ऑस्ट्रेलिया सुपर-८ साठी पात्र, झांम्पाच्या झंझावातापुढे नामिबियाचा धुव्वा

0
  • मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आज सकाळी होणारा श्रीलंका विरुद्ध नेपाळ सामना पावसात वाहून गेला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. पण त्यानंतर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नामिबियाला १५.२ षटके आणि ९ गडी राखून राखून एकतर्फी विजय नोंदवला. ऑस्ट्रेलियाने सलग तिसऱ्या विजयासह २०२४ च्या टी२० विश्वचषकात सुपर-८ साठी पात्रता मिळवली आहे. मिचेल मार्शचा संघ सुपर-८ मध्ये पोहोचणारा दक्षिण आफ्रिकेनंतरचा दुसरा संघ ठरला आहे.

नॉर्थ साऊंड येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नामिबियाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना १७ षटकांत १० गडी गमावून केवळ ७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ५.४ षटकात एक गडी गमावून ७४ धावा केल्या आणि ८६ चेंडू बाकी असताना नऊ विकेट्स राखून सामना जिंकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला ॲडम झांम्पा, ज्याने केवळ १२ धावा देत ४ विकेट घेतल्या. त्यालाच सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने दमदार कामगिरी करत ५.४ षटकांत लक्ष्य गाठले. डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेडने डावाची चांगली सुरुवात केली. या सामन्यात दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी २१ धावांची भागीदारी झाली. वॉर्नर ८ चेंडूत २० धावा करून बाद झाला. यानंतर मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी पदभार स्वीकारला. दोघांमध्ये ५३ धावांची भागीदारी झाली. हेड ३४ आणि मार्श १८ धावांवर नाबाद राहिले. नामिबियाकडून डेव्हिड विसीने एक विकेट घेतली. याशिवाय एकाही गोलंदाजाला यश मिळवता आले नाही.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेला नामिबिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघर्ष करताना दिसला. १५ धावांवर संघाच्या तीन विकेट पडल्या. पहिला धक्का ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने निकोलस डेव्हलिनच्या रूपाने दिला. त्याला केवळ दोन धावा करता आल्या. यानंतर कमिन्सने जैन फ्रीलिंकची विकेट घेतली. त्याला एकच धाव करता आली. हेझलवूडनेही संघाला तिसरा धक्का दिला. त्याने मायकेल व्हॅन लिंगेनला आपला बळी बनवले. तो १० धावा करून तंबूमध्ये परतला. स्मित तीन, ग्रीन एक, डेव्हिड व्हिसी एक, रुबेन सात, बर्नार्ड आणि शिकोंगो शून्य धावा करून बाद झाले. तर, जॅक ब्रेसवेल दोन धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून झांम्पाने चार तर हेझलवूड आणि स्टॉइनिसने प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी कमिन्स आणि नॅथन एलिस यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here