Home Dhyeya News Special लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्काराने पत्रकार प्रमोद बारी गौरविले; पत्रकारिता व...

लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्काराने पत्रकार प्रमोद बारी गौरविले; पत्रकारिता व समाजसेवेच्या कार्याला राज्यस्तरीय दाद

0
19

Loading

पाचोरा  – समाजातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत पत्रकारितेच्या माध्यमातून लोकहिताचा आवाज बुलंद करणारे तसेच विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदविणारे जनलक्ष्य न्यूजचे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सुपडू बारी यांना यंदाचा “लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार – २०२६” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे पाचोरा शहरासह कृष्णापुरी परिसराच्या नावाला विशेष मान्यता मिळाली असून विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. यशवंत सेना महाराष्ट्र राज्य आणि जय मल्हार शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला राज्यभरातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पत्रकारिता आणि जनसेवा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमस्थळी उत्साहपूर्ण वातावरणात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अरणेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य तुळशिराम भोजने होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या लोककल्याणकारी कार्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात झाली. पत्रकार प्रमोद बारी यांनी अनेक वर्षांपासून समाजातील विविध प्रश्न, नागरिकांच्या अडचणी, शासकीय योजनांचा लाभ, लोकहिताशी संबंधित विषय तसेच विकासाच्या मुद्द्यांवर प्रभावी पत्रकारिता करत जनतेचा विश्वास संपादन केला आहे. पत्रकारितेच्या जबाबदारीसोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध जनजागृती उपक्रम, सामाजिक अभियान आणि गरजू घटकांच्या मदतीसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जाते. त्यांच्या या सातत्यपूर्ण, प्रामाणिक आणि जनकेंद्री कार्याची दखल घेत निवड समितीने त्यांची जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड केली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले. या सन्मानामुळे पाचोरा शहरातील पत्रकारिता क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. कृष्णापुरी परिसरातील नागरिक, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी तसेच विविध संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रमोद बारी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुनील नजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजय जाडकर यांनी मानले. सामाजिक बांधिलकी, लोकसेवा आणि मूल्याधिष्ठित पत्रकारितेचा गौरव करणारा हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहील असा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!