![]()
पाचोरा – देशभरातील औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या “ऑल इंडिया केमिस्ट बंद” आंदोलनाला पाचोरा शहर व परिसरातील मेडिकल व्यावसायिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत बुधवारी संपूर्ण दिवस सर्व मेडिकल दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. ऑनलाइन औषध विक्री, अवैध ई-फार्मसी, बनावट औषधांचा वाढता धोका आणि औषध व्यवसायावर वाढत चाललेले कॉर्पोरेट वर्चस्व या गंभीर प्रश्नांविरोधात एकजूट दर्शवत पाचोरा येथील औषध विक्रेत्यांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठ, रुग्णालय परिसर तसेच ग्रामीण भागातील बहुतांश Medical दुकाने पूर्णपणे बंद असल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले. “रुग्णसेवा कायम राहिली पाहिजे, मात्र केमिस्ट व्यवसायही टिकला पाहिजे” अशी भूमिका घेत औषध विक्रेत्यांनी शांततेत आंदोलन करत आपल्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्या. काही अत्यावश्यक परिस्थितीत रुग्णांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी वैद्यकीय सेवा व आपत्कालीन सुविधा मात्र सुरळीत ठेवण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. देशभरात झपाट्याने वाढत असलेल्या ऑनलाइन औषध विक्रीमुळे स्थानिक औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने औषधांची विक्री होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. डॉक्टरांच्या सल्ल्याविना मिळणारी औषधे, चुकीच्या औषधांचा वापर, बनावट औषधांचा वाढता सुळसुळाट आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होण्याची भीती यामुळे सरकारने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. “औषध ही सामान्य वस्तू नसून ती थेट मानवी जीवनाशी निगडित बाब आहे,” अशी भावना उपस्थित मेडिकल संचालकांनी व्यक्त केली. या आंदोलनात सहभागी झालेल्या औषध विक्रेत्यांनी एकत्रित येऊन शासनाच्या धोरणांविषयी नाराजी व्यक्त केली. केवळ व्यवसाय वाचविण्यासाठी नव्हे, तर सुरक्षित औषध वितरण व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी हे आंदोलन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ई-फार्मसीच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची अनियंत्रित विक्री होऊ नये, औषध वितरणात प्रशिक्षित फार्मासिस्टची भूमिका अनिवार्य ठेवावी आणि स्थानिक मेडिकल व्यावसायिकांचे संरक्षण करावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. जळगाव जिल्हा मेडिकल डिलर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली या बंदचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याने औषध विक्रेत्यांमध्ये असलेली अस्वस्थता आणि एकजूट स्पष्टपणे दिसून आली. पाचोरा शहरातील मेडिकल संचालकांनी देखील एकत्र येऊन या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शविला. शहरातील विविध भागातून मेडिकल व्यावसायिक एकत्र आले आणि प्रशासनाला निवेदन सादर करून आपल्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती केली. यावेळी पाचोरा येथील प्रांत अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे तसेच पोलीस निरीक्षक राहुल पवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये ऑनलाइन औषध विक्रीवर नियंत्रण आणणे, अवैध ई-फार्मसीवर कारवाई करणे, बनावट औषधांच्या विक्रीला आळा घालणे तसेच औषध व्यवसाय सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस धोरण राबविण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनानेही निवेदन स्वीकारत संबंधित मागण्या शासन स्तरावर पोहोचविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उपस्थितांनी दिली. दरम्यान, दिवसभर मेडिकल दुकाने बंद असल्याने शहरात या आंदोलनाची व्यापक चर्चा रंगली होती. अनेक नागरिकांनीही औषध विक्रेत्यांच्या काही मागण्यांना पाठिंबा दर्शवत “आरोग्य सेवा सुरक्षित राहणे ही काळाची गरज आहे” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. औषध विक्रेत्यांनी केलेल्या या एकजुटीमुळे शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
































