आजपासून ‘संसार मांडो’ आंदोलनाला प्रारंभ; वाणेगाव दफनभूमी वाद तापला, प्रशासनाच्या विलंबामुळे संताप उसळला

0

Loading

पाचोरा –  तालुक्यातील वाणेगाव येथे मागासवर्गीय समाजाच्या दफनभूमीवरील अतिक्रमण आणि अंत्ययात्रेला झालेल्या अडथळ्याच्या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या या प्रकारावर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून जोर धरत आहे. संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात प्रशासनाने केलेला विलंब, तसेच अतिक्रमण हटविण्याबाबत अद्याप ठोस पावले न उचलल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत चालली आहे. ११ मार्च २०२५ रोजी घडलेल्या घटनेत बौद्ध समाजातील एका वृद्ध महिलेचे निधन झाल्यानंतर तिच्या अंत्यविधीसाठी दफनभूमीकडे जात असताना काही अतिक्रमणधारक समाजकंटकांनी अडथळा निर्माण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अंत्यविधीसाठी आणलेली जेसीबी मशीन परत पाठविण्यात आली, तसेच शाब्दिक चकमकी आणि धक्काबुक्कीच्या प्रकारांमुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. या घटनेमुळे गावात सामाजिक तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर समता सैनिक दल आणि दफनभूमी मुक्ती आंदोलन समिती वाणेगाव यांच्या वतीने ३० मार्च २०२६ पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे एकूण आठ मागण्या मांडल्या असून त्यापैकी पाच मागण्या मान्य करण्यात आल्या असल्या तरी पोलीस प्रशासनाशी संबंधित तीन महत्त्वाच्या मागण्या अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेषतः अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी ठामपणे पुढे रेटली आहे. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात दफनभूमीवरील अतिक्रमण तातडीने हटवून त्या ठिकाणी कंपाऊंड व सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी स्थानिक समाजबांधवांना पोलीस संरक्षण देण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशीही भूमिका त्यांनी मांडली आहे. दरम्यान, यापूर्वी प्रशासनाने दफनभूमी व मावळण जागेवरील अतिक्रमण हटविण्याबाबत लेखी आश्वासन दिले होते. ग्रामपंचायत वाणेगाव यांनी या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव आणि पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याशी पत्रव्यवहार केल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते. ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांच्या सूचनेनुसार पर्यायी जागेवर अंत्यसंस्कार करण्यात आले, मात्र मूळ प्रश्न अद्याप कायम असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आज दि. ६ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता जारगाव चौफुली येथून आंदोलनकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चामध्ये महिला, पुरुष, लहान मुले, तसेच आपल्या दैनंदिन संसारातील साहित्य, पाळीव जनावरे, ढोर-ढाकरे आणि बैलगाड्या घेऊन सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा मोर्चा केवळ निदर्शनापुरता न राहता, न्याय मिळेपर्यंत आंदोलनस्थळीच कुटुंबासह ठिय्या मांडण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या अनोख्या ‘संसार मांडो’ आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा आणि आपल्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आंदोलनकर्त्यांच्या मते, हा लढा केवळ एका दफनभूमीपुरता मर्यादित नसून सामाजिक न्याय, समानता आणि मानवी हक्कांसाठीचा आहे. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे की, प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास पुढील काळात आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यात येईल. त्यामुळे या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने योग्य तो निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, पालकमंत्री, स्थानिक आमदार किशोर आप्पा पाटील, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच संबंधित प्रशासनाला पाठविण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे राज्यस्तरावरही लक्ष वेधले गेले असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. या आंदोलनात अभिमान बाविस्कर, ज्ञानेश्वर सावळे, अजय संसारे, गंगाराम तेली, सुकलाल पवार, शिवाजी निकम, बालू सोनवणे, अरुण बळवंत, अनिल सोनवणे, राजेंद्र शिंगारे, रतन सोनवणे, संभाजी सोनवणे, जिजाबाई संसारे, जनाबाई बागुल, कमलबाई कोतकर, रुख्माबाई चव्हाण, गयाबाई बाविस्कर, नंदाबाई बागुल, करुणा सोनवणे आदी सहभागी झाले आहेत. दरम्यान, या संवेदनशील प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून सामाजिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीने ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here