Home Dhyeya News Special वृद्धाश्रमाच्या वात्सल्यसेवेचा गौरव : पाचोऱ्याची डॉ. अपर्णा देशमुख यांना राज्यस्तरीय सेवाव्रती पुरस्काराने...

वृद्धाश्रमाच्या वात्सल्यसेवेचा गौरव : पाचोऱ्याची डॉ. अपर्णा देशमुख यांना राज्यस्तरीय सेवाव्रती पुरस्काराने सन्मान

0
412

Loading

मुंबई – (झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज मंत्रालय प्रतिनिधी ) पाचोरा येथील श्री गो से हायस्कूल या शिक्षणाच्या पवित्र भूमीतून निघून पुण्यासारख्या महानगरात आपली सेवा वृत्ती आणि संवेदनशीलता जपत अनेक गरजू, निराधार, वृद्धांसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या डॉ. अपर्णा देशमुख यांना नुकताच राज्यस्तरीय ‘गिरजाई सेवाव्रती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला असून, पाचोरा येथील श्री गो.से.हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनीचा या कार्याचा सन्मान म्हणजे पाचोऱ्यासाठीही गौरवाची बाब ठरली आहे.
सध्या पुणे येथील सिंहगड रोड परिसरात वास्तव्य असलेल्या डॉ. अपर्णा देशमुख या गेली तब्बल १५ वर्षे “आभाळमाया वृद्धाश्रम” या संस्थेच्या माध्यमातून निराधार, एकटे पडलेले, उपेक्षित आणि आजारी वृद्धांना मायेची सावली देण्याचे काम करीत आहेत. त्यांचे हे कार्य केवळ समाजकारण नव्हे, तर एक भावनिक, आध्यात्मिक आणि मानवतेच्या पातळीवरील समर्पण आहे. त्यांच्या वृद्धाश्रमात सध्या ८१ ज्येष्ठ नागरिक सन्मानपूर्वक आणि मायेच्या छायेखाली राहत आहेत.
डॉ. अपर्णा देशमुख या मूळच्या चाळीसगाव तालुक्यातील असून त्यांचे वैद्यकीय शिक्षण भारती विद्यापीठ, पुणे येथे पूर्ण झाले. त्या पाचोरा येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन) डॉ. अनिल देशमुख आणि सौ. निर्मला देशमुख यांची कन्या आहेत. डॉ. अनिल देशमुख हे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत अशासकीय सदस्य, तसेच ग्राहक तक्रार निवारण आयोगात मध्यस्थ पॅनल सदस्य (धुळे) अशा विविध जबाबदारीच्या भूमिका पार पाडत आहेत. अपर्णा यांचे सामाजिक भान आणि मूल्यनिष्ठ वृत्ती यांचा पाया याच घरातील संस्कारांतून घडलेला आहे.
डॉ. अपर्णा देशमुख यांनी आजवर सुमारे ५००० वृद्धांना सुसंस्कारी, मायेचा आणि सेवाभावाचा सहवास दिला आहे. त्यांच्या प्रयत्नांतून जवळपास ४००० हून अधिक गरजू वृद्ध रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. हे सारे कार्य त्या कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय, पूर्णपणे आपल्या कुटुंबाच्या पाठबळावर आणि आपल्याच मेहनतीवर करत आहेत. हे कार्य म्हणजे केवळ आरोग्य सेवा नव्हे, तर एक सामाजिक क्रांती आहे.
या असामान्य, अद्वितीय आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत ठाणे येथील “गिरजाई प्रतिष्ठान” या सेवाभावी संस्थेने मातोश्री स्व. गिरजाई ठुसे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय “गिरजाई सेवाव्रती पुरस्कार” यावर्षी डॉ. अपर्णा देशमुख यांना जाहीर केला. हा पुरस्कार “आनंद दिघे विश्व गुरुकुल विधी महाविद्यालय”, ठाणे येथे एका भव्य आणि गरिमामय सोहळ्यात डॉ. अपर्णा देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्याला उपस्थित असलेले मान्यवर हे देखील समाजात प्रतिष्ठा लाभलेले, सेवाभावाने ओतप्रोत भरलेले होते. प्रमुख अतिथी म्हणून स्व. कॅप्टन विनायक गोरे यांची वीरमाता, लेखिका आणि व्याख्यात्या अनुराधा गोरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास ठुसे, मानद सचिव सौ. विदुला ठुसे, संपदा वागळे, प्रदीप धवल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा वागळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. विदुला ठुसे यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खुद्द प्रदीप धवल होते.या कार्यक्रमात शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रु.२५,०००/- चा धनादेश देऊन डॉ. अपर्णा देशमुख यांचा गौरव करण्यात आला. यावेळी संपदा वागळे यांनी डॉ. अपर्णा देशमुख यांच्या कार्याचे आणि त्यांच्या पालकांचे विशेष गौरवोद्गार काढत, “असे सुसंस्कारित कार्यकर्ते समाजाला लाभणे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते”, असे भावनिक उद्गार काढले. डॉ. अपर्णा देशमुख यांना यापूर्वीही विविध मान्यवर संस्था, प्रतिष्ठान व राष्ट्रीय स्तरावरील संघटनांनी गौरविले आहे. यामध्ये सन २०२२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांताच्या वतीने “श्रीस्वामी विवेकानंद युवा पुरस्कार”, सद्गुरु सांगवडेकर रुकडीकर महाराज यांचा “माऊली आनंदी पुरस्कार”, मदर तेरेसा पुरस्कार, दैनिक लोकसत्ता समूहाचा “नवदुर्गा पुरस्कार”, रोटरी इंटरनॅशनलचा “व्होकेशनल सेवा पुरस्कार”, जर्नलिस्ट असोसिएशनचा “नवदुर्गा पुरस्कार”, एनआरआय पॅरेंट्स असोसिएशनचा सन्मानपत्र, भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख बहुउद्देशीय संस्थेचा राज्यस्तरीय नारीशक्ती गौरव पुरस्कार आदींचा समावेश होतो. या सर्व पुरस्कारांनी त्यांच्या कार्याची व्यापक दखल घेतली आहे.आजवर त्यांना अनेक मान्यवर व्यक्तींचे शुभाशीर्वाद लाभले आहेत. त्यामध्ये क्रिकेटपटू विराट कोहली, कमेंटेटर सुनंदन लेले, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, तबलावादक स्व. झाकिर हुसेन, अभिनेता नाना पाटेकर, ग्राहक संरक्षण मंत्री स्व. नामदार गिरीश बापट, माजी आमदार दादासाहेब पवार, आमदार शिवाजीराव कोंडे, प्रसिद्ध वकील ॲड. उज्ज्वल निकम, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय सचिव अरुण देशपांडे, माजी अन्न सुरक्षा आयोग महाराष्ट्राचे महेश ढवळे, केंद्रीय प्रतिनिधी विजय सागर, प्रांत प्रतिनिधी शुभदा नागपूरकर, किसान सेवा संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा कपिला मुठे, माजी आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, माजी विक्रीकर आयुक्त कृष्णराव शेलार, इस्रो आणि नासाचे शास्त्रज्ञ अविनाश शिरोडे, पशुवैद्यकीय क्षेत्रातील डॉ. प्रदीप घळसासी, हिसार विद्यापीठाचे डॉ. विवेक कुलकर्णी, मंत्री दत्ताजी सावंत यांचे विशेष अधिकारी डॉ. जगन्नाथ सोनवणे, डॉ. वाय.डी. पाटील, डॉ. सुधाकर निर्मल यांचा विशेष उल्लेख करता येईल.
पुरस्कार स्वीकृती वेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. अपर्णा देशमुख म्हणाल्या, “हा पुरस्कार माझ्या मातापित्याच्या संस्कारांचा आणि त्यांच्याच प्रेरणेचा सन्मान आहे. मी सौभाग्यशाली आहे की माझ्या आदर्श वडिलांच्या सान्निध्यात, त्यांच्या उपस्थितीत मी हा सन्मान स्वीकारला. ही केवळ माझीच नव्हे तर आभाळमायेतील सर्व वृद्धांची सेवा, त्यांच्यावर असलेले प्रेम आणि त्यांच्या डोळ्यांत दिसणारा विश्वास यांची पावती आहे.”
या सन्मान सोहळ्याला विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळांच्या सदस्य, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर, वृद्धाश्रमाचे हितचिंतक आणि पुणे तसेच ठाणे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या साऱ्यांच्या उपस्थितीने सोहळ्याला अधिक भारदस्त आणि भावनिक वातावरण लाभले.
डॉ. अपर्णा देशमुख यांचे हे सेवाभावाचे कार्य आजच्या तरुण पिढीसाठी एक आदर्श आहे. स्वतःच्या वैद्यकीय शिक्षणाचा लाभ केवळ आर्थिक उन्नतीसाठी न घेता, समाजासाठी, गरजूंसाठी वापरण्याचे त्यांनी दाखवलेले उदाहरण हे समाजात सकारात्मक बदल घडविणारे आहे. त्यांच्या कार्यातून समाजात एक नवा आदर्श निर्माण होत असून, ‘नवा भारत घडवायचा असेल तर अशा सेवाव्रतींची संख्या वाढवावी लागेल’, हे स्पष्ट होते.या संपूर्ण गौरव सोहळ्याचा शेवट समाधानकारक, प्रेरणादायी आणि समाजाला दिशा देणारा ठरला. डॉ. अपर्णा देशमुख यांना मिळालेला हा सेवाव्रती पुरस्कार हे केवळ एक सन्मानपत्र नाही, तर एका व्यापक सामाजिक क्रांतीचा गौरव आहे – जी माणुसकीच्या मूळ गाभ्याशी जोडलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!