राजकारण आणि सहकार क्षेत्रात यशाचा लाडशाखीय दीपस्तंभ : शरदभाऊ व संगिताताई पाटे!

0

Loading

पाचोरा- शहरातील लाडशाखीय वाणी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शरदभाऊ पाटे व सौ.संगिताताई शरद पाटे या यशस्वी दांपत्याने राजकारण आणि सहकार या दोन्ही क्षेत्रांमध्ये स्वतःचे नाव एक आदर्श कार्यकर्ते म्हणून प्रस्थापित केले आहे. दोघांची कारकीर्द ही कार्य, प्रामाणिकपणा आणि जनतेशी असलेली अतूट बांधिलकी यांवर आधारित असून, अशा दांपत्याचे उदाहरण संपूर्ण पाचोरा परिसरात दुर्मीळ आहे. राजकीय क्षेत्रात काम करावं, समाजासाठी योगदान द्यावं आणि त्यातून एखादं सन्माननीय पद भूषवावं, ही प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असते. पण काही निवडक व्यक्तींच्या बाबतीत नशिबाची साथ आणि जनतेचा पाठिंबा हे दोन्ही घटक त्यांच्या यशात निर्णायक भूमिका बजावतात. शरदभाऊ पाटे हे त्याचेच मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांनी राजकारणात कोणताही गाजावाजा न करता, फक्त कार्यावर भर देत विश्वासाची कमाई केली. त्यांच्याच पाठीशी उभ्या असलेल्या सौ.संगिताताई पाटे यांचे देखील योगदान यासाठी तितकेच महत्त्वाचे मानावे लागेल. शरदभाऊ पाटे यांच्या कुटुंबाला राजकीय क्षेत्रात पहिली संधी मिळाली ती सौ.संगिताताई पाटे यांच्या रूपाने. त्यांच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी तत्कालीन आमदार स्व.तात्यासाहेब आर.ओ. पाटील तसेच विद्यमान हैट्रिक आमदार किशोरआप्पा पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले. त्यांच्या सहकार्याने संगिता ताईंनी निवडणूक लढवली आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत नगरपरिषदेमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या यशाने समाजात आणि कुटुंबात मोठा आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. पत्नीच्या राजकीय यशानंतर शरदभाऊंनी स्वतःही कार्यक्षेत्रात जबाबदारीने योगदान देण्यास सुरुवात केली. समाजसेवा आणि विकासकामांमधून मिळालेला अनुभव व लोकसंपर्क यांच्या जोरावर त्यांनी पुढील निवडणुकीत नगरसेवक म्हणून स्वतः उमेदवारी दिली आणि निर्विवाद बहुमताने निवडून आले. केवळ निवडून येणे नव्हे, तर त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांमुळे जनतेचे प्रेम आणि विश्वास मिळवला. त्यांच्या यशस्वी कारकीर्दीची दखल घेऊन दुसऱ्या कार्यकाळात त्यांना उपनगराध्यक्षपदही बहाल करण्यात आले. या पदावर त्यांनी सलग ५ वर्षे अत्यंत जबाबदारीने व समर्पणाने काम पाहिले. त्यांच्या नियोजनशक्ती, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि जनतेशी असलेल्या सातत्यपूर्ण संवादामुळे नगरपरिषदेच्या कामकाजात सकारात्मक बदल घडून आले. राजकारणात यशस्वी झाल्यानंतर शरदभाऊ पाटे यांनी सहकार क्षेत्राकडे आपला कल वळवला. दि पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदासाठी त्यांना संधी मिळाली. या संधीचे सोने करत त्यांनी निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीतही मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. संचालक या पदावर त्यांनी पारदर्शक आणि हितकारक निर्णय घेतले. बँकेच्या आर्थिक आरोग्याला बळकटी देणारी भूमिका बजावत त्यांनी सहकारी चळवळीच्या मूल्यांना न्याय दिला. शरदभाऊंच्या पाठोपाठ सौ.संगिताताई पाटे यांनाही दि पाचोरा पीपल्स बँकेत संचालक म्हणून संधी मिळाली आणि विशेष बाब म्हणजे त्या बिनविरोध निवडून आल्या. त्यांची ही निवड म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर असलेला जनतेचा विश्‍वास आहे. राजकारण आणि सहकार या दोन्ही क्षेत्रांमध्ये स्वतःची वेगळी छाप पाडणाऱ्या संगिताताई पाटे या आज अनेक महिलांसाठी प्रेरणास्त्रोत ठरल्या आहेत. शरदभाऊ पाटे आणि सौ.संगिताताई पाटे हे दोघेही पाचोरा नगरपरिषद आणि दि पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक या दोन्ही संस्थांमध्ये निवडून आलेले एकमेव दांपत्य आहे. तेही अगदी तरुण वयात. यामधून त्यांच्या नेतृत्वगुणांची, कर्तृत्वाची आणि कार्यक्षमतेची स्पष्ट पावती मिळते. या दोघांचेही कार्य हे समाजासाठी आहे, कोणत्याही व्यक्तिकेंद्रित राजकारणापासून दूर राहून ते फक्त कामाच्या जोरावर समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. शरदभाऊ पाटे यांचा स्वभाव अत्यंत सौम्य, मनमिळावू आणि कार्यकर्त्यांशी सुसंवाद ठेवणारा आहे. त्यांनी केवळ विकासकामांमध्ये लक्ष केंद्रित न करता, प्रत्येक सण, उत्सव, समाजाचे दु:खद प्रसंग, महिला, युवा, वयोवृद्ध यांच्याशी निगडीत प्रश्नांवरही वेळोवेळी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक उपक्रम, आरोग्य शिबिरे, महिला बचतगटांना मदत, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली. संगिताताईंच्या माध्यमातूनही महिलांसाठी विशेष जागरूकता उपक्रम, प्रशिक्षण शिबिरे, आरोग्य तपासणी असे उपक्रम राबवण्यात आले आहेत. शरदभाऊंच्या कारकीर्दीकडे पाहता हे निश्चितच सांगता येते की, त्यांचं यश हे काही केवळ नशिबाचे फलित नाही, तर त्यामागे त्यांच्या अथक परिश्रमांची, प्रामाणिक सेवाभावी दृष्टिकोनाची आणि जनतेच्या सुख-दु:खात सामील होणाऱ्या मनाच्या उर्मीची सांगड आहे. भविष्यातही ते अधिक जबाबदाऱ्या पार पाडतील, आणि पाचोराचा विकास साधणाऱ्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, याबाबत कुठलाही संशय नाही. राजकारण व सहकार क्षेत्रात केवळ निवडून येणेच नव्हे, तर त्या पदाला न्याय देणं हे खऱ्या अर्थाने यशाचं मोजमाप असतं. शरदभाऊ पाटे व सौ.संगिताताई पाटे यांनी याचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीसाठी ‘ध्येय न्यूज’ आणि ‘झुंज वृत्तपत्र’ परिवारातर्फे मन:पूर्वक खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here