गणेशोत्सव बक्षीस समारंभात बैठक व्यवस्थेवरून वाद; पत्रकार व पोलीस पाटील यांच्यात शाब्दिक चकमक

0

Loading

पाचोरा – येथील पोलीस स्टेशन परिसरात आज जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव मंडळांचा बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला होता. सार्वजनिक सहभाग असलेल्या या महत्त्वाच्या कार्यक्रमाकडून शिस्तबद्ध आयोजन, योग्य प्रोटोकॉल आणि समन्वयाची अपेक्षा असतानाच बैठक व्यवस्थेतील त्रुटींमुळे पत्रकार व पोलीस पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. परिणामी कार्यक्रमाच्या प्रतिष्ठेला तडा जाण्याचा प्रकार घडला असून याची वस्तुनिष्ठ दखल घेणे आवश्यक असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. या समारंभासाठी पुरेशी जागा असलेला सभागृह अथवा योग्य हॉल उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारातच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे आसनव्यवस्था, हालचालींची सोय आणि विविध घटकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या. विशेषतः शासकीय प्रोटोकॉलनुसार प्रत्येक अधिकृत कार्यक्रमात स्वतंत्र पत्रकार कक्ष असणे अपेक्षित असते, जेणेकरून वार्तांकन करताना पत्रकारांना काम सुलभ होईल आणि कार्यक्रमाची माहिती अचूकपणे जनतेपर्यंत पोहोचेल. परंतु या कार्यक्रमात पत्रकारांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले. याच कार्यक्रमासाठी पोलीस पाटील यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. पोलीस पाटील हे पोलीस प्रशासनातील मानधन तत्वावर काम करणारे घटक असून शासकीय नियम व प्रोटोकॉलनुसार ज्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षकांसारखे ज्येष्ठ व श्रेष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असतात, त्या दिवशी वेळेवर नव्हे तर वेळेच्या आधी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात कार्यक्रम सुरू झाल्यानंतर एका पोलीस पाटील यांचा उशिरा प्रवेश झाला. त्या वेळी फोटो व वार्तांकनासाठी उभा असलेला पत्रकार आपल्या खुर्चीवर बसण्याच्या तयारीत असतानाच त्या खुर्चीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. या प्रकाराला पत्रकारांनी विरोध दर्शवताच उशिरा आलेल्या पोलीस पाटील यांचा स्वाभिमान दुखावल्याचे दिसून आले आणि जेष्ठ व मान्यवर अधिकारी उपस्थित असतानाच पत्रकारांशी वादविवाद सुरू झाला. शासकीय नियमांच्या दृष्टीने पाहता, विशेषतः पोलीस पाटील महिला असल्यास अशा प्रकारच्या बैठकीत उशिरा येणे, कार्यक्रमादरम्यान थेट हस्तक्षेप करणे किंवा आसनव्यवस्थेबाबत वाद घालणे हे शासकीय प्रोटोकॉलनुसार योग्य व कायदेशीर मानले जात नाही, अशी माहिती जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या मंचावर आणि उपस्थित मान्यवरांसमोरच झालेल्या या शाब्दिक चकमकीमुळे काही काळ अस्वस्थ वातावरण निर्माण झाले. आयोजकांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र या घटनेमुळे व्यवस्थापनातील उणिवा आणि शासकीय प्रोटोकॉलच्या पालनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले. पत्रकार हे लोकशाहीतील चौथा स्तंभ मानले जातात. सार्वजनिक कार्यक्रमांचे वार्तांकन, माहितीचा प्रसार आणि प्रशासन व नागरिकांमधील दुवा म्हणून त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे पत्रकारांना सन्मानजनक व स्वतंत्र बैठक व्यवस्था देणे ही केवळ सोय नसून आवश्यक बाब आहे. दुसरीकडे, पोलीस पाटील हे ग्रामीण व शहरी प्रशासनातील महत्त्वाचे दुवे असून त्यांचाही मान राखला जाणे तितकेच आवश्यक आहे, मात्र त्यासाठी शासकीय नियम, वेळेची शिस्त आणि अधिकारमर्यादा पाळणे अपेक्षित असते. या घटनेनंतर उपस्थितांमध्ये दोष नेमका कोणाचा आणि याला जबाबदार कोण असे प्रश्न उपस्थित झाले. कार्यक्रमाचे ठिकाण, आसनव्यवस्था, स्वतंत्र कक्षांचे नियोजन आणि उपस्थित घटकांची वेळेची शिस्त याबाबत पूर्वनियोजन केले असते तर हा प्रसंग टाळता आला असता, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. प्रशासनाच्या कार्यक्रमांमध्ये शासकीय प्रोटोकॉलचे काटेकोर पालन केल्यास अशा वादांना आळा घालता येऊ शकतो, असे मतही मांडले गेले. या प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करून भविष्यात अशा प्रकारचे प्रसंग टाळण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे ठरवावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून सार्वजनिक कार्यक्रम हे सन्मान, शिस्त आणि समन्वयाचे प्रतीक ठरावेत, अशी नागरिकांची भावना व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here