![]()
पाचोरा – शहरातील आर्थिक क्षेत्रात विश्वासार्हतेची ओळख निर्माण करणाऱ्या वर्धमान पतसंस्थेने अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपल्या कार्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पार करत नव्या ठिकाणी स्थलांतरण केले. श्री महावीर शॉपिंग सेंटर, जैन पाठशाळा शेजारी, जामनेर रोड, पाचोरा येथे नव्या कार्यालयाचे उद्घाटन धार्मिक विधी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या सोहळ्यामुळे संस्थेच्या सेवाविस्ताराला नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त झाली. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने कलश पूजनाने करण्यात आली. संस्थेचे जेष्ठ सभासद राधेश्याम दायमा यांच्या हस्ते विधी संपन्न झाला. त्यानंतर नवकार महामंत्राचा सामूहिक जप करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आणि कार्यक्रमाला पावित्र्याची छटा लाभली. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन जीवन भाऊ जैन यांच्या नेतृत्वाखाली अनेक मान्यवर उपस्थित होते. व्हाईस चेअरमन दिनेशशेठ बोथरा ,कार्यकारी संचालक प्रफुल्लशेठ बांठीया किशोरभाऊ बांठिया, अजय थेपडे सर, मनोज भाई सिसोदिया, रितेश भाई ललवाणी, धर्मेंद्र धाडीवाल, शैलेश येवले, दीपक भाई मुथा, शैलेश खंडेलवाल, संदेश बडोला यांच्यासह संस्थेचे व्यवस्थापक हेमराज बाफना व संपूर्ण स्टाफ यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच शॉपिंग सेंटरमधील व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संस्थेच्या नव्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण सोहळ्यात एक नाव अत्यंत आदराने आणि भावनिक स्वरात उच्चारले गेले, ते म्हणजे स्वर्गीय भाकचंदशेठ बोथरा,स्वर्गीय राजूशेठ बडोला (PC ग्रुप).कांतीलालशेठ श्रीश्रीमाळ ,पप्पूसेठ बांठिया हे वर्धमान पतसंस्थेची स्थापना, तिची उभारणी, नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध कामकाजाची पायाभरणी या सर्वामागे त्यांची दूरदृष्टी, जिद्द आणि अथक परिश्रम होते. समाजातील विविध घटकांना एकत्र आणत त्यांनी या संस्थेला केवळ आर्थिक संस्था न ठेवता विश्वासाचे केंद्र बनवले.राजूशेठ बडोला हे संस्थापक चेअरमन होते ते आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी संस्थेच्या वाढीसाठी महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळली आणि प्रत्येक टप्प्यावर संस्थेला दिशा देत राहिले. त्यांच्या कार्याची आणि योगदानाची आठवण करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले, कारण त्यांनी घालून दिलेल्या मूल्यांवरच आज ही संस्था भक्कमपणे उभी आहे. अक्षय तृतीया हा सण नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी नव्या कार्यालयात प्रवेश केल्याने संस्थेच्या आगामी वाटचालीत सातत्याने प्रगती आणि यश लाभेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. वर्धमान पतसंस्थेची स्थापना 2002 साली समाज बांधव, मित्र, कंपनी स्नेही आणि व्यापारी हितचिंतक यांच्या संयुक्त प्रयत्नातून झाली. स्थापनेपासूनच संस्थेने पारदर्शकता, प्रामाणिक व्यवहार आणि विश्वास या तत्त्वांवर आपले कार्य उभे केले आहे. विशेष म्हणजे, स्थापनेपासून आजपर्यंत संचालक मंडळाची निवडणूक घेण्याची वेळ कधीच आली नाही, ही बाब संस्थेतील परस्पर विश्वास आणि एकात्मतेचे उत्तम उदाहरण ठरते. संस्थेने सभासदांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे. दरवर्षी सभासदांना लाभांश देण्याची परंपरा सातत्याने जोपासली जात आहे. त्याचबरोबर गुणवंत पाल्यांचा सत्कार करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे सामाजिक कार्यही संस्था नियमितपणे पार पाडत आहे. नवीन ठिकाणी स्थलांतरणामुळे संस्थेच्या कामकाजात अधिक सुसूत्रता येणार असून ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत. व्यापारी भागात कार्यालय असल्याने व्यवहार अधिक सोपे आणि वेगवान होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एकूणच, वर्धमान पतसंस्थेचे हे स्थलांतरण केवळ स्थानांतर नसून प्रगतीचा आणि विश्वासाचा नवा टप्पा आहे. स्वर्गीय राजूशेठ बडोला यांनी रोवलेल्या मूल्यांची परंपरा पुढे नेत संस्था आगामी काळात अधिक व्यापक सेवा देत नवे यश संपादन करेल, असा आशावाद या सोहळ्याच्या निमित्ताने व्यक्त होत आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
































