एम.के.सी.एल. तर्फे जळगाव जिल्हा पत्रकार संघासाठी एआय प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न

0

Loading

जळगाव – आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे एक महत्त्वाचे साधन बनले असून पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. हाच विचार लक्षात घेऊन महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात एम.के.सी.एल. तर्फे दिनांक ४ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी ४ वाजता जळगाव जिल्हा पत्रकार संघासाठी विशेष एआय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा उद्देश पत्रकारांना त्यांच्या दैनंदिन कार्यालयीन कामकाजात तसेच वृत्तलेखन, माहिती संकलन, दस्तऐवजीकरण, माहिती शोध यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये एआय साधनांचा अधिक प्रभावी वापर कसा करता येईल याबाबत मार्गदर्शन करणे हा होता. या कार्यशाळेला नवनियुक्त जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्त विजयबापू पाटील, कार्यवाहक अशोकआप्पा भाटिया, प्रा. राजेंद्र देशमुख सर, जिल्हा महानगर अध्यक्ष विवेक खडके, ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा पारोळा भूषणचे संपादक भिका चौधरी, एम.के.सी.एल. जिल्हा समन्वयक उमाकांत बडगुजर, वरिष्ठ पत्रकार राजेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले. कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून एम.के.सी.एल. चे विभागीय व्यवस्थापक (पुणे व उत्तर महाराष्ट्र विभाग) विनायक कदम यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या सादरीकरणात एआय तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती देत त्याचे पत्रकारितेतील उपयोग स्पष्ट केले. बातमी लेखनासाठी आवश्यक तथ्य शोधणे, मोठ्या दस्तऐवजांमधून महत्त्वाची माहिती मिळवणे, आकडेवारीचे विश्लेषण करणे, छायाचित्रे व व्हिडिओज तपासणे, भाषांतर आणि प्रूफरीडिंगसाठी एआयचा कसा उपयोग करता येतो याचे त्यांनी थेट प्रात्यक्षिक दाखवून दिले. तसेच जगभरातील नामांकित वृत्तसंस्था एआयचा वापर करून आपली कामे अधिक परिणामकारक पद्धतीने कशी करत आहेत याची उदाहरणेही त्यांनी दिली. पत्रकारांसाठी या प्रकारचे प्रशिक्षण हे एक नाविन्यपूर्ण पाऊल असल्याचे सर्व मान्यवरांनी व्यक्त केले. जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने उपस्थित मान्यवरांनी एम.के.सी.एल.च्या या उपक्रमाचे कौतुक करताना, “पत्रकारांच्या कामकाजाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास त्यांच्या कामात वेग, अचूकता आणि विश्वासार्हता वाढेल. त्यातून वाचकांपर्यंत दर्जेदार आणि विश्वासार्ह माहिती पोहोचेल,” असे मत नोंदवले. कार्यशाळेत सहभागी झालेल्या पत्रकारांनीही आपले अनुभव मांडताना एआयविषयी आधी थोडा संभ्रम असला तरी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर त्यांना हे तंत्रज्ञान किती उपयुक्त ठरू शकते याची जाणीव झाली. अनेकांनी आपल्या भविष्यातील कामकाजात एआय साधनांचा वापर करण्याचा निर्धार व्यक्त केला. “एआय हे आमच्या कामाला पर्याय नाही, तर ते आमचे सहकारी साधन ठरेल आणि पत्रकारितेतील सर्जनशीलता व तपास कौशल्य अधिक बळकट करेल,” असे उपस्थितांनी सांगितले. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर यांनीही समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “आजचा काळ तंत्रज्ञानाचा आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजाला योग्य माहिती पोहोचवण्याचे काम पत्रकार करतात. अशा परिस्थितीत त्यांच्या हातात आधुनिक साधने असणे अत्यावश्यक आहे. एआयमुळे त्यांचे काम अधिक सोपे, जलद आणि विश्वसनीय होणार आहे.” जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्त विजयबापू पाटील यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना एम.के.सी.एल.चे आभार मानले. कार्यवाहक अशोकआप्पा भाटिया यांनी पत्रकारांनी या संधीचा योग्य उपयोग करून आपली क्षमता वाढवावी असे आवाहन केले. प्रा. राजेंद्र देशमुख यांनी एआयमुळे पत्रकारितेतील गुणवत्ता वृद्धिंगत होईल असे सांगितले. महानगर अध्यक्ष विवेक खडके यांनी या कार्यशाळेमुळे ग्रामीण भागातील पत्रकारांनाही डिजिटल जगात नवी दिशा मिळेल, असे मत व्यक्त केले. ग्रामीण जिल्हाध्यक्ष भिका चौधरी यांनी विशेषतः पारोळा व आसपासच्या ग्रामीण पत्रकारांच्या वतीने कार्यशाळेचे मनःपूर्वक अभिनंदन केले. कार्यशाळेच्या शेवटी प्रशिक्षणात सहभागी सर्व पत्रकारांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, विजयबापू पाटील, अशोकआप्पा भाटिया, प्रा. राजेंद्र देशमुख, विवेक खडके, विनायक कदम, उमाकांत बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमाणपत्र मिळाल्याने पत्रकारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. या उपक्रमाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील पत्रकार संघाला एआय तंत्रज्ञानाची ओळख मिळाली असून पुढील काळात या प्रशिक्षणाचे प्रत्यक्ष परिणाम पत्रकारितेच्या कामकाजात दिसतील, अशी खात्री आयोजकांनी व्यक्त केली. कार्यशाळेच्या यशस्वीतेमुळे जिल्हा पत्रकार संघाने एम.के.सी.एल.च्या या नव्या आणि नाविन्यपूर्ण पावलाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. जळगाव जिल्ह्यातील पत्रकारिता आता अधिक आधुनिक तंत्रज्ञानासोबत जोडली जात असून यामुळे पत्रकार संघाचे कार्य अधिक परिणामकारक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या कार्यशाळेने पत्रकारितेला एक नवा आयाम दिला असून समाजहितासाठी काम करणाऱ्या पत्रकारांच्या हातात एआय हे एक नवे सक्षम साधन म्हणून रुजले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here