आर्थिक उलाढाल आणि EVM संशयामुळे पाचोरा न.पा.निवडणूक सट्टा बाजार ठप्प

0

Loading

पाचोरा – नगर पालिका निवडणुकीतील नगराध्यक्ष पद व दोन जागा वगळता बहुतेक प्रभागांमध्ये दि. २ डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले असून उर्वरित दोन जागांसाठी दि. २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सर्व जागांचे निकाल दि. २१ डिसेंबरला जाहीर होणार असल्याने पाचोरा शहरातील कट्या-कट्ट्यावर, राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर अंदाज

वर्तवण्याची चलती जोरात असून विविध गटांतील उमेदवारांची चर्चा तापली आहे. मात्र या सर्व चर्चांच्या केंद्रस्थानी असणारा निवडणूक सट्टा बाजार यंदा पूर्णपणे थंडावलेला दिसत आहे. मतदानाचा कल कोणत्या बाजूने आहे, कोण पुढे आणि कोण मागे, कोणत्या समाजगटांची मते निर्णायक ठरणार, कोणते प्रभाग झुकत आहेत—अशा सर्व प्रकारच्या चर्चांना उधाण आले असले तरी सट्टा बाजार मात्र अभूतपूर्व शांततेत आहे. सामान्यतः नगराध्यक्ष पद तसेच प्रभागनिहाय उमेदवारांवर सट्टा लावण्याची लगबग या काळात सुरू होत असते, परंतु यंदा परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसत आहे. निवडणुकीत आर्थिक उलाढालीचा जोर आणि EVM संदर्भातील अनिश्चितता ही या शांततेची दोन मोठी कारणे ठरत आहेत. यापूर्वीच्या निवडणुकांत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असत; उमेदवारांच्या भावात चढ-उतार दिसून येत; पण यंदा प्रभाग असो की त्यातील A, B, उमेदवार असो किंवा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असोत—कोणाचाही ‘भाव’ लागत नाही हे आश्चर्यकारक चित्र दिसत आहे. बाजारातील अनुभवी लोक देखील ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत गेले असून पहिल्यांदाच बाजारात एवढी चुप्पी जाणवत आहे. त्यात भर म्हणून मतदाना नंतर मतमोजणी लांबणीवर आणि EVM संदर्भातील उलट-सुलट विविध चर्चांनी वातावरण आणखी धुसर केले आहे. EVM मध्ये कोणत्या गटाला ‘ट्रेंड’ मिळाला, शेवटच्या तासांत मतदारांचा आर्थिक निकषावर कोणाचा कल बदलला का, काही बूथवर

अनपेक्षित मतदान झाले का—अशा चर्चा आणि अफवांमुळे प्रत्यक्ष निकालाचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. काही समर्थक आपल्या बाजूने वातावरण तयार करण्याचे दावे करत असले तरी त्याचा सट्टा बाजारावर किंचितही परिणाम झालेला नाही. सोशल मीडियावर अंदाजांचे वारे वहाताहेत, खाजगी सर्व्हे आणि बूथनिहाय आकड्यांचे दावे चर्चेत आहेत, परंतु प्रत्यक्ष व्यवहार मात्र पूर्णपणे ठप्प आहेत. कोणीही पैसे लावण्यास किंवा भाव देण्यास तयार नसल्याने बाजारात संपूर्ण शांतता पसरली आहे. पाचोऱ्याच्या निवडणूक इतिहासात प्रथमच अशी परिस्थिती पहायला मिळत असून सट्टा बाजाराचा हा ठप्पावलेला चेहरा स्थानिकांसाठीही कुतूहलाचा विषय ठरला आहे. २० डिसेंबरचे मतदान आणि त्यानंतर २१ डिसेंबरचे निकाल जवळ येत असताना बाजार पुन्हा हलतो का, की यंदा निवडणुकीत सट्टा बाजार पूर्णपणे कोलमडून जातो—याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत, आर्थिक उलाढाल आणि EVM संदर्भातील संभ्रमामुळे पाचोरा नगर पालिकाच काय? बहुतांशः न पा निवडणुकीतील सट्टा बाजार यंदा पूर्णपणे स्थब्ध झाल्याचे स्पष्ट दिसत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here