![]()
पाचोरा – ३ डिसेंबर २००५… हा दिवस आमच्या कुटुंबाच्या जीवनात वेदनेची, पोकळीची आणि आठवणींचा अथांग सागर घेऊन आला. आज त्याच दिवशी अखेरपर्यंत कर्तव्यनिष्ठ, स्वाभिमानी आणि राष्ट्रभक्तीने जीवन जगलेल्या आमच्या प्रिय वडिलांची—स्वातंत्र्यसैनिक आणि पाचोरा नगरपालिका प्रशासनातील निष्कलंक ऑक्ट्रॉय इन्स्पेक्टर आदरणीय अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन (लोहटारकर)—यांची २० वी पुण्यस्मृती. वीस वर्षांचा कालखंड मोठा वाटतो, पण आदरणीय अण्णासाहेब यांच्या आठवणींचे तेज इतके उजळ आहे की आजही त्यांच्या पावलांची चाहूल, त्यांचा आदर्श आणि त्यांची शिकवण मनात तितक्याच सामर्थ्याने जिवंत आहे. वेळ पुढे सरकतो, पण त्यांचा प्रभाव कधीच कमी होत नाही. भारताच्या स्वातंत्र्यासाठी पेटलेल्या आंदोलनात कित्येक तरुणांनी स्वतःला झोकून दिले आणि त्यात आमचे आदरणीय अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन (लोहटारकर) हे धैर्याचे तेजस्वी उदाहरण ठरले. स्वातंत्र्य ही त्यांच्या दृष्टीने केवळ संकल्पना नव्हती—ती त्यांची श्रद्धा, त्यांचे ध्येय आणि त्यांचा श्वास होता. राष्ट्रासाठी संपूर्ण मन, श्रम आणि आयुष्य अर्पण करण्याची त्यांची तयारी अढळ होती शालेय जीवनातच ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठविल्यामुळे त्यांना येरवडा कारावासात सहा महिन्यांची कठोर शिक्षा भोगावी लागली. हा तुरुंगवास त्यांच्यावरील ब्रिटिशांचा दंड नव्हता, तर त्यांच्या राष्ट्रभक्तीचा सन्मान होता. त्या सहा महिन्यांनी त्यांच्या मनातील देशप्रेम अधिक पक्के झाले आणि त्यांना स्वातंत्र्याचा अमूल्य अर्थ अधिक उमगला. आम्ही त्यांच्या तोंडून त्या काळातील प्रसंग ऐकताना जाणवायचं की संघर्ष ही त्यांची ओळख नव्हती—ती त्यांची वृत्ती होती. आदरणीय अण्णासाहेबांचा आवाज त्या आठवणींनी अजूनही कानात घुमतो. स्वातंत्र्यानंतर पाचोरा नगरपालिकेतील ऑक्ट्रॉय विभागाची धुरा त्यांच्या हाती आली आणि त्यावेळी या विभागात जबाबदारी, प्रामाणिकता आणि शिस्त या तीन गोष्टींची नितांत गरज होती. आदरणीय अण्णासाहेबांनी मात्र ही भूमिका मोठ्या दक्षतेने आणि निष्कलंक वर्तणुकीने पार पाडली. नियम म्हणजेच नियम—या तत्त्वावर ठाम राहणारे आदरणीय अण्णासाहेब कोणतीही तडजोड मानत नसत. कोणत्याही पदाचा, कुणाचाही प्रभाव त्यांच्यावर चालत नसे. कधी कुणावर अन्याय होऊ नये आणि पालिकेचे नुकसानही होऊ नये—ही त्यांची तडफदार भूमिका होती. आजही पाचोर्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक प्रेमाने म्हणतात, “अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन (लोहटारकर) कडक होते, पण नेहमी न्याय देणारे होते.आणि भ्रष्टाचाराचा रूपया सुद्धा त्यांनी कधी घेतला नाही” ही एकच ओळ त्यांच्यासोबतचे अधिकारी,कर्मचारी,आणि व्यापार पेठ ही त्यांच्या संपूर्ण सेवाकाळाचा सार सांगते. घरात मात्र त्यांचे व्यक्तित्व वेगळे होते—प्रेमळ, काळजीवाहू आणि मार्गदर्शक. शिस्त आणि संस्कार हा त्यांच्या शिकवणीचा गाभा होता. ते म्हणायचे, “शिस्त ही माणसाची संपत्ती आहे आणि स्वाभिमान हा त्याचा मुकुट.” त्यांच्या या तत्त्वांनी आम्हाला आयुष्यभरासाठी मानसिक बळ दिले. त्यांच्या कडक शब्दांमागेही प्रेमाचा, काळजीचा आणि योग्य मार्गावर नेण्याचा उद्देश दाटलेला असायचा. ३ डिसेंबर २००५ रोजी आदरणीय अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन (लोहटारकर) आमच्यातून निघून गेले, आणि त्या दिवसापासून घरातील प्रत्येक श्वासात त्यांची उणीव जाणवते. पण त्याचवेळी त्यांच्या आठवणींतील प्रकाश आमच्या जीवनाला दिशा दाखवतो. त्यांच्या शिकवणीमुळेच आज आम्ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अधिक कणखर उभे राहू शकतो. वीस वर्षे उलटली असली तरी त्यांचे मूल्य, त्यांची विचारसरणी, त्यांची कार्यनिष्ठा आणि त्यांची उपस्थिती आजही तितकीच स्पष्ट दिसते. फोटो पाहिला की आदर जागतो, त्यांचे शब्द आठवले की मन बळकट होते, त्यांनी दाखविलेला मार्ग आठवला की अडचणी नगण्य वाटतात. आज त्यांच्या २० व्या पुण्यस्मृतीनिमित्त आम्ही आदरणीय अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन (लोहटारकर) यांच्या प्रत्येक संघर्षाला, प्रत्येक कृतीला आणि त्यांच्या संपूर्ण जीवनाला नतमस्तक होत आहोत. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या त्या निर्भय देशभक्ताला, येरवडा कारावासाची शिक्षा धैर्याने सोसणाऱ्या वीराला, प्रशासनात निष्कलंक सेवा देणाऱ्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याला, आणि कुटुंबाच्या मनात संस्कार, धैर्य आणि शिस्त निर्माण करणाऱ्या पिता-पुरुषाला आज आम्ही विनम्र प्रणाम करतो. त्यांची शिकवण म्हणजे आमची संपत्ती, त्यांचा वारसा म्हणजे आमची शक्ती, आणि त्यांची स्मृती म्हणजे आमचा दिशा-दर्शक तारा. आदरणीय अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन (लोहटारकर) यांच्या २० व्या पुण्यस्मृतीनिमित्त आम्ही एवढेच म्हणतो— “आदरणीय अण्णासाहेब, आपण आम्हाला दिलेला संस्कारांचा वारसा आम्ही आयुष्यभर जतन करू. तुमच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी नम्र श्रद्धांजली.”. – शब्दांकन – सौ.शितल संदिप महाजन (स्नुषा)
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






