Breaking

२६ ऑगस्ट १९४२ स्वातंत्र्य चळवळीचा पाचोऱ्याचा इतिहास – शब्दांकन सौ. शितल सं महाजन

0

  • पाचोरा – ८ ऑगस्ट १९४२ च्या मध्यरात्री महात्मा गांधी, पं. नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सरहद्द गांधी, मौलाना आझाद अशा अनेक क्रांतीकारकांना अटक करण्यात आली. त्याची कुणालाही माहिती मिळू नये म्हणून याची काळजी घेण्यात आली. इंग्रजांनी तारा, टेलिफोन बंद केले. परंतु ९ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथील गवलिया टँकवर तिरंगा ध्वज फडकवून चलेजावचा संदेश देण्याचे ठरल्याप्रमाणे पूर्ण करण्याचे काम प्राणाची बाजी लावून अरुणा अशरफअली या महिलेने पुर्ण केले. तेथे गांधीजींचा संदेश संपूर्ण भारतीयांना पोहचवण्याची जबाबदारी जमलेल्या जनसमुदायास देण्यात आली.


चलेजाव हा मंत्र घेऊन पाचोरा येथील अण्णासाहेब सुपडू भादू पाटील भूमिगत झाले. चाळीसगांवला पोहचल्या नंतर त्यांच्या मागावर इंग्रज पोलीस असल्याची गुप्त माहीती प्राप्त होताच आण्णा पाचोरा येथे न येता कजगाव, गोंडगाव, घुसर्डी यागावी सभा घेवून पंचक्रोशितील लोकांना महात्मा गांधीनी सांगीतलेला चले जावचा संदेश अण्णासाहेबांनी दिला. त्याचबरोबर गाळण, तारखेडा, लोहारा, अंतुर्ली, नांद्रा, हडसन, पहाण, कुऱ्हाड, साजगाव, नं.खेडगाव, वेरूळी, आंबे-वडगाव या गावांना सत्याग्रह उठाव, सभा, प्रभातफेरी असा अहिंसा मार्गाचा अवलंब करून स्वातंत्र्याचा चले जावचा संदेश देत कधी घोडयावर, कधी पायी तर कधी बैलगाडीवर स्वराज्याचा संदेश देत अण्णासाहेब सुपडू भादु पाटील पिंपळगाव हरे. येथे पोहचले. तेथील त्यांची सभा मोठ्या प्रमाणावर पंच क्रोशित गाजली परिणामतः इंग्रज पोलीसाना ही बातमी कळताच इंग्रज पोलीस आणि आण्णामधे ससे- मिरा सुरु झाला रात्रीच्या वेळी कोंडवाड्या जवळील गुलाबशेठ यांच्या ओट्यावर आण्णा झोपले असतांना मध्यरात्री पोलीसांनी त्यांना गराडा घातला पहाटेच्या वेळी पोलीसांची नजर चुकवत आण्णा तेथुनही प्रसार झाले थेट निमखेडी, वडगाव, घोसला, सातगाव डोंगरी, सार्वे पिंप्री मार्गे वाडी-शेवाळे येथे पोहचल्यानंतर पोलीस तेथेही दाखल झाले परंतु माणिक पाटील यांच्या मदतीने तेथुन पसार झाले निंभोरी, मोंढाळे,, डोंगरगाव मार्गे चिंचखेडा, सारोळा, जारगाव करीत चुनीलाल दिपाजींचा मळ्यात विश्रांती घेऊन गोराडखेडा गाठले आण्णा या ठिक- ठिकाणी चले जावचा संदेश देत आगेकुच करत होते तर इंग्रज मागावरच होते 21 ऑगष्टला ओझर ,पुनगाव येथे मुक्काम करीत 22 ऑगष्टला पाचोरा गाठले निश्चित केलेला दिवस उगवला तो म्हणजे
२६ ऑगस्ट १९४२ चा दिवस महानारळी पौर्णिमा या दिवशी भारत मातेला राख्या बांधणार संदेश क्रांतीचा देण्यासाठी नारळ फोडणार असा संदेश देण्यात आला. त्यावेळी रथाजवळील बालाजीमंदीर म्हणजे स्वातंत्र चळवळीचे गप्त ठिकाण तेथुनच सर्व हालचाली होत असत अण्णासाहेब सुपडू भादू पाटील यांना तेथेच घोड्यावर बसविले. आणि भारतमातेचा जयजयकार करीत ध्वज घेवून मिरवणूक बालजी मंदिरापासून सुरू होवून विठ्ठल मंदिर, मशीद मार्गे, महादेव मंदिर या ठिकाणाहून पुढे सरकत जैन मंदिरापर्यंत पोहचली दुपारी १२ वाजता मिरवणूक गांधी चौकात आली. आण्णा मोठ्या जोशात घोड्यावरून गांधी चौकातील मैदानात आले आणि त्यांनी क्रांतीचा संदेश दिला. लोकांना सांगितले, आता शेवटचा टोला मारा, इंग्रज गाड्यांना हाकलून लावा, जुलमी सत्ता नष्ट करा, ऊठा शुरांनो, ऊठा विरांनो, तिरंगा झेंडा हाती घ्या अशा प्रकारे अण्णांच्या भाषणाचा जोर वाढत होता. त्याचवेळी पाचोऱ्याचे मामलेदार, पिंपळगावचे फौजदार पोलिस फोर्ससह तयारीनिशी आले आणि मामलेदार अण्णांना येवून म्हणाले आम्ही तुम्हाला अटक करणार त्यावेळी अण्णा मोठ्या धैर्याने म्हणाले थांबा भाषण संपवून येतो. यावेळी मामलेदार चिडला आणि फौजदाराला म्हणाला धरा ! धरा ! सुपडू पाटलाला किती दिवस लपून बसला होता, चकमा देत होता. आता बरा समोर आला. हे मामलेदाराचे वाक्य फौजदाराने ऐकताच फौजदाराने पोलिसांना आदेश दिला. घुसा रे सभेमध्ये पोलिस रायफल घेवून सभेत घुसले. मात्र जनतेने पोलिसांना सभेत घुसू दिले नाही. मामलेदाराने संतापाने लाठीचार्जला आदेश न देता सर्रास गोळीबार केला.यावेळी पहिली गोळी क्रांतीवीर भिवसन भुरेंच्या पायात घुसली, दुसरी गोळी देवचंद जयराम कोळी यांच्या मांडीत घुसली दुसरी तर छाती फोडून बाहेर पडली, त्याचवेळी तिसरी गोळी कृष्णापुरीतील क्रांतीवीर शहादू (महादू) चिंधा माळी यांच्या छातीत पाठ फोडून बाहेर निघून गेली, चौथी गोळी छगन राजाराम लोहार यांच्या मानेखाली लागली जिकडे-तिकडे रक्तरंजीत पटांगणे भरले. अशी परिस्थिती असतांना एक गोळी अण्णांच्या दिशेने सुसाट सुटली आणि कानापासून निघून गेली. ती थेट डबरूशेठ वाणी यांच्या भिंतीला लागली लोकांनी अण्णांना उचलून जवळच असलेल्या वाणीच्या माडीवर घेवून गेले हे सर्व बघून फौजदार आणखी चिडला व सूड घेण्याच्या उद्देशाने त्याने आपले पिस्तूल अण्णांच्या दिशेन रोखले. याचवेळी वसंत गोविंद शेंदुर्णीकर यांनी जिवाची पर्वा न करता फौजदाराचा हात दाबून धरला. फौजदाराला जागेवरून हालू दिले नाही. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.
जखमींना उपचारासाठी दवाखान्यात घेवून गेल्यावर सरकारी डॉक्टर माणूसकीला विसरून इंग्रजांच्या धाकाने पळून गेला. अशावेळी खाजगी डॉक्टर कृष्ण गोपाळ जोशी हे क्रांतीकारकांच्या मदतीला धावले स्वतः कुशलतेने गोळ्या काढल्या व उपचाराने ठिक केले. याउलट बदमाश अधिकाऱ्यांनी मृतांचा पंचनामा न करता परस्पर विल्हेवाट लावण्याचा सल्ला दिला मात्र स्वातंत्र्यवीर चिंतामण निगडे, चुनीलाल दिपाजी, हिरालाल शेठ भारतीया,बंडू तांबटकर, रेवाशंकर लक्ष्मीचंद मोदी , दलीचंद दौलाजी, बळवंत इच्छाराम वाणी, वसंत शेंदुर्णीकर, देवराम गोपाळ, विठ्ठल भिवसन महाजन, रामा यादव, महादू शिंपी, या लोकांनी स्वतः स्वाक्षरी करून पंचनामा केला. असा भारत स्वातंत्र्य संग्राम चळवळीत पाचोरा शहर तालुक्यातील जे स्वातंत्र्य सैनिक सहभागी होते प्राप्त माहितीनुसार त्यांचे नावे पुढीलप्रमाणे स्व. रामनारायण शिवाजी थेपडे, स्व. दामोदर लोटन महाजन, स्व. नागो बारकूशेठ सोनार, स्व. जनार्दन बळवंत वाणी, स्व. माधवराव लाला सुर्यवंशी, स्व. लोटन सूर्यवंशी, स्व. कपुरचंद
मुथा, स्व. राजाराम धनजी पाटील, स्व. लाभचंद जगजीवन शेठ, स्व. तोताराम अहिरे, स्व. बळीराम वेडू पाटील, स्व. कांतीलाल जगजीवन शेठ, स्व.सुकलाल रामदास गुप्ता, स्व. चंपालाल रविशंकर मोदी, स्व. वच्छलाबाई निळकंठ कुलकर्णी, स्व. श्रीपद दलपत तेली (शिंदाड), स्व. नथ्थू महादू पाटील (वडगाव), स्व. बाजीराव सुरसिंग राजपुत (वडगाव), स्व. सांडू गुलाबसिंग राजपूत (आखतवाडे), स्व. रामचंद्र बंडू जोशी (नगरदेवळा), स्व.माधव लाला पाटील (नांद्रा), स्व. हरसिंग नरसिंग पाटील (वडगाव), स्व. बळीराम शिवराम शिंपी (शिंदाड),
अशाप्रकारे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पाचोरा परिसरातील स्वातंत्र्यविरांनी सहभाग घेवून भारत स्वातंत्र्याच्या इतिहासात पाचोऱ्याचे नाव सोनेरी अक्षराने लिहिले. अशा या स्वातंत्र्य लढ्यात माझे सासरे कै.स्वा. सै. अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन हे वर्ग ८ मध्ये शिकत असतांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले शालेय दप्तरात पत्रके भरून वाटत असतांना त्यांना इंग्रज पोलिसांनी पकडून तात्कालीन मामलेदार देशपांडे यांच्यासमोर हजर केले. लहान असल्यामुळे सदरच्या मामलेदारांनी “तुम्ही लहान आहेत, तुमचे मला नुकसान करावयाचे नाही, तुम्ही जर माफी मागितली तर मी तुम्हाला सोडून देईल.” असे सांगितले. यावेळी मामलेदारांना नकार देताच त्यांनी संतप्त होवून सहा महिने कैदेची सद्यस्थित पाकिस्तान मधील कराची जेलची शिक्षा सुनवून रवानगीचा आदेश केला. या आदेशानुसार जळगाव येथील मुख्यालय म्हणजेच सध्याचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आणले. दोन दिवस याठिकाणी ठेवल्यानंतर पुढील आदेशाची वाट पहात असतांना कराची जेलमध्ये जागा नसल्याची तार प्राप्त झाली. त्यामुळे स्व.अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन यांना येरवडा कारागृहात पाठविण्यात आले. तेथे २८ सप्टेंबर १९४२ ते ०३ मार्च १९४३ पर्यंत सहा महिन्याचा कारावास भोगला. जेलमध्ये देखिल स्वातंत्र्याची चळवळ सुरूच होती. या राष्ट्रगीत, भाषणे, जेलवर असलेला इंग्रजांचा युनियन जॅक उतरविणे तेथे तिरंगा ध्वज फडकविणे अशी कृती कारावास भोगणाऱ्या स्वातंत्र्य चळवळीतील कैद्याकडून सुरूच होती. त्यामुळे इंग्रजांचा सतत होणारा असह्य त्रास सुरूच असे. अखेर सहा महिन्याचा कारावास भोगल्यानंतर त्यांची मुक्तता झाली पुन्हा राष्ट्रसेवादलाच्या शिबीरात सहभागी होवून काम सुरूच ठेवले. १९४७ साली देश स्वातंत्र्याचा सोनियाचा दिवस उगावला यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या पहाटे पाचोरा कचेरीवर फडकणारा इंग्रजांचा युनियन जॅक स्व.स्वातंत्र्य सैनिक तथा माजी आमदार अण्णासाहेब सुपडू भादू पाटील यांच्या हस्ते खाली उतरविण्यात येवून त्याठिकाणी तिरंगा ध्वज फडविण्यात आला. त्यावेळी राम भरोसे मास्तर, सुपडू रामदास गुप्ता, लालचंद शेठ यांचे वडील जगजीवनशेठ मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वराज्य आले, पण कुणाचे’ हे नाटक स्व. स्वा. सै. अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केले. त्यावेळी ८ ते १० हजाराचा जनसमुदाय हजर होता. आज स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे परंतू ‘स्वराज्य आले, पण कुणाचे’ हा प्रश्न अजुनही सुटलेला नाही. स्वराज्यासाठी लढत असतांना या स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी होणाऱ्या देशप्रेमींनी कधीही विचार केला नव्हता किंवा आपसात होणाऱ्या चर्चेत सवलती, मानधन सुरू होईल हा विषय कधीही चर्चेत आला नव्हता. परंतू

आज जेव्हा स्वातंत्र्य सैनिक खोटे नामनिर्देशन पत्र व त्यावर मिळविलेल्या नोकऱ्या यांचे पेव फुटल्याचे बघितल्यानंतर माझे सासरे स्व. स्वातंत्र सैनिक दामोदर लोटन महाजन यांनी अनेकदा खंत व्यक्त केली. स्वातंत्र्यानंतर पाचोरा नगरपालिकेमध्ये ऑक्ट्रॉय इन्स्पेक्टर सेवा करीत असतांना कर्मचारी असो की व्यापारी वेळेप्रसंगी पाठीवर मारले असेल परंतू पोटावर कोणाच्याही मारले नाही आणि एक दमडीचे देखिल कोणाचेही दबले नाही. अशी सेवा करीत ऑगस्ट १९८३ मध्ये ते सेवानिवृत्त झाले अशा देशासाठी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असणाऱ्या महान स्वातंत्र्य सैनिकांची स्नुषा असल्याचे मला भाग्य लाभले व त्याचा मला गर्व आहे (सदरची माहिती माझे सासरे व शिंदाड येथील स्वर्गीय स्वा.सै.श्रीपद दलपत तेली (गुरूजी) यांच्याकडून चर्चेअंती संकलित केली आहे.)
स्वातंत्र्य चळवळीत जळगाव जिल्ह्यातील आडगाव व पाचोरा येथे इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात जे हुतात्मे झालेत त्याआठवणी प्रित्यर्थ दोघंही ठिकाणी

हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे परंतु त्यापैकी पाचोरा येथील हुतात्मा स्मारकाची तात्कालीन आमदार दिलीपभाऊ वाघ & विद्यमान आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नामुळे सतत देखभाल व दुरुस्ती होत आहे विशेष म्हणजे पाचोरा नगरपालिकेच्या विद्यमान मुख्याधिकारी सौ शोभाताई बाविस्कर यांच्यामुळे पाचोरा येथील हुतात्मास्मारकाच्या सुशोभीकरणामुळे कायापालट झाला आहे महाराष्ट्रातील सर्व हुतात्मा स्मारकांपैकी पाचोरा येथील हुतात्मा स्मारक लक्षवेधी ठरत आहे

शब्दांकन
सौ. शितल संदीप महाजन MA.M.Ed (उपशिक्षिका-श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा जि. जळगाव) 🙏नम्र विनंती – पाचोरा परिसरातील जे स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी असतील त्यांनी कृपया आपल्या परिवारातील स्वातंत्र्य सैनिकांची स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाची माहिती, ताम्रपत्र, सन्मानपत्र व फोटो तसेच स्वातंत्र्य चळवळीतील आठवणीतील काही पुरातन वास्तूंचे फोटो -VDO असल्यास पुढील क्रमांकावर पाठवावा.

मोबा.७५८८६४५९०८ सौ. शितल संदीप महाजन, गणेश कॉलनी, पुनगाव रोड, पाचोरा जि.जळगाव


(कृपया आपणास सदरची माहिती योग्य वाटत असल्यास सदरची बातमी / पोस्ट सोशल मीडियावर आपल्या स्तरावरून प्रसारित करून स्वातंत्र्य चळवळीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एक भारतीय नागरिक म्हणून सहभागी व्हावे ही विनंती )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here