कोम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगार भयभयीत ; पहाटेच्या सर्चमध्ये अनेकांना पोलीस ठाण्यात हजर

0

Loading

पाचोरा : पाचोरा शहरात काही महिन्यांपासून वाढत्या चोरी, मारामारी, अवैध वाळू उपसा तसेच हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांमुळे नागरिकांना कायम दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर शहरात ज्या ठोस कारवाईची वर्षानुवर्षे मागणी होत होती, ती अखेर पूर्ण होताना दिसत आहे. पाचोरा पोलिसांनी शहरात पहाटे घेतलेल्या भव्य कोम्बिंग ऑपरेशनमुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा संदेश नागरिकांना मिळाला. या कारवाईचे संपूर्ण शहरभर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. आज, दिनांक 20 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.00 ते 6.30 या वेळेत शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात पोलीस तपास मोहीम राबवण्यात आली. या ऑपरेशनचे नेतृत्व मा. SDPO बापु रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल पवार यांनी केले. यामध्ये पोलीस स्टेशनचे 3 अधिकारी आणि तब्बल 22 कर्मचारी सहभागी झाले होते. संपूर्ण टीमने शहरातील गुन्हेगारांच्या अड्ड्यांवर अचानक धाड टाकत संशयितांची तपासणी केली. या कारवाईदरम्यान पोलीस स्टेशन अभिलेखावरील विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या व्यक्तींना शोधण्यात आले. त्यामध्ये शरीराविरुद्धच्या 8 गुन्ह्यांतील आरोपी, मालाविरुद्धच्या 3 गुन्ह्यांतील आरोपी, वाळू चोरीमध्ये सामील 7 संशयित तसेच 5 हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांची तपासणी करून त्यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आले. या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली असून गुन्हेगारीकडे झुकणाऱ्या इतर घटकांनाही इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर NBW (Non Bailable Warrant) व BW (Bailable Warrant) असलेल्या आरोपींवरही कारवाई करण्यात आली. नॉन बेलिबल वॉरंट असलेल्या खालील 5 आरोपींवर बजावणी करण्यात आली आहे— 1) सचिन ऊर्फ कालू मिस्त्री रा. बाहेरपुरा, RCC 54/13 2) दिगंबर श्रीराम भोसले रा. हनुमाननगर 3) रमेश भगवान मराठे रा. सारोळा 4) प्रकाश हिरे रा. गाडगे बाबा नगर 5) पल्लवी उर्फ कडुबाई राहुल पाटील रा. कोंडवाडा गल्ली, पाचोरा. यापैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरितांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. तसेच BW अंतर्गत दोन आरोपींवरही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पहाटेच्यावेळेला नागरिक झोपेत असताना पोलिसांनी केलेली ही मोठी मोहीम अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरली. मात्र यामुळे शहरातील सामान्य नागरिकांना दिलासा मिळाल्याचे चित्र दिसत आहे. अनेक नागरिकांनी सोशल मीडियावरून आणि प्रत्यक्ष बोलून या कारवाईचे स्वागत केले. काही व्यापाऱ्यांनीही पोलिसांनी घेतलेल्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. “गुन्हेगारांना खरा धक्का बसला पाहिजे, तरच शहर सुरक्षित राहू शकते”, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. या कारवाईबाबत शहरात पोलीस दलाबद्दल आदर आणि विश्वास अधिक वाढला आहे. विविध समाजघटकांनी SDPO बापु रोहन, पोलिस निरीक्षक राहुल पवार आणि संपूर्ण पोलीस टीमचे अभिनंदन केले आहे. पाचोरा शहरात कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य देत अशा प्रकारची नियमित कारवाई होण्याची अपेक्षा आता नागरिक व्यक्त करत आहेत. पाचोरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सुरुवात झालेली ही मोहीम केवळ एक कारवाई नसून, गुन्हेगारांना स्पष्ट इशारा असल्याचे जाणकारांचे मत आहे. “सार्वजनिक सुरक्षितता हीच प्राधान्याची बाब असून, कायद्याच्या चौकटीत राहून शहरात शांतता राखण्यासाठी कठोर कारवाई सुरूच राहील,” असा संदेश पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांचे मनोबल खच्चीकरण झाले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. आता या उपक्रमाची सातत्यपूर्ण अंमलबजावणी शहरात पाहायला मिळेल अशी अपेक्षा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. पाचोरा पोलिसांची ही कारवाई गुन्हेगारीविरोधात एक निर्णायक अध्याय ठरत असून, शहर गुन्हेमुक्त करण्यासाठी सकारात्मक पाऊल म्हणून तिचे स्वागत होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here