Home Dhyeya News Special आजीच्या कपाळावरील टिकली बँकेला खटकली; पण थरथरणाऱ्या हातांची व्यथा दिसली नाही!

आजीच्या कपाळावरील टिकली बँकेला खटकली; पण थरथरणाऱ्या हातांची व्यथा दिसली नाही!

0
418

Loading

पाचोरा – आयुष्याच्या संध्याकाळी दोन वेळच्या उदरनिर्वाहासाठी शासनाच्या अवघ्या 1,500 रुपयांच्या अनुदानावर अवलंबून असलेल्या एका 71 वर्षीय निराधार महिलेला आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी बँकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असतील, तर हा केवळ प्रशासकीय कारभारातील दोष नसून माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार म्हणावा लागेल. कमलबाई लोटन कोळी असे या निराधार वृद्ध महिलेचे नाव असून, शासकीय नियमांची सर्व पूर्तता केल्यानंतर त्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. मात्र, शासनाकडून नियमित अनुदान वितरित होत असतानाही बँक ऑफ महाराष्ट्रच्या पाचोरा शाखेत त्यांना आपल्या हक्काच्या रकमेसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची व्यथा त्यांनी मांडली आहे. मुळातच या बँकेच्या शाखेत जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या वृद्ध व दिव्यांग नागरिकांसाठी अडचणीच्या ठरत आहेत. वयोमानामुळे शरीराची साथ मिळत नसतानाही अथक प्रयत्न करून कमलबाई कशाबशा बँकेत पोहोचतात. थरथरणाऱ्या हातांनी संबंधित कर्मचाऱ्यासमोर पासबुक ठेवतात; मात्र त्यांच्या अडचणी समजून घेण्याऐवजी ‘आजी, तुम्ही विधवा आहात, पासबुकवरील फोटोमध्ये कपाळावर टिकली आहे, फोटो बदलून आणा,’ असे अजब उत्तर मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एखाद्या विधवा महिलेने कपाळावर टिकली लावावी किंवा लावू नये, हे ठरविण्याचा अधिकार बँक कर्मचाऱ्यांना कोणी दिला? खातेदाराची ओळख पडताळण्याचा अधिकार बँकेला निश्चितच आहे; परंतु कपाळावरील टिकलीचा आर्थिक व्यवहाराशी नेमका काय संबंध? पासबुक अद्ययावत करण्याची विनंती केली असता मशीन खराब असल्याचे कारण सांगितले जाते, तर खात्यात अनुदान जमा झाले का, अशी विचारणा केल्यानंतर पैसे आले नसल्याचे उत्तर दिले जाते. एवढ्यावरच न थांबता ‘तुमचे पैसे येत नाहीत, आम्ही काय आभाळातून टाकायचे का?’ अशा असंवेदनशील भाषेत उत्तर दिल्याचीही कमलबाईंची तक्रार आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी तहसील कार्यालयातून पडताळणी केली असता संबंधित महिलेला शासनाकडून दरमहा नियमित अनुदान वितरित होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मग ही रक्कम नेमकी कुठे अडकली? बँकेच्या संगणकीय प्रणालीत काही त्रुटी आहे, खात्याशी संबंधित तांत्रिक अडचण आहे की संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील हलगर्जीपणा आहे, याचा खुलासा होणे आवश्यक आहे. बँका म्हणजे जनतेच्या आर्थिक व्यवहारांचे विश्वासाचे केंद्र आहे, कुणाच्या खासगी मालकीची जहागीर नव्हे! सर्वसामान्य नागरिकांशी सौजन्याने वागणे ही बँक कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे, उपकार नव्हेत. ज्या वृद्ध महिलेसाठी 1,500 रुपये ही तिच्या जगण्याची आधाररेषा आहे, तिच्यासाठी प्रत्येक निष्फळ फेरी किती वेदनादायी असेल, याची जाणीव वातानुकूलित कार्यालयात बसणाऱ्या यंत्रणेला असायला हवी. बँक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन संपूर्ण आर्थिक व्यवहारांची पडताळणी करावी, संबंधित कर्मचाऱ्यांच्या वर्तनाची निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास योग्य ती कारवाई करावी. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ प्रवेश व विशेष सेवा उपलब्ध करून देण्याबाबत शाखा व्यवस्थापनाला स्पष्ट निर्देश द्यावेत. कमलबाई लोटन कोळी यांना त्यांच्या हक्काची संपूर्ण रक्कम विनाविलंब मिळवून देणे, हीच या प्रकरणातील सर्वांत महत्त्वाची बाब आहे. कारण या आजीला कुणाची दया, सहानुभूती किंवा मेहरबानी नको आहे; तिला केवळ तिच्या हक्काचे पैसे आणि सन्मानाची वागणूक हवी आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!