प्रोफेसर डॉ वासुदेव वले संपादित ‘अन्वयार्थ ‘ – डॉ किसन पाटील लिखित निवडक समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन

0

पाचोरा – “मराठीतील एक अभ्यासू समीक्षक म्हणून ज्यांचा अखंड साहित्य विश्वाला परिचय आहे अशा डॉ किसन पाटील यांनी अनेक नवलेखकांना मार्गदर्शन केलेले असून त्यांनी विविध साहित्यकृतींवर लिहिलेल्या समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या पश्चात होणे, ही मराठी साहित्याच्या संदर्भातली एक अपूर्व अशी घटनाच म्हणता येईल.” असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानव्यविद्याशाखेचे माजी अधिष्ठाता प्राचार्य बी एन पाटील यांनी केले. पाचोरा येथील एम एम महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉ वासुदेव वले संपादित ‘अन्वयार्थ’ या डॉ किसन पाटील लिखित निवडक समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच वाघोड येथे संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

वाघोड येथे नुकताच प्राचार्य डॉ किसनराव पाटील राज्यस्तरीय व खानदेशस्तरीय साहित्य पुरस्काराचे वितरण संपन्न झाले. या पुरस्कार वितरण समारंभात हा ग्रंथ मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी आणि माजी शिक्षणसंचालक शशिकांत हिंगोनेकर, भाषा अभ्यासक डॉ प्रकाश सपकाळे, अकोला येथील कवी प्रशांत असनारे, नांदेड येथील साहित्यिक वीरभद्र मिरेवाड, प्रशांत पब्लिकेशन्स जळगावचे प्रदीप पाटील, महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक तावडीपुत्र अशोक कौतिक कोळी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
“गुरुवर्य प्राचार्य डॉ किसन पाटील यांनी मराठीतल्या शेकडो लिहित्या हातांना बळ देऊन त्यांचे कौतुक केले. अनेक नवोदित लेखकांसाठी ते आधारवड होते. प्रस्थापित लेखकांबरोबरच नव्याने लिहू लागलेल्या अनेकांना वाङ्मय विश्वामध्ये एक वेगळी ओळख मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले आहे.” असे अशोक कौतिक कोळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले.
“लेखकाला मार्गदर्शन करताना त्याच्या लिहित्या हाताचे कौतुक करण्याबरोबरच त्याच्या लेखनातील मर्यादा व कमतरता दाखवून योग्य दिशादिग्दर्शन करणे, हे डॉ किसन पाटील यांच्या समीक्षेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असून ‘अन्वयार्थ’ या समीक्षा ग्रंथाच्या माध्यमातून मराठी साहित्य विश्वातील महत्त्वाच्या साहित्यकृती उजेडात आणण्याचे महत्तम कार्य घडले आहे.” असे प्रतिपादन करून कवी शशिकांत हिंगोणेकर यांनी संपादक डॉ वासुदेव वले यांचे अभिनंदन केले.
“महाराष्ट्रभर विखुरलेल्या प्रस्थापित तसेच नवलेखकांच्या साहित्यकृतींच्या समीक्षेचे एकत्रीकरण या ग्रंथात करण्यात आले असून यातील समीक्षा ही आस्वादक अंगाने जाणारी असली तरी त्यातील वाङ्मय मूल्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे.” असे मत जेष्ठ भाषाभ्यासक डॉ प्रकाश सपकाळे यांनी व्यक्त केले.
आपल्या संपादित ग्रंथाबद्दल मनोगत व्यक्त करत असताना डॉ वासुदेव वले म्हणाले की,“माझे गुरुवर्य डॉ किसन पाटील यांनी लिहिलेल्या विविध साहित्यकृतींवरच्या समीक्षा अन्वयार्थ या संपादित ग्रंथांमध्ये एकत्र करून गुरुदेवांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केलेली आहे.”
यावेळी प्रकाशन समारंभास खानदेशातील कवी प्रभाकर महाजन, विजय लुल्हे, श्री प्रवीण पाटील, वाघोड गावातील बहुसंख्य नागरिक तथा साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ संदीप माळी यांनी केले तर आभार डॉ योगेश महाले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here