![]()
पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सु.भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर, पाचोरा येथे रविवार दि. ८ सप्टेंबर रोजी “विद्यार्थी गुणगौरव व शैक्षणिक साहित्य वाटप” हा भव्य समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिक्षण संस्थेच्या गौरवशाली परंपरेला अनुसरून या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच शैक्षणिक साहित्याचे दान देत समाजातील दातृत्व जपले गेले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाऊसो. दिलीप ओंकार वाघ हे होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना कष्ट, शिस्त व ज्ञानाची कास धरून प्रगतीचा मार्ग स्वीकारण्याचे प्रेरणादायी विचार व्यक्त केले. बक्षीस वितरण व शैक्षणिक साहित्य वाटप या कार्यक्रमाचा शुभारंभ संस्थेचे चेअरमन नानासो. संजय वाघ, व्हाईस चेअरमन नानासो. व्ही.टी. जोशी व शालेय समिती चेअरमन बापूसो. जगदीश सोनार या मान्यवरांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून शिक्षणसेवेच्या परंपरेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर “आयटीएस” व “एक्सलंट ऑलिंपियाड” या स्पर्धेत उत्कृष्ट यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. या गौरवाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व आत्मविश्वास दाटून आला. शाळेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजवंत विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांना शालेय गणवेश, दप्तर, वह्या आदी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या दानशूर उपक्रमासाठी जय किरण प्रभाजी पतसंस्था, उषाताई अहिरे व नितीन तायडे यांनी योगदान दिले. त्यांच्या या उदात्त दातृत्वामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवास सुलभ होणार असून त्यांना प्रगतीसाठी प्रोत्साहन मिळाले. समारंभात संस्थेचे ज्येष्ठ संचालक बाबासो. विनय जकातदार तसेच कार्यक्रमाचे मान्यवर अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासासोबत चारित्र्यनिर्मिती, शिस्त व सामाजिक जाणिवा विकसित करण्याचा संदेश दिला. यावेळी शालेय समितीचे चेअरमन बापूसो. जगदीश सोनार यांचा वाढदिवसही आनंदाने साजरा करण्यात आला. आमदार भाऊसो. दिलीप वाघ यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करून शुभेच्छा दिल्या गेल्या. सर्व मान्यवरांनी त्यांना अभिष्टचिंतन केले व पुढील आयुष्यासाठी मंगलकामना व्यक्त केल्या. कार्यक्रमास संस्थेचे संचालक अण्णासो. दगाजीराव वाघ, बाबासो. विनय जकातदार, दादासो. खलीलदादा देशमुख, आबासो. भागवत महालपुरे सर, दादासो. विजय देशपांडे, आप्पासो. सतीश चौधरी, दादासो. योगेश पाटील, दादासो. अर्जुनदास पंजाबी, आबासो. अरुण पाटील सर, दादासो. सिताराम पाटील सर, जिभाऊसो. एस.डी. पाटील सर तसेच ज्येष्ठ शिक्षिका लक्ष्माबाई सोनवणे मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला शोभा प्राप्त झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज पवार सर यांनी प्रभावीपणे केले. सूत्रसंचालन वर्षा पाटील मॅडम यांनी उत्साही शैलीत पार पाडले तर आभार प्रदर्शन दीपक पाटील सर यांनी मान्यवर, दातृत्व करणारे व्यक्ती व उपस्थितांचे आभार मानून केले. समारंभाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने एकदिलाने परिश्रम घेतले. त्यांच्या या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीत व भव्यदिव्य पार पडला. एकूणच, “विद्यार्थी गुणगौरव व शैक्षणिक साहित्य वाटप” हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात नवीन उमेद व आत्मविश्वास जागवणारा ठरला. या कार्यक्रमातून शैक्षणिक गुणवंतांचा सन्मान, गरजूंचा आधार व समाजातील दातृत्वाची परंपरा या तिन्ही गोष्टींचे दर्शन घडले. त्यामुळे हा सोहळा संस्थेच्या शैक्षणिक कार्यातील आणखी एक सुवर्णक्षण ठरला.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





