![]()
ठाणे येथील निवासस्थानी शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सुमित किशोर पाटील यांनी आमदार किशोर आप्पा यांच्या समवेत सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी सुमित पाटील यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पाचोरा नगरपालिकेचे शिवसेना गटनेते सुमित किशोर पाटील यांची नुकतीच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे त्यांच्यावर सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली असून, शेतकरी, सभासद आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडित प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने त्यांच्या भूमिकेकडे अपेक्षेने पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे येथे झालेली भेट राजकीय सदिच्छा आणि आगामी कार्यकाळासाठी मार्गदर्शनपर ठरली. याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठविल्याबद्दल सुमित पाटील यांचा विशेष सत्कार केला. अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेण्याची वृत्ती आणि जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची तयारी याबद्दल त्यांनी कौतुक केले. केवळ पद मिळविणे महत्त्वाचे नसून, त्या पदाच्या माध्यमातून समाजासाठी काय करता येते, याला अधिक महत्त्व असल्याचे त्यांच्या मार्गदर्शनातून अधोरेखित झाले. “जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या कार्यकाळात शेतकरी हिताच्या निर्णयांना सर्वोच्च प्राधान्य द्या. शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त हिताची कामे झाली पाहिजेत,” असा मोलाचा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला. सहकार क्षेत्रातील निर्णयप्रक्रियेत शेतकऱ्यांच्या अडचणी, आर्थिक गरजा आणि त्यांच्या हिताचे मुद्दे केंद्रस्थानी ठेवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या मार्गदर्शनामुळे आगामी कार्यकाळात जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली असून, शेतकरी बांधवांचा विश्वास संपादन करून त्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि निष्ठेने काम करण्याचा निर्धार असल्याचे सुमित पाटील यांनी सांगितले. या सदिच्छा भेटीप्रसंगी समाधान पाटील आणि स्नेही आदित्य मुकूंद बिल्लीकर उपस्थित होते.





























