्न व्यवसाय करताना आढळून येतील त्यांच्याविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत न्यायालयीन खटला दाखल करण्याची तजवीज असून त्यामध्ये 5 लाख रूपयांपर्यंत दंड व सहा महिने कारावासाची तरतूद आहे.

परवाना नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून विहित नमुन्यात अर्ज करून ऑनलाइन शुल्क भरूनच व्यवसाय करावा. ऑनलाइन परवाना किंवा नोंदणी अर्ज करणेकरीता foscos.fssai.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध आहे. तेथे आवश्यक कागदपत्रे व तत्सम बाबींसाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.

अन्न व्यावसायिकांनी परवान्याची, नोंदणीची मुदत संपण्यापूर्वी तत्काळ नूतनीकरण करून घ्यावे. तसेच जे अन्न व्यावसायिक परवाना घेण्यासाठी पात्र आहेत. परंतु त्यांनी नोंदणी घेतलेली नाही, अशा अन्न व्यावसायिकांनी त्वरीत परवाना घ्यावा. त्यासाठी जळगाव कार्यालयातर्फे 1 ते 7 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत उपरोक्त बाबी विचारात घेवून अन्न व्यवसायिकांमध्ये अन्न परवाना, नोंदणी घेण्याबाबत अन्न परवाना नोंदणी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी त्यांच्या विक्री बिलावर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत घेण्यात आलेला परवाना, नोंदणी क्रमांक टाकणे बंधनकारक आहे, असेही श्री. बेंडकुळे सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here