![]()
पाचोरा – तालुक्यातील कुरंगी–बांबरुड गटासाठी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील हडसन येथील रहिवासी आणि श्रीराम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक किरण प्रताप पाटील हे इच्छूक उमेदवार म्हणून पुढे येत असून गटात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. स्वच्छ प्रतिमा, सेवाभावी वृत्ती आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे किरण पाटील यांना सर्वसामान्य नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. किरण प्रताप पाटील यांनी सीआयएसएफमध्ये तब्बल 14 वर्षे देशसेवा केली असून या काळात त्यांनी कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि शिस्त या मूल्यांची जोपासना केली. देशसेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी बिल्डिंग मटेरियल व्यवसाय सुरू करून स्वतःच्या कष्टावर उद्योग उभा केला, मात्र व्यवसायापुरतेच न थांबता समाजकार्याची आवड त्यांनी कायम जपली. रात्री अपरात्री गरजू नागरिकांच्या मदतीला धावून जाणे, आजारपणात दवाखान्यात उपचारासाठी शक्य तेवढी आर्थिक मदत करणे, तसेच अचानक उद्भवलेल्या अडचणींमध्ये वेळ न पाहता मदतीचा हात देणे ही त्यांची ओळख ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. कुणालाही काही समस्या आल्यास सर्वसामान्य नागरिकांना थेट भेटून त्यांचे म्हणणे ऐकणे आणि तातडीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे ही त्यांची कार्यपद्धती लोकांना भावत आहे. त्यामुळेच निर्व्यनी, निष्कलंक, एकनिष्ठ अशी त्यांची प्रतिमा कुरंगी–बांबरुड गटात दृढ होत आहे. किरण पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांचे खंदे समर्थक असून राजकारणात पारदर्शकता आणि विकास हाच आपला केंद्रबिंदू असल्याचे ते ठामपणे सांगतात. जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आमदारकीची हवा डोक्यात शिरणे, वरिष्ठांशी सतत गैरसमज निर्माण होईल असा संपर्क ठेवणे किंवा वाळूचोरीसारख्या कोणत्याही बेकायदेशीर कामांमध्ये सहभागी होणे हे कधीच करणार नाही अशी महत्वपूर्ण चर्चा देखील किरण पाटील यांच्या बाबतीत जोरदार आहे. कायदेशीर मार्गाने आणि लोकहिताचा विचार करूनच विकास साधला जाईल, असा विश्वास ते व्यक्त करतात. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कुरंगी–बांबरुड गटातून शिवसेनेचे तिकीट किरण पाटील यांना मिळावे, अशी चर्चा व अपेक्षा पंचक्रोशीत सुरू असून स्वच्छ प्रतिमा व अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला आणि थेट जनतेशी जोडलेला किरण पाटील सारखा असाच उमेदवार मिळावा अशी भावना जनतेतुन व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोरआप्पा पाटील यांनी किरण पाटील यांना निवडणूक लढवण्याची संधी द्यावी, अशी मागणीही गटात जोर धरू लागली आहे. इच्छूक उमेदवार किरण पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा साहेबांनी मला जर शिवसेनेकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची संधी दिली तर मी त्या संधीचे सोनं करीन आणि ज्या पद्धतीने आमदार किशोरआप्पा पाटील विकासकामे करतात त्याच धर्तीवर त्यांच्या आदेशानुसार कुरंगी–बांबरुड गटाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांवर भर देत गटाचा समतोल व शाश्वत विकास करणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशसेवेची शिस्त, व्यवसायातील अनुभव आणि समाजकार्याची तळमळ या बळावर किरण प्रताप पाटील यांचा हा नवा राजकीय प्रवास कुरंगी–बांबरुड गटात आशेचा नवा किरण ठरत असून आगामी निवडणुकीत हा नवा चेहरा कोणती दिशा देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






