Home Dhyeya News Special पाचोऱ्यातील अवैध धंद्यांविरोधात एकलव्य आदिवासी संघटना आक्रमक; १५ ऑगस्टला ‘सट्टा-पत्ता खेलो आंदोलन’

पाचोऱ्यातील अवैध धंद्यांविरोधात एकलव्य आदिवासी संघटना आक्रमक; १५ ऑगस्टला ‘सट्टा-पत्ता खेलो आंदोलन’

0
177

Loading

पाचोरा : शहरातील काही भागांमध्ये सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध सट्टा-पत्ता तसेच अन्य गैरप्रकारांविरोधात एकलव्य आदिवासी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने केवळ कागदपत्रे रेकॉर्ड तयार करून वरवरची कारवाई न करता कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. यासंदर्भात एकलव्य आदिवासी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर आत्माराम वाघ यांनी पाचोरा विभागाचे डीवायएसपी बापू रोहन यांना निवेदन देऊन संबंधित अवैध धंदे तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे. निवेदनाची दखल घेऊन ठोस कारवाई झाली नाही, तर दि. १५ ऑगस्ट रोजी ‘सट्टा-पत्ता खेलो आंदोलन’ करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शहरातील जारगाव चौफुली, नगरपालिका जिन, स्टेशन रोड, एम.एम. कॉलेज चौक आणि आठवडे बाजार यांसह विविध परिसरांमध्ये सट्टा-पत्ता व अन्य अवैध प्रकार सुरू असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. कारवाईनंतर काही काळ हे प्रकार थांबलेले दिसतात; मात्र त्यानंतर पुन्हा वेगळ्या पद्धतीने सुरू होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे केवळ काही दिवसांची कारवाई करून प्रश्न सुटणार नसून, या प्रकारांच्या मुळापर्यंत जाऊन संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची गरज असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. अवैध सट्टा-पत्त्याचा सर्वाधिक परिणाम कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबांवर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दिवसभर मेहनत करून मिळविलेली कमाई अशा प्रकारांमध्ये खर्च होत असल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. युवकांमध्ये अशा प्रवृत्ती वाढल्यास त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षण, रोजगार आणि भविष्यातील वाटचालीवर होऊ शकतो, असा मुद्दाही संघटनेने उपस्थित केला आहे. अवैध आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन मिळाल्यास त्यातून पुढे वाद, भांडणे, कर्जबाजारीपणा आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना चालना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस व प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. निवेदनात प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. कारवाई झाल्यानंतर प्रत्यक्ष ठिकाणी काही दिवस शांतता दिसते; परंतु त्यानंतर पुन्हा हे प्रकार सुरू होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणांवर सातत्याने देखरेख ठेवणे, तक्रारींची गांभीर्याने पडताळणी करणे आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, प्रशासनाने अवैध धंद्यांविरोधात ठोस पावले न उचलल्यास १५ ऑगस्ट रोजी ‘सट्टा-पत्ता खेलो आंदोलन’ करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनातून शहरातील अवैध धंद्यांविरोधातील नागरिकांचा असंतोष प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा संघटनेचा प्रयत्न राहणार आहे. आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. हे निवेदन एकलव्य आदिवासी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर आत्माराम वाघ आणि जळगाव जिल्हाध्यक्ष एकनाथ अहिरे यांच्या वतीने पाचोरा विभागाचे डीवायएसपी बापू रोहन यांना देण्यात आले. यावेळी संघटनेने अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण आणून नागरिकांना दिलासा देण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. आता या निवेदनानंतर पोलिस प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे पाचोरा शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!