Home Dhyeya News Special जिद्दीच्या जोरावर भाजी विक्रेत्याच्या मुलाची भरारी ; श्री गो से हायस्कूलचा हर्षल...

जिद्दीच्या जोरावर भाजी विक्रेत्याच्या मुलाची भरारी ; श्री गो से हायस्कूलचा हर्षल चौधरी ठरला यशाचा प्रेरणादायी चेहरा

0
929

Loading

पाचोरा – शहरातील भारतीय नगर परिसरातील एका साध्या भाड्याच्या घरातून उभा राहिलेला संघर्ष आज संपूर्ण शहरासाठी अभिमानाचा विषय ठरला आहे. आर्थिक अडचणी, मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थिती यांना न जुमानता भाजीपाला विक्रेता शैलेंद्र निंबा चौधरी यांचा मुलगा चिरंजीव हर्षल शैलेंद्र चौधरी याने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ९३.४० टक्के गुण मिळवत पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो से हायस्कूल पाचोरा या विद्यालयातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे प्रथम क्रमांक केवळ अर्ध्या टक्क्याने हुकला असला तरी हर्षलने मिळवलेले यश हे अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शहरातील भाजीपाला मार्केटमध्ये रोज पहाटेपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करणारे शैलेंद्र चौधरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अत्यंत प्रामाणिकपणे करत आहेत. हातावर पोट असलेल्या या कुटुंबासाठी प्रत्येक दिवस हा संघर्षाचा असतो. घरामध्ये आधुनिक शैक्षणिक सुविधा नाहीत, स्वतंत्र अभ्यासिका नाही, महागडे क्लासेस नाहीत, तरीही मुलाने मोठे व्हावे, शिक्षण घेऊन स्वतःचे आयुष्य घडवावे हीच त्यांची एकमेव इच्छा होती. आपल्या कष्टाच्या कमाईतून त्यांनी मुलांना शिक्षणासाठी श्री गो से हायस्कूलमध्ये प्रवेश दिला आणि मुलानेही त्या विश्वासाचे सोनं करून दाखवले. हर्षल चौधरी हा लहानपणापासूनच अभ्यासू आणि शांत स्वभावाचा विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. शाळेत नियमित उपस्थिती, अभ्यासातील सातत्य आणि शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन ही त्याची खासियत होती. अनेकदा घरातील परिस्थितीमुळे अभ्यासात अडथळे आले, तरी त्याने हार मानली नाही. इतर मुलांप्रमाणे महागडी साधने नसतानाही पुस्तकांशी मैत्री करत त्याने स्वतःला अभ्यासात झोकून दिले. “अभ्यास हाच माझा मार्ग आहे,” ही भावना त्याच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत होती. हर्षलने वेळेचे अत्यंत नियोजनबद्ध व्यवस्थापन केले. सकाळपासून रात्रीपर्यंतचा प्रत्येक क्षण त्याने योग्य पद्धतीने वापरला. मोबाईल, मनोरंजन आणि इतर आकर्षणांपासून स्वतःला दूर ठेवत त्याने ध्येयावर लक्ष केंद्रित केले. अनेकदा वडिलांच्या दुकानात मदत करूनही त्याने अभ्यासात खंड पडू दिला नाही. आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव त्याला होती आणि त्या कष्टांचे चीज करायचे, हीच त्याच्या मनातील सर्वात मोठी प्रेरणा होती. या यशामागे श्री गो से हायस्कूलच्या शिक्षकांचेही मोठे योगदान असल्याचे हर्षलने सांगितले. मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे तर आत्मविश्वास आणि जिद्द देण्याचे काम आपल्या शिक्षकांमार्फत व वेळेप्रसंगी प्रत्यक्ष लक्ष केंद्रित केले शिक्षकांनी सुद्धा वेळोवेळी घेतलेले मार्गदर्शन, सराव परीक्षा, शंका निरसन आणि मानसिक आधार यामुळेच आपण हे यश मिळवू शकलो, अशी भावना हर्षलने व्यक्त केली. उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, पर्यवेक्षिका सौ. गोहिल, आर. बी. बांठिया, महेश कौडिण्य यांच्यासह सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने परिश्रम घेतले. हर्षलच्या यशानंतर घडलेली एक घटना मात्र संपूर्ण शहराच्या मनाला स्पर्शून गेली. निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांनी आपल्या सहकारी शिक्षकांसह थेट भाजी मार्केटमध्ये जाऊन शैलेंद्र चौधरी यांच्या दुकानावर त्यांचा सत्कार केला. हातात फुलांचा गुच्छ, चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यांत अभिमान घेऊन शिक्षकांनी भाजी विक्रेत्या वडिलांना मिठी मारत मुलाच्या यशाबद्दल अभिनंदन केले. हा प्रसंग पाहण्यासाठी बाजारातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. शिक्षण संस्था आणि शिक्षक विद्यार्थ्यांच्या कुटुंबाशी किती आत्मीयतेने जोडलेले असतात, याचे हे सुंदर उदाहरण ठरले. शैलेंद्र चौधरी यांनाही या क्षणी भावना अनावर झाल्या. “मी आयुष्यभर मेहनत केली, पण मुलाने आज माझ्या कष्टाचे चीज केले,” असे म्हणताना त्यांचा आवाज भरून आला होता. बाजारात भाजी विकणाऱ्या एका सामान्य वडिलांच्या डोळ्यांत त्या दिवशी अभिमानाचे तेज स्पष्ट दिसत होते. आर्थिक परिस्थिती कितीही कठीण असली तरी मुलांना शिक्षण दिल्यास ते नक्कीच यश मिळवू शकतात, हा विश्वास या घटनेने अधिक दृढ झाला. हर्षलच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीपभाऊ वाघ, चेअरमन नानासाहेब संजय वाघ, मानद सचिव तथा उच्च न्यायालयातील नामांकित विधितज्ञ ॲड. महेशदादा देशमुख, व्हाईस चेअरमन तथा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य नानासाहेब विलास जोशी, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेवआण्णा महाजन, पिटीसीचे ज्येष्ठ संचालक सतीश चौधरी उर्फ भोला आप्पा यांनी विशेष अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असून हर्षलसारखे विद्यार्थी संस्थेचा नावलौकिक वाढवत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच झुंज वृत्तपत्र व ध्येय न्युजचे संपादक तथा ध्येय ॲकेडमीचे संचालक संदीप महाजन आणि परिवारातर्फे चिरंजीव हर्षल चौधरी याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. संघर्षमय परिस्थितीतून उभे राहत शिक्षणाच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या हर्षलसारख्या विद्यार्थ्यांमुळे समाजातील अनेक कुटुंबांना नवी प्रेरणा मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक विद्यार्थी साधनांच्या अभावाचे कारण पुढे करतात. मात्र हर्षल चौधरी याने परिस्थितीला दोष न देता स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवला आणि यशाची नवी उंची गाठली. त्याचा संघर्ष, त्याची जिद्द आणि कुटुंबासाठी काहीतरी मोठे करण्याची इच्छा हीच त्याच्या यशाची खरी ताकद ठरली. पाचोरा शहरात सध्या सर्वत्र हर्षल चौधरी आणि त्याच्या कुटुंबाचे कौतुक होत आहे. एका भाजी विक्रेत्याच्या मुलाने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर मिळवलेले हे यश केवळ गुणांचे यश नाही, तर मेहनत, संघर्ष आणि शिक्षणाच्या सामर्थ्याचा जिवंत पुरावा आहे. भविष्यात मोठे अधिकारी बनून समाजासाठी काम करण्याचे स्वप्न हर्षलने डोळ्यांत साठवले असून त्याच्या या प्रवासासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!