![]()
पाचोरा : पोस्ट ऑफिसमध्ये कामासाठी गेलेल्या नागरिकाला नेमके कोणत्या खिडकीवर जायचे, कोणते काम कुठे होते, कार्यालयीन वेळ काय आहे आणि डाक विभागाचे परिपत्रक व नियमा नुसार भोजनावकाशाची वेळ कोणती, याची स्पष्ट माहिती मिळाली तर नागरिकांचा वेळ वाचू शकतो आणि ग्राहकसेवाही अधिक सुलभ होऊ शकते. याच उद्देशाने पाचोरा पोस्ट ऑफिसच्या कामकाजाबाबत करण्यात आलेल्या तक्रारीची जळगाव डाक विभागाने दखल घेतली असून, ग्राहकसेवा सुधारण्यासाठी विविध प्रशासकीय सूचना देण्यात आल्या आहेत. Dhyeya News & सा. झुंजचे संपादक संदीप दा. महाजन यांनी दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी ई-मेलद्वारे पाचोरा पोस्ट ऑफिसच्या कामकाजाबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी करून जळगाव विभागाचे Supdt of Post Offices यांनी दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी पत्राद्वारे संबंधितांना आवश्यक निर्देश दिल्याचे स्पष्ट केले आहे. तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा येथील Sub Postmaster यांना सर्व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी व्यवहार करताना तत्परता, दक्षता आणि योग्य कार्यपद्धती ठेवावी तसेच नागरिकांना टाळता येण्यासारखी गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाचोरा पोस्ट ऑफिसमध्ये शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक विविध कामांसाठी येतात. त्यातील अनेक ग्राहकांना काउंटरच्या काचेवर नमूद असलेले इंग्रजीतील शॉर्ट फॉर्म सहज समजत नसल्याने चुकीच्या रांगेत उभे राहण्याची वेळ येते. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर क्रमांक आल्यावर संबंधित काम दुसऱ्या खिडकीवर असल्याचे सांगितले जाते आणि पुन्हा रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे कोणत्या खिडकीवर कोणते कामकाज केले जाते, याची माहिती मराठी भाषेत मोठ्या, स्पष्ट आणि प्रथमदर्शनी दिसेल अशा दिशादर्शक फलकावर असणे अत्यावश्यक असल्याची मागणी तक्रारीत करण्यात आली होती. या मागणीची गरज लक्षात घेता प्रत्येक काउंटरवर बचत खाते, पैसे जमा-काढणे, स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपाल, पार्सल, मनीऑर्डर, इतर उपलब्ध सेवा आदी कामांची स्पष्ट माहिती मराठीत दर्शविणारी व्यवस्था करणे उपयुक्त ठरणार आहे. केवळ काचेवर लहान अक्षरांत किंवा इंग्रजीतील संक्षिप्त स्वरूपात माहिती देणे ग्रामीण आणि अल्पशिक्षित ग्राहकांसाठी पुरेसे ठरत नाही. ग्राहकाने रांगेत उभे राहण्यापूर्वीच आपले काम कुठे होणार आहे, हे त्याला समजले पाहिजे, हा या तक्रारीमागील प्रमुख मुद्दा आहे. याच अनुषंगाने एक महत्त्वाचा सामाजिक उपक्रम म्हणून झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूज यांच्या सौजन्याने संपादक संदीप दा. महाजन यांनी पाचोरा पोस्ट ऑफिससाठी आवश्यक असलेले मराठी दिशादर्शक फलक स्वखर्चाने तयार करून देण्याची तयारी दर्शविली आहे. कोणत्या खिडकीवर कोणते कामकाज होते, कार्यालयीन कामकाजाची वेळ किती आहे आणि भोजनावकाशाची वेळ कोणती आहे, याची माहिती नागरिकांना सहज समजावी यासाठी आवश्यक फलक तयार करून देण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी पाचोरा पोस्टमास्तर यांनी आवश्यक असल्यास लेखी स्वरूपात कळवावे, त्यानंतर संबंधित माहितीच्या आधारे फलक तयार करून देण्याची तयारी असल्याचे संदीप महाजन यांनी सांगितले. दरम्यान, कार्यालयात कार्यरत प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याच्या ठिकाणी त्यांचे नाव, पद आणि त्यांच्याकडे सोपविण्यात आलेले कामकाज स्पष्ट करणारी नामफलक व्यवस्था असावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ग्राहकाला आपल्या कामासाठी नेमक्या कोणत्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्याशी संपर्क साधायचा, हे सहज समजणे हा पारदर्शक प्रशासनाचा महत्त्वाचा भाग आहे. तक्रारीत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अप-डाऊनच्या मुद्द्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. पाचोरा पोस्ट ऑफिसमध्ये बाहेरून ये-जा करणारे अधिकारी व कर्मचारी किती आहेत, त्यांचे पाचोरा शहरातील प्रत्यक्ष निवासस्थान कोठे आहे आणि ते कार्यालयीन वेळेत नियमित उपस्थित असतात का, याची वस्तुनिष्ठ पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक तसेच प्रत्यक्ष उपस्थिती तपासली जात असल्याचे विभागाच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहतील आणि एखाद्याच्या अनुपस्थितीचा परिणाम ग्राहकसेवेवर होणार नाही, याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. भोजनावकाशाच्या वेळेत ग्राहकसेवा पूर्णपणे ठप्प होऊ नये आणि आवश्यक सेवा सुरळीत सुरू राहावी, यासाठीही संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण भागातून येणारे ग्राहक आणि विशेष सहाय्याची आवश्यकता असलेल्या व्यक्तींना सेवा देताना अधिक तत्परता व सौजन्य राखण्यावर भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील नागरिक अनेकदा दूरवरून पाचोरा येथे येत असल्याने त्यांना किरकोळ कारणांसाठी पुन्हा-पुन्हा पोस्ट ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, ही बाब महत्त्वाची ठरते. याशिवाय वृत्तपत्रांसाठी सवलतीच्या दरात वापरल्या जाणाऱ्या २५ पैशांच्या टपाल तिकिटांची उपलब्धता होत नसल्याचा मुद्दाही तक्रारीत उपस्थित करण्यात आला होता. वृत्तपत्र क्षेत्रातील नियमित टपाल व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या या तिकिटांची उपलब्धता आणि त्याबाबतची व्यवस्था याकडेही संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तक्रारीच्या चौकशीत कोणत्याही विशिष्ट अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर निलंबन, दंड अथवा शिस्तभंगाची कारवाई झाल्याचे नमूद नाही. मात्र ग्राहकसेवा, कार्यालयीन शिस्त, काउंटर व्यवस्था, कर्मचारी उपस्थिती आणि सेवा वेळेबाबत वरिष्ठ स्तरावरून सूचना देण्यात आल्याने तक्रारीची प्रशासकीय दखल घेतली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांना माहिती मिळविण्यासाठी रांगेत उभे राहून आपला क्रमांक येण्याची प्रतीक्षा करण्यापेक्षा, कार्यालयात प्रवेश करताच आवश्यक दिशादर्शन मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे मराठीतील स्पष्ट दिशादर्शक फलक, अधिकारी-कर्मचाऱ्यांची ओळख व जबाबदारी, कार्यालयीन वेळेची माहिती आणि ग्राहकाभिमुख सेवा व्यवस्था यामुळे पाचोरा पोस्ट ऑफिसच्या कामकाजात निश्चितच सुसूत्रता येऊ शकते. आता पाचोरा पोस्टमास्तरांकडून या दिशादर्शक फलकांच्या प्रस्तावाबाबत लेखी प्रतिसाद दिला जातो का आणि जळगाव डाक विभागाने दिलेल्या निर्देशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावी होते, याकडे पाचोरा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.





























