Breaking

पुरस्काराचा मान की खैरात?

0

पाचोरा-काल परवा बातम्यांवर नजर मारत असतांना पद्मश्री पुरस्काराची यादी वाचली आणि बर्‍याच वर्षापासून डोक्यात घुटमळणारे शब्द बाहेर पडले आणि यावर एखादा ब्लॉग लिहावा असे वाटले आणि शब्द मांडणी सुरू झाली. खरं तर फार कधी पासून वाटत होते सध्याच्या पुरस्कारांच्या व सन्मानपत्राच्या खैरातीवर एखादे लेखन करावे. परंतू योग्य काळ आणि वेळ मिळत नव्हता. अर्थात सर्वच पुरस्कार खैरातीसारखे असतात असे नाही यामध्ये जगात मोठे मानले जाणारे जगभरातील पुरस्कार मॅगसेसे, बुकर, नोबेल, ऑस्कर यांच्याबाबत आजही एकवेगळा मान-सन्मान जगभरात दिला जातो. बालपणापासून माझे पिताश्री स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक आण्णासाहेब दामोदर लोटन महाजन यांना स्वर्गीय व तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतल्याबद्दल देण्यात आलेले ताम्रपत्र व स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी म्हणजेच 1997 मध्ये देण्यात आलेले मेडल. यांच्याकडे बघितल्यानंतर व ते प्राप्त करण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट यांची महती जेव्हा ऐकली तर खरोखर अंगावर शहारे आणण्यासारखी होती. वर्ग 8 मध्ये शिक्षण घेत असतांना इंग्रज कालीन अत्याचार सहन करत येरवडा जेल सारख्या कारागृहात एक दोन दिवस नव्हे तर तब्बल सहा महिने त्यांनी उपभोगलेला कारावास आणि त्या यातना ऐकल्यानंतर स्वातंत्र्यसैनिक व स्वातंत्र्यवीर यांचे कार्य व बलीदान सोनेरी अक्षराने जरी लिहिले तरी ते अपूर्ण पडतील असे हे कार्य होते आणि अर्थात त्या पुरस्काराला साजेसे असे जीवनदेखील ते जगले हे पाचोरेकरांना सर्वश्रूत आहे-ज्ञात आहे. त्यामुळे मी त्याचवेळी ठरवले होते माझ्या घरात जे ताम्रपत्र व सन्मान चिंन्ह आहे त्यापेक्षा सर्वश्रेष्ठ किंवा त्याला साजेशे व बाजुला ठेवता येईल असा पुरस्कार प्राप्त करु शकत नाही व करणार नाही म्हणुन एकही पुरस्कार स्विकारायचा नाही कोणी दिला तरी त्याचा उहापोह करायचा नाही तो घरात लावायचा नाही मला आजही आठवते जेव्हा मी बारावी पास झाल्यानंतर एफ.वाय.मध्ये असतांना माझे वय 18 वर्षे दोन महिने होते. आणि त्याचवेळी त्यांचे बालमित्र आमच्या घरी आले ते सहकार विभागातील मोठे अधिकारी होते. त्यांनी सांगितले अरे दामू तुझ्या जवळ स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशन पत्र आहे आमच्या विभागात फक्त 20 हजार दिले तर थेट ए.आर.सारख्या पदावर मुलाला नोकरी लागू शकते. परंतू वडीलांच्या तत्वात ते बसले नाही आणि त्यावेळेचे त्यांचे संभाषण व त्यांना दिलेले उत्तर मला आयुष्यभर आठवणारे होते. त्यामुळे मी या भ्रष्ट कार्यकाळात वडीलांच्या भावनांना व तत्वांना ठेच पोहोचेल म्हणून त्या नामनिर्देशन पत्राचा पैसे भरून नोकरी घेण्यासाठी कधीही वापर केला नाही. आजही त्या नामनिर्देशन पत्रावरील नोकरी निरंक आहे. आता सांगण्याचा अर्थ असा की,जेव्हा आपण हे पुरस्कार घेतो तेव्हा तो पुरस्कार आपणांस का दिला जात आहे आणि कोणत्या परिस्थितीत दिला जात आहे. याचा अभ्यास करून पुरस्कार स्विकारणारे अथवा नाकारणार्‍या लोकांची नावे देखिल आज जगजाहिर आहे. यामध्ये पुरस्कार नाकारणारे निखिल चक्रवर्ती, के सुब्रमण्यम, रजिंदर सत्चर, दत्तोपंत ठेंगडी, सिध्दराज धडा वगैरे बरीच मंडळी आहे. सन 2009 साली पी.साईनाथ यांना पद्मश्री पुरस्कार जाहिर झाला तेव्हा पत्रकारांनी सरकारी पुरस्कार घेणं चुकीचं आहे असे लिखाण करताच त्यांनी तो केवळ त्या कारणाने नाकारला. सितारा देवींनी तर माझ्यापेक्षा वय आणि कर्तृत्वाने लहान असणार्‍या व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार आधी मिळाला त्यामुळे पद्मभुषण हा माझा सन्मान नाही तर अपमान आहे अस म्हणत त्यांनी पुरस्कार नाकारला होता. काहीशा अश्याच कारणांनी विलायत खाँ यांनी 1964 साली पद्मश्री, 1968 साली पद्मभुषण आणि 2000 साली पद्मविभुषण हे तिनही पुरस्कार नाकारले. कदाचित त्यालाही हेच कारण असेल. देशातल्या नागरीकांना असे पुरस्कार दिले जावेत अशी कल्पना देश स्वातंत्र्य झाल्यापासून स्वर्गीय पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या मनात होते. त्याची अंमलबजावणी 1954 सालापासून सुरू झाली. कालांतराने अशा महत्वपूर्ण पुरस्काराला शासकीय व राजकीय खैरातींचा नवा राजमार्ग मोकळा झाला. पुरस्कार किंवा सन्मान म्हटला म्हणजे त्यासाठी योग्य कर्तृत्व व तशी प्रतिमा प्रतिष्ठा लागते. मात्र सद्यस्थितीत गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत पुरस्कारांची खैरात दिल्याचे दिसत आहे. गल्लीबोळातही लायकी नसलेल्यांना एखाद्या सेवाभावी व खाजगी संस्थेद्वारे जागतिक राजकीय राज्यस्तरीय नाव देवून पुरस्कार अर्थात सन्मान करण्याचे जणू काही पेवच फुटले आहे. किंबहुना पुरस्कार वाटणे आणि घेणे काहींनी धंदाच करून घेतला आहे हे पत्रकारिता क्षेत्रात काम करतांना त्याचे चांगले अनुभव आले आहेत तर काहीना उघड्या डोळयांनी पाहीले आहे.आजही अशा काही संस्था आहेत की त्यांच्याकडे पुरस्कार घेणाऱ्या भुकेल्यांची यादीच आहे. अश्या पुरस्कार विकणार्‍या संस्था थेट या व्यक्तीशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क साधतात आणि पुरस्कार घेण्या- देण्याची बोली लावतात मात्र त्यात प्रथम अट असते पुरस्कार हा तुम्हाला सह पत्नी- पती देण्यात येईल आणि पुरस्कार घेण्यासाठी येतांना किमान दहा व्यक्ती सोबत आणणे आवश्यक असते अशा काही नियम अटी निश्चित करून त्या पुररकाराची बोली लावली जाते मग काय गाडी- प्रवासासह चहा-पाणी- नास्ता & दुपारच्या जेवणासह रात्रीच्या ओली- सुकीच्या बोलीवर जाणाऱ्या हौशानौशांची संख्या कमी नसते. विशेष बाब म्हणजे रात्रीच्या ओली- सुकी पार्टीत तेच समर्थक त्या पुरस्काराची व पुरस्कार घेणार्‍या व्यक्तीची व पुरस्काराची खिल्ली उडवतात तेव्हा प्रत्येकाने असे पुरस्कार का आणि कसे घ्यावेत याचे आत्मपरिक्षण केले पाहीजे. काही संस्था – संघटना अशाही आहेत ज्या आगामी निवडणुकीवर डोळा ठेऊन आपल्याच पदाधिकार्‍यांच्या शिफारशीनुसार पुरस्काराची खैरात आपल्याच चटया- पट्यांवर केल्याचे ही उघड्या डोळ्यांनी पाहीले आहे. कोरोना काळत तर हद्च झाली ज्या व्यक्तीने कधी कोरोना सेंटरला भेट दिली नाही त्या रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना कधी सेवा दिली नाही किंबहूना त्यांच्याशी संपर्क सुद्धा केला नाही अशा लोकांनी निर्लज्जपणे कोरोनायोद्धा पुरस्कार स्वीकारून ते फोटो कित्येक दिवस STATUS ला ठेऊन अभिनंदन स्विकारले निश्चितच पुरस्कार नाकारणं ते बंद करणं हे सध्याच्या खरेदी-विक्रीच्या काळात बंद करणे शक्य नाही परंतु त्याचे निकष निश्चित करून ते काटेकोर पणे राबवले गेले पाहीजे परंतु असाही एक अनुभव आहे. सचिन तेंडुलकरला भारतरत्न मिळावा म्हणुन चक्क नियमातच बदल केला गेला परंतु कृषीप्रधान म्हटला जाणार्‍या भारत देशात मात्र शेतीक्षेत्रात योगदान देणाऱ्या जगाचा पोशिंदा शेतकर्‍यासाठी भारतरत्न तर सोडा एखाद्या पद्म पुरस्कार देण्यासाठी नियम बदलण्यास काय? हरकत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here