![]()
पाचोरा — कार्यसम्राट हॅट्रिक आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पुढाकारातून पाचोरा तालुक्यात महसूल प्रशासन अधिक सक्षम, गतिमान आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. तहसील कार्यालय पाचोरा येथे आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना लॅपटॉप आणि प्रिंटरचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण प्रशासनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळून नागरिकांना अधिक जलद व पारदर्शक सेवा देणे शक्य होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाला कार्यसम्राट हॅट्रिक आमदार किशोर आप्पा पाटील, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, निवासी नायब तहसीलदार विनोद कुमावत तसेच नायब तहसीलदार महसूल प्रमोद मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. मान्यवरांच्या हस्ते मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना एकूण २१ लॅपटॉप आणि ६१ प्रिंटरचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात निवासी नायब तहसीलदार विनोद कुमावत यांच्या प्रस्तावना व सूत्रसंचालनाने झाली. त्यांनी आपल्या प्रस्तावनेत या उपक्रमामागील उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, महसूल प्रशासन अधिक वेगवान व डिजिटल पद्धतीने कार्यरत राहण्यासाठी अशा आधुनिक साधनांची अत्यंत गरज आहे. शासनाच्या डिजिटल उपक्रमांना ग्रामीण पातळीवर प्रभावीपणे राबविण्यासाठी या सुविधांचा मोठा उपयोग होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यसम्राट हॅट्रिक आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, आजच्या बदलत्या काळात प्रशासनाने तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे अत्यावश्यक झाले आहे. मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी हे थेट नागरिकांशी संबंधित कामकाज करणारे घटक असल्यामुळे त्यांना आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. या लॅपटॉप व प्रिंटरच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे महसूल विषयक प्रश्न जलदगतीने सोडवता येतील, तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारकपणे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी सांगितले की, प्रशासनातील पारदर्शकता व कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. या उपकरणांच्या सहाय्याने विविध अहवाल, दाखले आणि नोंदी तत्काळ तयार करता येतील, ज्यामुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर सेवा मिळेल. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या सुविधांचा योग्य आणि परिणामकारक वापर करण्याचे आवाहन केले. तहसीलदार विजय बनसोडे यांनी देखील या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की, महसूल विभागाच्या कामकाजात मोठ्या प्रमाणावर कागदपत्रांची देवाणघेवाण होत असते. या नवीन साधनांमुळे काम अधिक सुलभ, वेगवान आणि अचूक होईल. प्रशासनाच्या कार्यपद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तहसील कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली होती. मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत, या सुविधांमुळे त्यांच्या दैनंदिन कामकाजात मोठी सुधारणा होणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी, सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार विनोद कुमावत यांनी कार्यसम्राट हॅट्रिक आमदार किशोर आप्पा पाटील यांचे विशेष आभार मानले. पाचोरा तालुक्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत हा उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. एकूणच, कार्यसम्राट हॅट्रिक आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा तालुक्यातील महसूल प्रशासन अधिक आधुनिक, सक्षम आणि नागरिकाभिमुख होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले असून, भविष्यात अशा उपक्रमांमुळे प्रशासनाची कार्यक्षमता आणखी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
































