Home Dhyeya News Special श्री. गो. से. हायस्कूलमध्ये कलागुणांना मिळते योग्य दिशा; भूमी पाटीलची महाराष्ट्रात प्रथम...

श्री. गो. से. हायस्कूलमध्ये कलागुणांना मिळते योग्य दिशा; भूमी पाटीलची महाराष्ट्रात प्रथम येत उज्ज्वल कामगिरी

0
67

Loading

पाचोरा  – विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणे आणि भविष्यातील करिअरच्या विविध संधींकडे सक्षमपणे वाटचाल करण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन करणे, ही परंपरा जपणाऱ्या पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा ने आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे. शाळेची माजी विद्यार्थिनी भूमी मनोज पाटील हिने कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या उच्च कला परीक्षेतील कलाशिक्षक पदविका वर्ग द्वितीय वर्षात महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवून शाळेसह संपूर्ण पाचोरा शहराचा अभिमान उंचावला आहे. सध्या भूमी पाटील ही स्वर्गीय अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालय, पाचोरा येथे कलाशिक्षक पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असून तिने ही परीक्षा डिस्टिंक्शनसह उत्तीर्ण केली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामागे सातत्यपूर्ण परिश्रम, अभ्यासातील शिस्त, चित्रकलेप्रती असलेली निष्ठा आणि बालपणापासून जोपासलेली कलात्मक आवड महत्त्वाची ठरली आहे. भूमीच्या चित्रकलेचा पाया तिचे वडील मनोज पाटील यांनी घालून दिला. घरातून मिळालेली कलेची प्रेरणा आणि शालेय जीवनात मिळालेले प्रोत्साहन यामुळे तिच्या प्रतिभेला योग्य दिशा मिळाली. श्री. गो. से. हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना तिच्या कलागुणांना सातत्याने प्रोत्साहन देण्यात आले. विविध चित्रकला स्पर्धा, सर्जनशील उपक्रम, प्रदर्शन आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून तिच्या आत्मविश्वासात सातत्याने वाढ झाली. विद्यार्थ्यांमधील क्षमता ओळखून त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देणे, हेच या शाळेचे वैशिष्ट्य असून भूमीच्या यशातून त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर देणारी श्री. गो. से. हायस्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दडलेल्या गुणवत्तेचा शोध घेऊन त्याला योग्य संधी उपलब्ध करून देण्याची शाळेची कार्यपद्धती अनेक विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर यश मिळवून देत आहे. भूमी पाटीलच्या या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेतर्फे तिचा गौरवपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक एन. आर. पाटील, उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, पर्यवेक्षक महेश कोंडीन्य, कार्यालय प्रमुख अजय सिनकर उपस्थित होते. उपस्थितांनी भूमीच्या यशाचे कौतुक करत तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामध्ये कलाशिक्षक सुनील भीवसने, सुबोध कांतायन, प्रमोद पाटील आणि ज्योती पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा देत त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्यासाठी प्रेरित करणाऱ्या श्री. गो. से. हायस्कूलची ही आणखी एक अभिमानास्पद कामगिरी मानली जात असून भूमी पाटीलचे यश आगामी विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!