Home Dhyeya News Special पाचोऱ्याच्या मातीतून पुण्याच्या बाजारपेठेत झेप; ‘गावाकडची मिसळ’च्या माध्यमातून राजेश संघवींच्या स्वप्नपूर्तीची नवी...

पाचोऱ्याच्या मातीतून पुण्याच्या बाजारपेठेत झेप; ‘गावाकडची मिसळ’च्या माध्यमातून राजेश संघवींच्या स्वप्नपूर्तीची नवी कहाणी!

0
759

Loading

पाचोरा : स्वप्न पाहणे सोपे असते; मात्र ते प्रत्यक्षात आणण्यासाठी धाडस, जिद्द आणि सातत्याची गरज असते. पाचोरा येथील सपना एजन्सीजचे मालक राजेश संघवी आणि धरणगाव येथील गणेश पवार यांनी हीच जिद्द कृतीत उतरवत व्यवसायाच्या नव्या क्षितिजाकडे वाटचाल केली आहे. पाचोरा येथील सपना एजन्सीजच्या व्यवसायाला गुडबाय करत राजेश संघवी, आपुलकीने ‘राजू’ म्हणून ओळखले जाणारे हे व्यक्तिमत्त्व, स्वप्नपूर्तीसाठी पुण्याच्या दिशेने रवाना झाले. मोठ्या शहरात नवा व्यवसाय उभा करण्याचे आव्हान स्वीकारत त्यांनी अस्सल महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती पुणेकरांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला. त्यातूनच बर्ड व्हॅली उद्यानाच्या गेटजवळ, नोव्हेल चौक, छत्रपती संभाजीनगर, चिंचवड, पुणे-१२ येथे ‘गावाकडची मिसळ’ या नावाने खाद्यदालनाची सुरुवात झाली.

नावातच गावाकडची ओळख आणि चवीत महाराष्ट्राची अस्सल परंपरा अशी या दालनाची खासियत आहे. येथे केवळ मिसळच मिळत नाही, तर तब्बल ४५ चविष्ट खाद्यपदार्थांची मेजवानी ग्राहकांना अनुभवता येते. गावाकडची मिसळ, कोल्हापुरी तऱ्ही मिसळ, वाकडची मिसळ यांसह मिसळपाव, मसाला पाव, बटर पाव, पुलाव, कढी वडा, बटाटा वडा, विविध प्रकारच्या भेळी व चटपटीत पदार्थ, पाव भाजी, पुरी भाजी, पोहे, कढी खिचडी, साबुदाणा खिचडी, दहीवाटी, पायनॅपल शिरा, गावाकडील गुळाचा शिरा तसेच चहा, कॉफी, ताक, सोलकढी, मँगो लस्सी यांसारख्या विविध पदार्थांची रेलचेल येथे पाहायला मिळते. ‘गावाकडची मिसळ’मध्ये पोटभर जेवण झाल्यानंतरही चवीची आठवण मनात राहते, हीच या दालनाची खरी जमेची बाजू ठरते. पदार्थांचा स्वाद, दर्जा आणि वैविध्य यामुळे ग्राहक एकदा येऊन थांबत नाहीत, तर पुन्हा यावेसे वाटणे हीच या उपक्रमाची मोठी पावती ठरत आहे. ग्रामीण भागातील अस्सल चवीला पुण्यासारख्या महानगरातील खाद्यप्रेमींची पसंती मिळवून देण्याचे काम या माध्यमातून होत आहे. मात्र राजेश संघवी यांचा प्रवास केवळ ‘गावाकडची मिसळ’पुरता मर्यादित राहिलेला नाही. पाचोरा येथील सपना एजन्सीजच्या माध्यमातून टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, एअर कूलर, वॉटर प्युरिफायर, वॉटर कूलर तसेच विविध होम अप्लायन्सेसच्या विक्री आणि सेवा क्षेत्रातील अनुभवाच्या बळावर त्यांनी पुण्यातही व्यवसायाचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. होलसेल तसेच रिटेल विक्रीच्या क्षेत्रातही त्यांनी स्वतंत्र व्यवसाय उभारण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्यामुळे पाचोरा सोडून पुण्यात दाखल झालेला राजेश संघवींचा प्रवास हा केवळ ठिकाण बदलण्याचा नसून, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून नव्या संधींचा शोध घेण्याचा प्रेरणादायी प्रवास आहे. गावातून शहराकडे जाताना आपल्या मातीची चव, व्यवसायातील अनुभव आणि नात्यांची ऊब सोबत घेऊन यशाचे नवे शिखर गाठता येते, हे राजेश संघवी आणि गणेश पवार यांच्या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे. ‘गावाकडची मिसळ’च्या माध्यमातून पाचोऱ्याची चव पुण्याच्या खाद्यविश्वात पोहोचली असून, या दोघांची व्यावसायिक झेप अनेक नवउद्योजकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!