![]()
भडगाव : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात उद्योगवाढीचे नवे पर्व सुरू करण्यासाठी नगरदेवळा सुतगिरणीजवळ मंजूर झालेल्या एमआयडीसी प्रकल्पाला आता निर्णायक गती मिळत आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली 10 डिसेंबर रोजी दुपारी सव्वा चार वाजता नागपूर येथे विशेष अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे मूळ कारण म्हणजे पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे हॅट्रिक आमदार किशोरआप्पा पाटील यांनी उद्योगमंत्र्यांना दिलेले पत्र. एमआयडीसीसाठी आवश्यक मूलभूत सुविधा त्वरीत उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीची मंत्री उदय सामंत यांनी गांभीर्याने दखल घेत ही बैठक बोलावली आहे. नगरदेवळा परिसरातील सुमारे अडीचशे एकर विस्तृत क्षेत्रावर मंजूर झालेली एमआयडीसी ही आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची फलश्रुती आहे. मंजुरीनंतर या क्षेत्राचे प्लॉटिंग, आराखडा तयार करणे, औद्योगिक वापरासाठी जागा आरक्षित करणे अशी महत्त्वाची प्राथमिक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. परंतु या विशाल औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेल्या वीज, पाणी, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, सुरक्षा प्रणाली, प्रशासकीय इमारती अशा मूलभूत सुविधांची उभारणी अत्यावश्यक आहे. हाच मुद्दा निकाली काढण्यासाठी उद्योजकांना आकर्षित करणारी सुविधा निर्माण करण्यासाठी आमदार किशोरआप्पा पाटील यांनी मागील काही काळापासून सतत प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. या पाठपुराव्याचा एक परिणाम असा घडला की नगरपरिषद निवडणुकीत प्रचारासाठी पाचोर्यात आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सभेमधूनच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी थेट दूरध्वनीवर चर्चा केली होती. नगरदेवळा सुतगिरणी परिसरातील मंजूर एमआयडीसीला तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि उद्योग सुरू करण्यासाठी गती द्यावी, अशी स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर या प्रकल्पाला नवसंजीवनी मिळाली. या उच्चस्तरीय समन्वयामुळे आता मंत्रालय आणि एमआयडीसी विभाग दोघांकडूनही या प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर 10 डिसेंबरला नागपूर येथे होणारी बैठक अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या बैठकीत एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून प्रकल्पातील उर्वरित कामांचा आढावा घेऊन पुढील कामकाजाच्या प्राधान्यक्रमावर निर्णय घेतला जाणार आहे. नगरदेवळा एमआयडीसीत उद्योगांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या सुविधा किती प्रमाणात आणि किती टप्प्यांत उभारता येतील, यावरही महत्त्वाची चर्चा अपेक्षित आहे. या बैठकीनंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग येण्याची सर्वत्र अपेक्षा आहे. पाचोरा-भडगाव तालुक्यातील तरुण बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या कामाचा मुख्य केंद्रबिंदू असल्याचे वारंवार दिसून आले आहे. शेतीप्रधान भागात मोठ्या प्रमाणावर तरुणाई रोजगाराच्या शोधात आहे. त्या पार्श्वभूमीवर नगरदेवळा एमआयडीसी ही संधींचा नवा मार्ग उघडणारी ठरणार आहे. येथील औद्योगिक वसाहतीत विविध उत्पादन क्षेत्रातील कारखाने, प्रक्रिया उद्योग, सेवा उद्योग, वेअरहाऊसिंग, लॉजिस्टिक्स यांसारख्या बहुआयामी रोजगार संधी निर्माण होऊ शकतात. तसेच आसपासच्या गावांचा आर्थिक विकासही गतीमान होण्याची शक्यता आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्तक्षेपामुळे या प्रकल्पाला मिळालेली गती हे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या पुढाकाराचे यश आहे, असे स्थानिक उद्योजक आणि नागरिकही व्यक्त करत आहेत. एमआयडीसीचे काम प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होण्याची शक्यता असून पायाभूत सुविधांच्या विकासाला देखील चालना मिळणार आहे. “पाचोरा-भडगाव तालुक्यातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे, हा माझ्या कामाचा मुख्य हेतू आहे. नगरदेवळा येथे मंजूर झालेल्या एमआयडीसीत उद्योग उभारण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. नागपूर येथील होणारी बैठक या उद्दिष्टपूर्तीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.” असे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी ध्येय न्युजशी बोलतांना सांगितले
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.




