Home Dhyeya News Special कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयाला अनुभवी नेतृत्वाची साथ; सविता ताड (दत्तु)...

कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयाला अनुभवी नेतृत्वाची साथ; सविता ताड (दत्तु) यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती

0
378

Loading

पाचोरा – शहरातील कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी सेवाजेष्ठ शिक्षिका सविता शशिकांत ताड (दत्तू मॅडम) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १ मे २०२६ या महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने घेतलेल्या या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात समाधानाची भावना व्यक्त होत असून, दीर्घ अनुभव आणि निष्ठेच्या बळावर त्यांनी मिळवलेले हे पद त्यांच्या कार्याचा योग्य गौरव मानला जात आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. नगराध्यक्ष तात्यासो. पंडित शिंदे, उपाध्यक्ष निरज मुनोत, सचिव दादासो ॲड.जे डी काटकर, भाजपा युवा नेते अमोलभाऊ शिंदे तसेच सहसचिव मुख्याध्यापक शिवाजी शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या प्रगतीत त्यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सविता शशिकांत ताड (दत्तु) यांचा प्रवास हा जिद्द, परिश्रम आणि सातत्याचा आदर्श ठरतो. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील माहेर असलेल्या ताड (दत्तु) मॅडम यांचे डिसेंबर १९९८ मध्ये विवाह झाला आणि त्यानंतर त्या पाचोरा येथे सासरी स्थायिक झाल्या. शिवाजीनगर येथील स्वर्गीय माजी नगरसेवक सिताराम दत्तु यांच्या त्या स्नुषा असून, श्री गो से हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक संजय दत्त यांच्या त्या पत्नी आहेत. कुटुंबातील शैक्षणिक व सामाजिक परंपरेचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे नेला आहे. शिक्षणाची ओढ कायम ठेवत त्यांनी जळगाव येथे बी.एड. पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली. १ ऑगस्ट २००१ रोजी शिक्षक म्हणून त्यांनी सेवेत प्रवेश केला आणि तेव्हापासून सलग २६ वर्षे गणित व विज्ञान विषयाचे अध्यापन करत विद्यार्थ्यांच्या घडणीत मोलाची भूमिका बजावली आहे. कठीण विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची त्यांची शैली विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली आहे. त्यांच्या अध्यापनातून केवळ ज्ञान देणे नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जिज्ञासा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यावर त्यांनी भर दिला. शाळेच्या निकालात सातत्याने वाढ व्हावी यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि नियोजन कौतुकास्पद ठरले आहे. विविध शैक्षणिक उपक्रम, मार्गदर्शन सत्रे आणि स्पर्धा परीक्षांची तयारी यामधून विद्यार्थ्यांना त्यांनी सक्षम बनवले आहे. ताड (दत्तु) मॅडम यांनी शाळेच्या व्यवस्थापनातही सक्रिय सहभाग घेतला असून शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यात समन्वय राखण्याचे काम प्रभावीपणे केले आहे. शिस्त, पारदर्शकता आणि संवेदनशीलता या गुणांच्या जोरावर त्यांनी शाळेत सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे. मुख्याध्यापकपदाची धुरा स्वीकारताना त्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी नवे उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आधुनिक शिक्षणपद्धती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष लक्ष देण्याचा त्यांचा मानस आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि ते स्पर्धात्मक जगात सक्षमपणे उभे राहावेत, यासाठी त्या कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या नियुक्तीमुळे विद्यालयात नवचैतन्य निर्माण झाले असून शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि पालक यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. अनुभवी आणि समर्पित नेतृत्वाच्या बळावर कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालय आगामी काळात अधिक प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. सविता शशिकांत ताड (दत्तु) यांचा प्रेरणादायी प्रवास अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत असून त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या यशाची नवी दिशा निश्चित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!