सीमेवर मुलगा देशासाठी लढतोय… आणि पाचोऱ्यात समाज त्याच्या वडिलांसाठी उभा राहिला; रक्तदानातून उमटली जिवंत देशभक्ती

0

Loading

पाचोरा — देशाच्या सीमारेषेवर उभा राहून प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेची जबाबदारी खांद्यावर घेतलेला जवान जेव्हा आपल्या कुटुंबापासून दूर असतो, तेव्हा त्याच्या मागे उभा राहणारा समाजच त्याचे खरे बळ ठरतो. अशाच एका संवेदनशील प्रसंगात पाचोरा शहराने माणुसकीचे तेजस्वी उदाहरण घालून दिले आहे. बीएसएफमध्ये कार्यरत असलेले सागर दिलीप शेळके हे सध्या देशरक्षणाच्या कर्तव्यात तल्लीन असताना त्यांच्या वडिलांवर अचानक गंभीर शस्त्रक्रियेची वेळ आली आणि या कठीण क्षणी समाजाने एकदिलाने पुढे येत मदतीचा हात दिला. दिलीप शिवाजी शेळके यांना पाचोरा येथील निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉ.चारूदत्त खानोरे यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला, मात्र त्यासाठी O Positive रक्ताची तातडीची आवश्यकता निर्माण झाली. कुटुंबीयांसमोर वेळेचे आणि परिस्थितीचे मोठे आव्हान उभे ठाकले होते. एका बाजूला मुलगा देशाच्या सीमेवर खंबीरपणे उभा राहून राष्ट्रसेवा करत होता, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या वडिलांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा प्रसंगी समाजाची साथ मिळणे हीच खरी आशेची किरण ठरली. या संपूर्ण घटनेला वळण मिळाले तेव्हा,कॉपी पेस्ट न करणाऱ्या जेव्हा ध्येय न्युजने अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत ही बातमी समाजापर्यंत पोहोचवली. बातमी प्रसिद्ध होताच पाचोरा शहरात एक वेगळाच भावनिक प्रतिसाद उमटू लागला. केवळ पुरुषच नव्हे, तर महिलाही मोठ्या संख्येने रक्तदानासाठी पुढे सरसावल्या. जणू काही “सेवा हीच खरी पूजा” या भावनेने प्रत्येक नागरिक प्रेरित झाला होता. “It happens only in India.” ही भावना पुन्हा एकदा प्रत्यक्षात उतरलेली पाहायला मिळाली. स्वामी विवेकानंद यांनी सांगितले होते, “ज्यांना इतरांसाठी जगता येते, तेच खरे जिवंत असतात,” आणि महात्मा गांधींच्या “स्वतःला शोधायचे असेल तर इतरांच्या सेवेत स्वतःला हरवून टाका” या विचारांची प्रचिती या प्रसंगातून स्पष्टपणे आली. समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनीही “मानवतेची सेवा हीच खरी ईश्वरसेवा” असे प्रतिपादन केले होते. या सर्व महान विचारांची जाणीव पाचोरा शहरातील नागरिकांनी आपल्या कृतीतून करून दिली. या मदतीच्या कार्यात विशेष उल्लेख करावा लागेल तो फातेमा मुर्तुजा नगारिया आणि जितेश पंजवाणी यांचा. बोहरी समाजाची महिला भगिनी म्हणून फातेमा मुर्तुजा नगारिया यांनी दाखवलेला पुढाकार हा स्त्रीशक्तीचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभावी नमुना ठरला. मुर्तुजा हार्डवेअरचे संचालक मुर्तुजा नगारिया यांच्या पत्नी फातेमा नगारिया, ज्या व्यवसायाने लेखापाल आहेत, त्यांनी सर्वप्रथम पुढाकार घेत रक्तदान केले. एकाच वेळी गृहिणी, व्यावसायिक आणि सामाजिक जाणीव असलेली नागरिक म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. त्यांच्यासोबतच मोबाईल व्यावसायिक जितेश पंजवाणी यांनीही तातडीने प्रतिसाद देत रक्तदान केले. भारत-पाकिस्तान फाळणीची सर्वाधिक झळ सोसूनही राखेतून फिनिक्स पक्ष्यासारखी पुन्हा उभारी घेत विकासाच्या दिशेने झेपावलेल्या सिंधी समाजाचे प्रतिनिधित्व करणारा हा युवक म्हणून जितुभाईंचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरतो. कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी किंवा अपेक्षा न ठेवता, केवळ मानवतेच्या भावनेतून त्यांनी केलेले हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या या कृतीमुळे केवळ एका व्यक्तीचा जीव वाचवण्यास मदत झाली नाही, तर समाजातील एकोपा आणि सहकार्याची भावना अधिक दृढ झाली. या संपूर्ण उपक्रमामागे रोहित महाजन, आर्मी ग्रुप खान्देशचे संस्थापक अध्यक्ष यांची भूमिका देखील मोलाची ठरली. त्यांनी ध्येय न्युज मार्फत नागरिकांना भावनिक आवाहन करत सांगितले की, “आपल्या जवानाच्या कुटुंबावर आलेले संकट दूर करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. रक्तदानासारखे पवित्र कार्य केवळ एखाद्या व्यक्तीचे जीवन वाचवत नाही, तर समाजात मानवतेचा संदेशही पोहोचवते.” त्यांच्या या आवाहनाला मिळालेला प्रतिसाद हा समाजाच्या संवेदनशीलतेचा पुरावा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसोबत ज्या प्रकारे विश्वास आणि बांधिलकीचे नाते जपले, त्याच परंपरेचा वारसा आजही आपल्या समाजात जिवंत आहे, हे या प्रसंगातून अधोरेखित झाले. देश हितासाठी लढणाऱ्या जवानाच्या कुटुंबीयांची काळजी घेणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले. या घटनेने पाचोरा शहराला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. येथे केवळ शब्दांनी नव्हे, तर कृतीतून देशभक्ती व्यक्त केली जाते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. संकटाच्या काळात कोणतीही अपेक्षा न ठेवता मदतीला धावून जाणे, हीच खरी भारतीय संस्कृती आहे आणि याच संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याचे कार्य पाचोरा शहराने केले आहे. आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जीवनशैलीत अशा प्रकारच्या घटना समाजाला एक नवा दृष्टिकोन देतात. त्या आपल्याला आठवण करून देतात की, माणुसकी अजूनही जिवंत आहे आणि योग्य वेळी ती अधिक तेजस्वीपणे प्रकट होते. एका जवानाच्या कुटुंबासाठी पुढे आलेल्या या मदतीने केवळ एका घराला आधार दिला नाही, तर संपूर्ण समाजाला एकत्र बांधण्याचे कार्य केले आहे. अशा या प्रेरणादायी घटनेतून प्रत्येकाने एक धडा घेण्याची गरज आहे. देशासाठी लढणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे अनेक मार्ग असले तरी त्यांच्या कुटुंबाच्या अडचणीच्या वेळी प्रत्यक्ष मदतीला धावून जाणे, हीच खरी राष्ट्रसेवा आहे. पाचोरा शहराने हे दाखवून दिले आहे की, देशभक्ती केवळ घोषणांमध्ये नसते किंवा पुरस्कार विकणे व पुरस्कार विकत घेणे यातून सिद्ध होत नाही . तर ती अशा कृतीतून सिद्ध करावी लागते.आणि हाच खरा मानवतेचा पुरस्कार असतो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here