![]()
पाचोरा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेल्या भाजप सरकारने नुकतीच यशस्वी अकरा वर्षे पूर्ण केली असून, या महत्त्वपूर्ण वाटचालीचा देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गौरव करण्यात येत आहे. “संकल्प से सिद्धी” या प्रेरणादायी शीर्षकाखाली हे अभियान संपूर्ण देशभरात राबविले जात असून, त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात विभागीय स्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत नाशिक विभागीय कार्यशाळा दिनांक ५ जून २०२५ रोजी नाशिक शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी नाशिक विभागातील सर्व नवनिर्वाचित मंडळ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, आजी-माजी आमदार यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यशाळेला भाजपा प्रदेश आणि केंद्र स्तरावरील अनेक दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शकांमध्ये भाजपा केंद्रीय महामंत्री अरुण सिंह, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती रामजी शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री संजय सावकारे, प्रदेश सरचिटणीस विजुभाऊ चौधरी, विक्रांत पाटील, तसेच महाराष्ट्र कार्यालय प्रभारी रवी अनासपुरे यांचा समावेश होता. या कार्यशाळेमध्ये भाजप सरकारच्या गेल्या अकरा वर्षांतील यशस्वी योजनांचा आढावा, कार्यपद्धती, भविष्यातील ध्येयधोरणे, तसेच ‘संकल्प से सिद्धी’ मोहिमेचे सखोल विश्लेषण सादर करण्यात आले. केंद्र सरकारने केलेली शेतकरी कल्याणाची कामगिरी, जलसंधारण, गोरगरीबांसाठीच्या योजना, महिला सक्षमीकरण, युवा रोजगारासाठीचे उपक्रम, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत अशा विविध उपक्रमांचा आढावा घेतला गेला.
नाशिक येथे झालेल्या या कार्यशाळेत पाचोरा विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या नेतृत्वात पाच मंडळांपैकी तीन मंडळ अध्यक्षांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये गोविंद चंद्रकांत शेलार, अनिल मुरलीधर पाटील आणि प्रमोद देविदास पाटील हे विशेषतः उपस्थित राहिले. त्यांची उपस्थिती पाचोरा भागातील संघटनात्मक बांधिलकी आणि भाजपच्या विचारसरणीवरील निष्ठा अधोरेखित करणारी होती.
कार्यशाळा संपल्यानंतर पाचोरा येथे परतल्यावर माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण शहर व तालुका स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी सुभाषभाऊ मुंडेपाटील, मधुभाऊ काटे, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ नाशिक कार्यशाळेतील प्रमुख मुद्दे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यात आले, तसेच “संकल्प से सिद्धी” अभियानाचा प्रभावी प्रचार कसा करावा याबाबत चर्चा झाली.
या बैठकीत दिलीपभाऊ वाघ यांनी मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळातील यशस्वी निर्णयांची माहिती देत, त्या कामगिरीचा सामान्य जनतेमध्ये प्रचार करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले. “हे अभियान केवळ भाजपच्या कार्यकाळाचा उत्सव नाही, तर देशाच्या विकास प्रवासातील एक नवसंकल्पना आहे,” असे त्यांनी म्हटले. सदस्य नोंदणी अभियानाबाबतही या बैठकीत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. भाजपा द्वारे संपूर्ण राज्यात आणि देशात चालू असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाचा एक भाग म्हणून कार्यकर्त्यांनी अधिकाधिक नागरिकांना भाजपमध्ये सामावून घेण्यासाठी झटावे, असा संदेश दिला गेला. या बैठकीचे सूत्रसंचालन प्रा डॉ माणिक पाटील यांनी सुरेखपणे पार पाडले. सदस्य नोंदणी प्रक्रियेचे तांत्रिक मार्गदर्शन कृष्णा साळुंखे आणि स्वप्नील ठाकरे यांनी केले. त्यांनी ऑनलाइन सदस्य नोंदणी प्रक्रिया, उपलब्ध पोर्टल्सचा वापर, मोबाईल अॅप्सचा उपयोग अशा तांत्रिक बाबी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. या बैठकीदरम्यान सामाजिक माध्यमांच्या प्रभावी वापराबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल प्रचाराचे युग लक्षात घेता, सदस्य नोंदणी, केंद्र व राज्य शासनाच्या योजना, तसेच मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या यशोगाथा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा अधिक परिणामकारक वापर करण्याचे आवाहन उपस्थित मार्गदर्शकांनी केले. उपस्थित कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने आणि ऊर्जा घेऊन आगामी काळात भाजपची विचारसरणी व योजना घराघरात पोहोचवण्याचा निर्धार केला. पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागात, विविध मंडळांमार्फत सदस्य नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
या उपक्रमाच्या निमित्ताने एकंदरीत पाचोरा तालुक्यात भाजपा संघटनेच्या कामकाजात नवचैतन्याचे वारे वाहू लागले असून, कार्यकर्त्यांमध्ये नवसंघटन आणि विस्ताराचे उद्दिष्ट गाठण्यासाठीची ऊर्जा निर्माण झाली आहे.
या प्रकारच्या कार्यशाळा आणि बैठका ही पक्ष संघटनेच्या बांधणीत मोलाची भूमिका बजावत असून, संकल्प से सिद्धी अभियानाच्या निमित्ताने पाचोरा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी अधिक जोमाने आणि एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





