पाचोरा ( संदीप महाजन 7385108510 ) शहरात नुकत्याच घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला असून, गुन्हेगारी विश्वात बिनधास्तपणे फिरणाऱ्या अवैध शस्त्रांचा (कट्टा, पिस्तुल, गावठी बनावटीचे हत्यारे) सुळसुळाट होत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. यात एक युवक – आकाश मोरे (वय २५) याचा मृत्यू झाल्याने शहरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत प्रशासनाच्या अपयशावर बोट ठेवले जात आहे. विशेष बाब म्हणजे याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना गावठी कट्टे शरद युवराज पाटील नामक सर्राईत गुन्हेगाराने पुरवल्याचे चौकशीत समोर आले असून त्यास देखील अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पत्रकार संदीप महाजन यांना आमदार प्रकरणी ( मारहाण प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आमदारांचा सहभाग नसतांना ) जी मारहाण झाली होती त्या मारहाणीत शरद युवराज पाटील याचा थेट सहभाग असल्याने त्याच्यावर व त्यावेळी सोबतच्या तीन सहकाऱ्यांवर मे जिंल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाने डीवायएसपी मार्फत चौकशी अंती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हणून संदीप महाजन यांनी वेळोवेळी आता देखील कायम असलेली पोलीस प्रशासनाकडे केलेली संरक्षणाची मागणी किती महत्त्वाची होती हे आता स्पष्ट झाले आहे. पाचोरा पोलिसांची निष्क्रियता आणि नागरिकांच्या भावना आज तुफान उफाळून आल्या आहेत. विशेष म्हणजे ही मागणी स्थानिक पत्रकार आणि संपादक संदीप महाजन यांनी लेखी स्वरूपात संबंधित पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे सादर केली असून या पत्रात त्यांनी अनेक धक्कादायक बाबी अधोरेखित केल्या आहेत. महाजन यांच्या म्हणण्यानुसार या अवैध कट्ट्यांचा साठा केवळ गुन्हेगारांच्या घरी नसून ते स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठी ही शस्त्रे अल्पवयीन मुलांच्या घरांमध्ये लपवून ठेवत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनुसार स्पष्ट झाले आहे. हे वास्तव अधिक गंभीर असून त्यामुळे पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा मुलाहिजा न बाळगता संपूर्ण शहरात व्यापक पातळीवर अधुनमधून कोंबिंग ऑपरेशन राबवावे अशी महाजन यांची ठाम मागणी आहे. दिनांक ४ जुलै २०२५ रोजी सायंकाळच्या वेळेस पाचोरा एसटी बस स्थानक परिसरात झालेल्या गोळीबाराने संपूर्ण शहर हादरून गेले. आकाश मोरे या युवकावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि तो जागीच मृत झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विशेष म्हणजे या घटनेत गावठी कट्ट्याचा वापर झाला असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. यामुळे पाचोऱ्यात किती प्रमाणात अशा अवैध शस्त्रांचा साठा झाला आहे, हा प्रश्न गंभीर बनला आहे. पाचोरा शहरात व परिसरात यापूर्वी देखील अवैध धंदे होते परंतु आता यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी शिरकाव केल्यामुळेच शहरात मोठ्या प्रमाणात अशा घटना घडत आहेत. पूर्वी केवळ अपप्रवृत्तींचा काहीसा मर्यादित वावर असलेले पाचोरा शहर आता गुन्हेगारीच्या गंभीर छायेखाली झाकोळले जात आहे. त्यामुळेच नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र झाली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींना अवैध शस्त्रे सहज मिळत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले. गावठी कट्टे, देशी पिस्तुल, धारधार हत्यारे यांचा वापर हवेत फायर होणे हे मागील काही महिन्यांत झालेल्या विविध घटनांमध्ये दिसून आला आहे. विशेषतः शहरातील काही भाग, झोपडपट्ट्या, आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली वस्ती ही अशा कारवायांची केंद्रबिंदू बनत चालली आहे. अशी हत्यारे अवैध मार्गाने आणून प्रति दुर्लभ कश्यप सारखा अवतार धारण करणे, त्यानुसार स्टेटस ठेवणे, मास्टर माईंड बनुन गुन्ह्यांसाठी व आपल्या विरोधकांवर वार करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करणे आणि आपल्या विरोधकांना त्यांच्याच मित्रांकडून अथवा नातेवाईकांना हाताशी धरून संपवणे वेळोवेळी हे स्पष्ट झाले आहे, मात्र यावर कठोर कारवाई केल्याचे दिसून आलेले नाही. पाचोरा बस स्थानक परिसरात पोलिसांची स्थायी चौकी असूनही एवढी गंभीर घटना घडणे आणि ड्युटीवरील पोलिसांचा अदृश्यपणा – हे प्रकार थेट पोलिस यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत. यामुळे ‘कर्तव्यचुकीच्या’ किंवा ‘सांठगाठ असण्याच्या’ आरोपांनाही खतपाणी मिळू लागले आहे. या घटनेनंतर पत्रकार संदीप महाजन यांनी पोलिसांच्या निलंबनाची मागणी केली आहे. नव्हेतर या प्रकरणामागे कोण सूत्रधार आहे हे समोर येण्यासाठी याचा तपास सीआयडी वा एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी पत्रकार संदीप महाजन यांनी केली आहे. बस स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी लाखो रुपये खर्चून बसवलेली सीसीटीव्ही यंत्रणा गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. कोणतीही देखभाल, देखरेख किंवा दोष निवारण करण्यात आलेले नाही. हे देखील प्रशासनाच्या बेफिकिरीचेच लक्षण मानले जात आहे. या घटनेनंतर अनेक नागरिकांनी दबक्या आवाजात त्यांच्या भीतीचे आणि संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. बस स्थानक परिसरात रोज हजारो प्रवासी, विद्यार्थी, महिला, व्यापारी ये-जा करतात. त्यांच्या संरक्षणासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे आता प्रकर्षाने जाणवू लागले आहे. ‘अवैध शस्त्रसाठा आणि गुन्हेगारी स्वरूपाचे स्टेटस ठेवणे व रिल बनवणे या विरोधात विशेष मोहीम’ राबवावी अशी मागणी महाजन यांनी केली आहे. अधूनमधून राबविण्यात येणारे ‘कोंबिंग ऑपरेशन’ म्हणजे गुन्हेगारी किंवा दहशतवाद्यांविरुद्ध विशेष झडती मोहिम ज्या अंतर्गत पोलीस, एलसीबी, डीबी, स्थानिक गुप्तचर शाखा आणि कधी कधी एटीएसही संयुक्तरित्या काम करतात. यामध्ये पोलिसांकडून संशयित व्यक्ती, ठिकाणे, गोडाऊन, झोपडपट्ट्या, बंद घरे, गॅरेजेस, हॉटेल्स यांची झडती घेतली जाते. बिहार, उत्तर प्रदेश, इंदौर, मुंबई, औरंगाबाद आदी ठिकाणी अशा मोहिमा यशस्वी ठरल्या असून मोठ्या प्रमाणावर अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पाचोऱ्यातील सद्यस्थितीत कोंबिंग ऑपरेशन राबवले गेले नाही तर अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात अधूनमधून विशेष कोंबिंग ऑपरेशन राबवावे, अवैध शस्त्र विक्रेत्यांची माहिती देणाऱ्यांना . बक्षीस योजना राबवावी, गुन्हेगारांच्या पार्श्वभूमीची तातडीने तपासणी व यादी तयार करावी, तातडीने यादीवरील गुन्हेगारांवर तडीपारी किंवा एमपीडीए लावण्यात यावा, बसस्टँड ड्युटीवरील किंवा तिथे ड्युटी लावणाऱ्या पोलिसांची व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर निलंबन करावे, सीसीटीव्ही यंत्रणा तत्काळ सुरू करून त्यासाठी स्वतंत्र देखभाल यंत्रणा कार्यान्वित करावी, महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस पथके स्थापन करावीत, राजकीय हस्तक्षेप न होता पोलीस यंत्रणेला स्वतंत्रपणे कारवाई करू द्यावी, अशी मागणी देखील महाजन यांनी केली आहे. या घटनेबाबत गृहमंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पत्रकार महाजन यांनी निवेदन सादर केले आहे. “सामान्य माणूस रस्त्यावर सुरक्षित नाही, हे प्रशासनाचे अपयश आहे, याची जबाबदारी कुणीतरी स्वीकारली पाहिजे,” अशा शब्दांत पत्रकार महाजन यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक पत्रकार एवढ्या दहशतीत आहेत की या प्रकरणी अटकेत असलेल्या गुन्हेगारांना गावठी कट्टे पुरवणाऱ्या शरद युवराज पाटील याच्या अटकेची किंवा त्याचे नाव टाकून बातमी लावण्याची हिंमत देखील कोणी करत नाही. विशेष बाब म्हणजे शरद युवराज पाटील अटकेत असतानाही पोलीस स्टेशनच्या जवळपास व शंभर मीटरच्या परिसरात गुन्हेगार असलेले त्याचे सहकारी सर्रासपणे जणू काही त्याला पहारा देण्यासाठी व त्याच्यासाठी कोण साक्षीदार म्हणून पोलीस प्रशासनास मदत करतात, यावर नजर ठेवण्यासाठी फिरताना दिसून येत आहेत. या घटनेने फक्त एक तरुण जीव गमावला नाही, तर संपूर्ण समाजातील विश्वास, सुरक्षितता आणि शासकीय यंत्रणेवरील अपेक्षा गमावल्या आहेत. अवैध कट्टे हे केवळ गुन्ह्याचे साधन नाहीत, तर समाजातील अस्थिरतेचा आणि पोलीस प्रशासनाच्या व्यवस्थेतील झोपेचा आरसा ठरतो. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची कायदा व सुव्यवस्था या कारणामुळे बदली केल्याचे आदेशात नमूद केले आहे, परंतु एखाद्या अधिकाऱ्याची बदली करून उपयोग नाही, तर पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये कलेक्शनसाठी पोलिसांची जी लॉबी व चढाओढसह गटबाजी सुरू आहे त्यावर देखील कुठेतरी ठोस उपाय करणे गरजेचे आहे. पत्रकार महाजन यांची फक्त कोंबिंग ऑपरेशन व गुन्हेगारांवर तडीपार अथवा एमपीडीएच्या कारवाया करणे ही केवळ मागणी नसून, पोलीसांचा धाक देखील शहराच्या भविष्यासाठी गरज आहे. ही वेळ अशीच कारवाई करण्याची आहे कारण उद्या उशीर होऊ शकतो.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.