लाडक्या कर दात्याच्या भावना

0

लाडक्या कर दात्याच्या भावना

माननीय पंतप्रधान,

सर्व राज्याचे मुख्यमंत्री,

आणि सर्व लाडके राजकारणी यांस,

*विषय: “लाडका करदाता” अशी नवीन योजना सुरू करण्याबाबत विनंती*

महोदय,

आशा आहे की तुम्ही तुमच्या निवडणुकांच्या चिंतांमधून थोडा वेळ काढून हे पत्र वाचाल. हवे तर विरंगुळा म्हणून वाचा, पण वाचा. कदाचित तुम्हाला माहित नसेल की तुमच्या “लाडकी बहीण” आणि “लाडका भाऊ” या योजनांनी इतकी लोकप्रियता मिळवली आहे की प्रत्येक ठिकाणी त्यांच्या चर्चेचे वातावरण आहे. परंतु, एक समाजद्वेषी आणि दुर्लक्षित वर्ग आहे जो याकडे सापत्नभावाने पाहत आहे. मी त्या दुर्लक्षित वर्गाचे प्रतिनिधित्व करण्याचा एक भाबडा प्रयत्न करत आहे.

सर्वप्रथम, तुम्ही अर्थसंकल्पीय जबाबदारीच्या परिभाषेत बदल केले आहे. आता ती म्हणजे – “पैसे मोफत वाटा आणि मते मिळवा.” याबद्दल अभिनंदन. “लाडकी बहीण” आणि “लाडका भाऊ” या योजना निश्चितच सर्जनशील आहेत. मतदारांना लाच देण्याच्या कल्पना अशा आकर्षक नावांसह येतील, याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. ह्या कल्पकतेसाठी एक सलाम. शेवटी, जर तुम्ही पैसे फेकून मतं मिळवू शकता आली तर उत्तम पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, प्रदूषणमुक्त शहरे, रोजगार हे सगळे हवेच कशाला? बरोबर ना?

तुमच्या ह्या रेवडी योजना भले तुम्हाला अल्पकालीन फायदा मिळवून देतील पण त्यांचे देशावर आणि समाजावर दीर्घकालीन भयावह परिणाम घडून आणू शकतात. तुमच्या अशा योजनांचे काही परिणाम मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो –

*१. आळशीपणाची संस्कृती:* फुकटचे धान्य, घरबसल्या पैसे आणि निवडणुकीच्या तोंडावर मोबाईल, पंखे आणि टीव्ही अशा गोष्टी देऊन आपण सर्वांना अजून आळशी बनविण्याचा पराक्रम करत आहात.

*२. करदात्याच्या कष्टाचा परतावा:* तुम्ही पैसे वाटण्यात व्यस्त आहात, पण काही लोक अजूनही कष्ट करून कर भरत आहेत. त्यांच्या कष्टाचा परतावा म्हणजे – भाववाढ, रस्त्यांवरील खड्डे (की खड्ड्यातील रस्ते?), वाहतूक कोंडी, थोड्या पावसाने निर्माण होणारी पूरजन्य परिस्थिती आणि गायब होणारी वीज, प्रमाणाबाहेर गेलेले प्रदूषण, पायाभूत सुविधांचा अभाव आणि भ्रष्टाचार.

*३. ब्रेन ड्रेन – स्थलांतराचे विचार:* अशा फुकट्या योजनांनी युवावर्गाला कर किंवा निकृष्ट सुविधांची तुलना करावी लागेल. सध्या तरुण विद्यार्थी शिक्षण संपायच्या आधीच युरोप आणि अमेरिका स्थायिक होण्याचे स्वप्न पाहू लागला आहे. यामुळे भारत वैचारिकदृष्ट्या अपंग होईल आणि भारत कधीच विकसित देश बनू शकणार नाही.

*४. सामाजिक विषमता:* ज्याप्रकारे आरक्षणाचा मुद्दा समाजात जातीय तेढ निर्माण करत आहे, त्याचप्रमाणे फुकटच्या योजनांनी गरीब आणि श्रीमंत वर्गामध्ये अंतर वाढवण्याचे काम केले आहे. फुकटच्या उपहारांमुळे सामाजिक विषमता अधिकच तीव्र होईल आणि त्या वर्गातल्या दारिद्र्याचे कारण खरे कारण दूर होणार नाही.

*५. खऱ्या विकासाकडे दुर्लक्ष्य:* तुमच्या अशा योजनामुळे विकासाच्या योजनांमध्ये कमी योगदान मिळते. दीर्घकालिक पायाभूत सुविधा, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य सेवांसाठी आवश्यक निधी कमी होतो. जे काही प्रकल्प शहरात, गावात चालू होतात त्याकडे लक्ष्य द्यायला कोणाला वेळ नसतो आणि जबाबदारी घेण्याची कोणाची इच्छा नसते. त्यामुळे एखादा पूल वा रस्ता ६ ते १२ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असते, ते काम ३-४ वर्षे चालतो. काम पूर्ण झाल्यावर लक्षात येते की अजून २ लेन करायला हव्या होत्या.

यादी बरीच मोठी आहे पण तुमचा वेळ वाचविण्यासाठी मी इथेच थांबतो आहे.

करदाता हा एक उपेक्षित वर्ग आहे हे सर्वमान्य आहे. तो काही करू शकत नाही हे ही त्याला माहीत आहे पण त्याच्या पैशाची अशी उधळपट्टी करुन त्याचा अंत पाहू नका. मला माहीत आहे लोकांना गप्प करण्यासाठी तुम्ही एक समाधान आधीच शोधले आहे – अशा लोकांना देशद्रोही म्हणाले की ते शांत बसतात. पण ही मात्रा किती काळ चालू राहणार? त्यांना गप्प करण्यासाठी काही तरी नवीन उपाय शोधण्याची आवश्यकता आहे. तुमच्याकडे अनेक प्रतिभावान सल्लागार आहेत याची मला जाणीव आहे. तरीही मी एक उपाय सुचवू इच्छितो ज्यात तुम्हाला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही.

हा उपाय म्हणजे *”लाडका करदाता”* नावाची नवी योजना सुरू करा. ह्या योजनेनुसार, निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केल्या जाणाऱ्या लाडकी बहीण वा लाडका भाऊ सारख्या योजनांतर्गत पैसे वाटण्याआधी करदात्यांचे योगदान जाहीरपणे मान्य केले जाईल. अशा रेवडी योजनांच्या प्रचारासाठीच्या केलेल्या जहिरातींमध्ये हे नमूद करा की, *”आमच्या कर्तृत्वामुळे नाही तर करदात्यांच्या योगदानामुळे तुम्हाला हा लाभ मिळत आहे”*. यामुळे पैसे कुठून येत आहेत याची पारदर्शकता आणि करदात्यांविषयी कृतज्ञता व्यक्त होईल. याशिवाय, करदात्यांना त्यांच्या योगदानाची वास्तविक किंमत जाणवेल आणि त्यांचे अधिक सक्रियपणे योगदान देण्यास प्रेरणा मिळेल. या योजनेबद्दल जरूर विचार करावा ही विनंती.

आशा आहे की मी तुमचा जास्त वेळ घेतला नाही. माझे विचार आवडले नसतील तर ते न वाचल्यासारखे करून पुढील नवीन रेवडी योजना कोणती आणायची याचा जोमाने विचार करावा आणि त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी मी माझे काम चालू ठेवतो.

*कळावे, लोभ असावा !!

*( एक त्रस्त करदाता )*

मला व्हाट्सअप वर सदर पोस्ट आली आहे शब्दांकन माझे नाही परंतु वस्तुस्थिती असल्याने शेअर करतो आहे धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here