पाचोरा नगरपालिकेची निवडणूक तयारी पूर्ण : वेळ संपल्यानंतर मतदान होणार नाही, पोलिसांकडून काटेकोर देखरेख

0

Loading

पाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह 14 प्रभागांतील 28 नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, त्यासाठीची सर्व प्रशासकीय व सुरक्षेची तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मा. अर्चना मोरे मॅडम यांनी दिली आहे. या निवडणुकीत शहरात एकूण 63 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असून त्यापैकी एक केंद्र मॉडेल मतदान केंद्र म्हणून विकसित करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया आदर्श आचारसंहितेच्या चौकटीत, शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी या उद्देशाने प्रशासनाने काटेकोर नियोजन केले आहे. प्रशासक मंगेश देवरे यांच्या केबिनमध्ये स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात रविवारी दुपारी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मा. अर्चना मोरे मॅडम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश देवरे, पोलीस उपअधीक्षक बापू रोहम, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, दगडू मराठे आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मा. अर्चना मोरे मॅडम यांनी आगामी निवडणुकीसंदर्भात सविस्तर माहिती देताना सांगितले की, पाचोरा नगरपालिकेसाठी एकूण 59,084 मतदार आहेत. त्यापैकी 30,041 पुरुष आणि 29,037 महिला मतदार असून, या सर्वांना मतदानासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मा. अर्चना मोरे मॅडम यांनी पुढे सांगितले की, मागील निवडणुकीदरम्यान काही केंद्रांवर विशेषतः संभाजीनगर भागातील मराठी शाळेत मतदानाच्या दिवशी प्रवेशद्वाराच्या अभावामुळे मतदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावेळी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू राहिले होते. तसेच मतदानाची वेळ संपल्यानंतर देखील मतदारांची रांग वाढतच राहिली होती. शिवाय, मतदान केंद्र परिसर खुला असल्याने उमेदवारांचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अपुरी विद्युत रोषणाई आणि पोलीस व्यवस्थेअभावी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या सर्व त्रुटी यावेळी होऊ नयेत म्हणून प्रशासनाने काटेकोर उपाययोजना केली आहे. मतदान केंद्रांवर पुरेशी विद्युत रोषणाई, पोलीस सुरक्षा, बॅरॅकेट्स आणि प्रवेशद्वारावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एकच प्रवेशद्वार ठेवण्यात येणार असून, मतदानाची वेळ संपताच तो मार्ग तत्काळ बंद करण्यात येईल. त्यामुळे मतदारांनी निर्धारित वेळेतच मतदान करून घ्यावे, वेळ संपल्यानंतर कोणालाही मतदानास परवानगी दिली जाणार नाही, असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मा. अर्चना मोरे मॅडम यांनी केले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश देवरे यांनी सांगितले की, मतदार यादीतील दुरुस्तीसंदर्भात 5800 हरकती प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी 4100 हरकतींचा निपटारा करण्यात आला आहे. काही नागरिकांची नावे दोन ठिकाणी असल्याचे आढळल्याने त्या मतदारांच्या नावासमोर स्टार (*) चिन्ह लावण्यात आले आहे. अशा मतदारांना मतदानाच्या दिवशी आवश्यक फॉर्म भरूनच मतदान करण्याची मुभा दिली जाईल. पत्रकार परिषदेत पोलीस उपअधीक्षक बापू रोहम यांनी निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली. पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्वी तडीपार, प्रतिबंधात्मक कारवाई, एमपीडीए अंतर्गत कारवाई झालेल्या व्यक्तींवर निवडणुकीदरम्यान विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीदरम्यान कायदा व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी सांगितले की, प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस कर्मचारी, गृह रक्षक, व आवश्यकतेनुसार क्यूआरटी (Quick Response Team) पथकांची नेमणूक करण्यात येईल. शहरातील संवेदनशील केंद्रांची ओळख पटवून त्याठिकाणी अतिरिक्त पोलिसांची तैनाती केली जाईल. निवडणुकीच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी 14 भरारी पथके दिवसरात्र गस्त घालणार आहेत. पत्रकारांनी उपस्थित केलेल्या विविध शंका, कुशंका आणि प्रश्‍नांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मा. अर्चना मोरे मॅडम व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश देवरे यांनी संयमाने उत्तर दिले. मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी दिव्यांगांसाठी विशेष रॅम्प, पिण्याचे पाणी, शौचालय, सावली यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर नियंत्रण अधिकारी आणि महिला कर्मचारी उपस्थित असतील. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मा. अर्चना मोरे मॅडम यांनी स्पष्ट केले की, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदार केंद्रावर पारदर्शकता राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. मतदान प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, मतदारांवर दबाव आणला जाऊ नये आणि मतांची देवाणघेवाण होऊ नये यासाठी प्रशासन पूर्ण दक्ष आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व शंका असल्यास थेट निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश देवरे यांनी नागरिकांना सुचित केले की, मतदानाचा दिवस लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करावा. सर्व मतदारांनी घरातील प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदान करावे व शहराच्या विकासासाठी योग्य उमेदवार निवडावा. प्रशासनाचे उद्दिष्ट निवडणूक प्रक्रियेला कोणत्याही तणावाशिवाय, सुव्यवस्थित आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडणे हेच असल्याचे त्यांनी नमूद केले. पाचोरा शहरात होणाऱ्या या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून, प्रशासनाने सर्व आवश्यक पावले उचलली आहेत. 2 डिसेंबर रोजी होणारे मतदान हा लोकशाहीचा उत्सव ठरणार असून, त्यासाठी सर्व घटक एकत्रितपणे प्रयत्नशील असल्याचे चित्र या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here