परधाडेच्या सुपुत्राची भारतीय सैन्यात भरारी; मेजरवरून लेफ्टनंट कर्नल पदावर पदोन्नती, पंचक्रोशीत अभिमानाची लाट

Loading

पाचोरा – तालुक्यातील परधाडे या ग्रामीण मातीतून घडलेले आणि भारतीय सैन्य दलात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे लेफ्टनंट कर्नल विनय सुरेश पाटील यांची मेजर पदावरून लेफ्टनंट कर्नल पदावर पदोन्नती झाल्याने संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. १ मे २०२६ रोजी अधिकृतरीत्या ही पदोन्नती जाहीर झाली असून, श्रीनगर येथे झालेल्या विशेष समारंभात कमांडिंग ऑफिसर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना नविन पदाची रँक प्रदान करण्यात आली भारतीय सैन्य दलातील ही जबाबदारीची आणि प्रतिष्ठेची उंच भरारी मानली जात असून, ग्रामीण भागातील तरुणांसाठी हा प्रेरणादायी प्रवास ठरत आहे. परधाडे गावातील सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या विनय पाटील यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि राष्ट्रसेवेच्या ध्यासाच्या बळावर भारतीय सैन्य दलात मोठे स्थान निर्माण केले आहे. २९ मे १९८५ रोजी जन्मलेल्या विनय पाटील यांचे प्राथमिक शिक्षण ग्राम विकास विद्यालय, पिंपळगाव हरेश्वर येथे झाले. ग्रामीण वातावरणात वाढताना शिस्त, मेहनत आणि देशभक्तीचे संस्कार त्यांच्यावर बालपणापासून झाले. पुढे त्यांनी Maharashtra Institute of Hotel and Tourism Management मधून शिक्षण पूर्ण केले. हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातून करिअरची दिशा मिळाल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने त्यांना इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली. परदेशात एक वर्ष काम करत असतानाच आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी करण्याची तीव्र भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्याच प्रेरणेतून भारतीय सैन्य दलात अधिकारी बनण्याचा निर्धार त्यांनी केला. देशसेवेच्या या ध्यासातून त्यांनी IMA मध्ये सैन्य प्रशिक्षण पूर्ण केले आणि २०११ मध्ये भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती मिळवली. पहिली पोस्टिंग कर्नाटकातील बेळगाव येथे झाली. त्यानंतर त्यांनी विविध संवेदनशील आणि कठीण भागात उल्लेखनीय सेवा बजावली. कर्नाटक, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि पुन्हा जम्मू-काश्मीर अशा विविध भागांत त्यांनी कर्तव्य निभावताना अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. देशाच्या सीमावर्ती भागात सेवा देताना कठोर परिस्थितीतही त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांचा परिचय करून दिला. सैन्यातील त्यांच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत गेला. २०११ मध्ये लेफ्टनंट म्हणून सुरू झालेला प्रवास २०१५ मध्ये कॅप्टन, २०१८ मध्ये मेजर आणि आता २०२६ मध्ये लेफ्टनंट कर्नल या उच्च पदापर्यंत पोहोचला आहे. प्रत्येक पदोन्नती ही त्यांच्या कार्यक्षमतेची, प्रामाणिक सेवाभावाची आणि नेतृत्वक्षमतेची साक्ष मानली जात आहे. सध्या त्यांची पोस्टिंग काश्मीरमध्ये असून, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या भागात ते सेवा बजावत आहेत. सेवाकाळात त्यांनी अनेक उल्लेखनीय कामगिरी बजावल्या आहेत. उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना २०१६ मध्ये प्रशस्तीपत्र देण्यात आले होते. त्यानंतर २०२४ मध्ये दिल्ली येथे त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. देशसेवेत दिलेल्या योगदानाबद्दल आणि प्रभावी कामगिरीमुळे राष्ट्रपती भवनात संपूर्ण टीमला निमंत्रित करण्यात आले होते, ही त्यांच्यासाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली. विविध ठिकाणी जबाबदारी सांभाळताना त्यांनी नेतृत्व, निर्णयक्षमता आणि समन्वय या गुणांच्या जोरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला. लेफ्टनंट कर्नल विनय पाटील यांच्या यशामागे कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे ते आवर्जून सांगतात. आई प्रभावती सुरेश पाटील आणि वडील सुरेश चिंधु पाटील यांनी दिलेले संस्कार,भाऊ गोपाल सुरेश पाटील व वहीनी अंजली गोपाल पाटील यांच्या खंबीर साथ….. पाठिंबा आणि पत्नी शितल विनय पाटील यांची खंबीर साथ यामुळे हा प्रवास अधिक सक्षमपणे पूर्ण करता आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांचे पुत्र वंशील पाटील आणि विआंश पाटील हे देखील आपल्या वडिलांच्या या यशामुळे प्रेरित झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबातील आणखी एक चुलत भाऊ चारुदत्त सुदाम पाटील हे देखील भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत आहे. आणि लवकरच त्यांची देखील कर्नल पदावर पदोन्नती होणार आहे एकाच कुटुंबातील दोन भाऊ सैन्यात उच्च पदावर सेवा बजावत असल्याने परिसरात त्यांचे विशेष कौतुक होत आहे. सैन्य दलातील जबाबदाऱ्या सांभाळतानाच समाजाशी असलेली त्यांची नाळ आजही घट्ट जोडलेली आहे. सुट्टीसाठी गावाकडे आल्यानंतर ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, शाळांना भेटी देतात आणि तरुणांना सैन्य, स्पर्धा परीक्षा तसेच विविध क्षेत्रांतील संधींबाबत मार्गदर्शन करतात. ग्रामीण विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि क्लास वन अधिकारी बनावे, यासाठी ते सातत्याने प्रेरणा देत असतात. त्यांच्या संवादातून अनेक विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. पदोन्नतीनंतर भावना व्यक्त करताना लेफ्टनंट कर्नल विनय पाटील यांनी सांगितले की, आई-वडिलांचे आशीर्वाद, भगवान श्रीकृष्णाची कृपा आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा यामुळे हा प्रवास यशस्वी झाला. पदोन्नती म्हणजे केवळ सन्मान नसून जबाबदारी अधिक वाढल्याची जाणीव असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही अधिक चांगले काम करून देशसेवा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच समाजातील मित्रपरिवार, नातेवाईक, शिक्षकवृंद आणि शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. परधाडे सारख्या ग्रामीण भागातून भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत पोहोचलेले विनय पाटील हे आज अनेक युवकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. कठोर परिश्रम, देशप्रेम आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नसते, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here