![]()
पाचोरा : पाचोरा व भडगाव तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पावसाने मोठा खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांसमोर रब्बी हंगाम वाचविण्याचे गंभीर संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान देण्यासाठी गिरणा, बहुळा व परिसरातील अन्य धरणांच्या कालव्यांद्वारे सिंचनासाठी 3 आवर्तने सोडण्यात यावीत, अशी आग्रही मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा-भडगावचे सभापती गणेश भीमराव पाटील यांनी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या महत्त्वपूर्ण प्रश्नाची आमदार किशोरआप्पा पाटील यांनीही आपल्या स्तरावरून गांभीर्याने दखल घेऊन संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करावा व आवश्यक कार्यवाहीसाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती बाजार समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यंदा पाचोरा व भडगाव तालुक्यांत पावसाने मोठा खंड दिल्याने शेतीचे संपूर्ण गणित बिघडले आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेल्या मर्यादित पाणीसाठ्याच्या आधारावर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी व लागवड केली आहे. मात्र, आगामी काळात पाऊस न झाल्यास पाण्याअभावी उभी पिके वाळून जाण्याची आणि शेतकऱ्यांनी बियाणे, खते, मशागत व लागवडीसाठी केलेला खर्च पूर्णपणे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे गिरणा, बहुळा व परिसरातील बहुतांश धरणे यंदा मोठ्या प्रमाणात भरलेली असून, निवेदनानुसार अद्यापही धरणांमध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून त्याचा लाभ दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाची दखल घेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने दि. 26 ऑक्टोबर 2026 रोजी झालेल्या मासिक सभेत ठराव क्रमांक 13/1 अन्वये गिरणा व बहुळा धरणांच्या कालव्यांद्वारे 3 आवर्तने सोडण्याबाबतचा ठराव मंजूर केला आहे. या ठरावाच्या अनुषंगाने सभापती गणेश भीमराव पाटील यांनी दि. 04 नोव्हेंबर 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत निवेदन सादर केले आहे. या निवेदनात केवळ शेतीच्या सिंचनाचाच नव्हे, तर पिण्याच्या पाण्याची गरज आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचाही विचार करून गिरणा, बहुळा व अन्य धरणांच्या कालव्यांद्वारे 3 आवर्तने सोडण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे. पाचोरा व भडगाव तालुक्यांची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असून, रब्बी हंगाम हातचा गेल्यास शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना केवळ नियोजनाअभावी शेतकऱ्यांची उभी पिके उद्ध्वस्त होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग तसेच संबंधित यंत्रणांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करावी. त्याचबरोबर आमदार किशोरआप्पा पाटील यांनीही आपल्या लोकप्रतिनिधीच्या नात्याने या प्रश्नात लक्ष घालून शासन व प्रशासन स्तरावर पाठपुरावा करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. आता या मागणीला जिल्हा प्रशासन आणि वरिष्ठ स्तरावर कसा प्रतिसाद मिळतो, याकडे पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.





























