इन कॅमेरा परीक्षेतही पिटीसी संस्थेचा दबदबा कायम; जयेश भोई पाचोरा-भडगाव तालुक्यात प्रथम, विविध विद्यालयांचा घवघवीत निकाल

Loading

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था अर्थात पिटीसीने यंदाच्या एसएससी परीक्षेत पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवत संपूर्ण पाचोरा-भडगाव परिसरात यशाची नवी उंची गाठली आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची खरी कसोटी पाहणाऱ्या आणि अत्यंत शिस्तबद्ध इन कॅमेरा पद्धतीने पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेत पिटीसी संस्थेच्या विविध विद्यालयांनी उल्लेखनीय यश मिळवत संस्थेच्या शैक्षणिक परंपरेला अधिक बळकटी दिली आहे. विशेष म्हणजे भडगाव येथील सौ.सु.गी.पाटील माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी जयेश संभाजी भोई याने ९८.२० टक्के गुण मिळवत पाचोरा-भडगाव तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून संस्थेच्या गुणवत्तेचा झेंडा संपूर्ण जिल्ह्यात उंचावला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धात्मक वातावरण आणि सक्षम मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा ध्यास घेत कार्यरत असलेल्या पिटीसी संस्थेने यंदाही उत्कृष्ट निकालांची परंपरा कायम ठेवली. संस्थेच्या विविध शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत उज्ज्वल यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची दूरदृष्टी लाभल्यामुळे हे यश अधिक उठून दिसत आहे. पाचोरा येथील श्री.गो.से.हायस्कूलचा निकाल ८७.२० टक्के लागला असून ४६१ विद्यार्थ्यांपैकी ४०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्राविण्य श्रेणीत तब्बल ८१ विद्यार्थ्यांनी यश मिळवले. ललित बळवंत आंबेकर आणि हर्षल शैलेंद्र चौधरी यांनी ९४.६ टक्के गुणांसह संयुक्त प्रथम क्रमांक मिळवत विद्यालयाचा गौरव वाढवला, तर मोहित गणेश पाटील ९२ टक्के, स्वरूप अशोक राठोड ९१ टक्के आणि खुशी मनोहर सोनवणे ९० टक्के गुणांसह चमकदार यश संपादन केले. सौ.सु.गी.पाटील माध्यमिक विद्यालय, भडगावचा निकाल ८३.८३ टक्के लागला असून १६७ विद्यार्थ्यांपैकी १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ३५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले. जयेश संभाजी भोई याने ९८.२० टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. गौरव संदीप महाजन ९५ टक्के, आदित्य उमाकांत शिंपी ९१ टक्के, नंदिनी नारायण पाटील ८९ टक्के आणि तेजस संदीप पाटील ८६.६० टक्के गुणांसह यशस्वी ठरले. बांबरुड (राणीचे) येथील डॉ. राम मनोहर लोहीया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ५०.४१ टक्के लागला. कुणाल योगेश डिके याने ७७.५० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला, तर दर्शन अशोक पाटील ७७.४० आणि चंचल बापू शिंदे ७३.६० टक्के गुणांसह अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर राहिले. खेडगाव नंदीचे येथील श्री.एच.बी.सांघवी हायस्कूलचा निकाल ७६.४७ टक्के लागला असून मयुरी अनिल बागुल हिने ८७.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. शहबाज अमीन मन्यार ७९ टक्के आणि वेदश्री सुनील बाविस्कर ७७.४० टक्के गुणांसह पुढील क्रमांकावर राहिले. वाडी येथील श्री.शां.न.जैन माध्यमिक विद्यालयाचा निकाल ७३.३३ टक्के लागला. राजवीर अमर काकडे याने ८४.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. हर्षल संभाजी पाटील ७६.४० आणि रोहित प्रकाश पाटील ७२.८० टक्के गुणांसह अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर राहिले. माहेजी येथील श्री.सु.वि.माध्यमिक विद्यालयाचा निकाल ७३.६८ टक्के लागला. कृष्ण संजय कदम आणि भूमिका अनिल भगत यांनी ७७.६० टक्के गुणांसह संयुक्त प्रथम क्रमांक मिळवला. विनीत संजय शिरसाठ ७४.६० आणि कोसर शरीफ हरदास ६५ टक्के गुणांसह यशस्वी ठरले. कुऱ्हाड खुर्द येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाने ८१.३९ टक्के निकालाची नोंद केली. वैभव सुभाष देवरे ८२.४०, हर्षदा संभाजी वंजारी ७९.८० आणि विवेक प्रमोद बोरसे ७९.६० टक्के गुणांसह विद्यालयात अव्वल ठरले. दहीगाव संत येथील श्रीमती च.ही.राजपूत माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८६.६६ टक्के लागला. भाग्यश्री संजय कोळी हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर भाग्यश्री अनिल चौधरी आणि काजल तुळशीराम कोळी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. भोजे चिंचपूरे येथील महात्मा फुले हायस्कूलचा निकालही ८६.६६ टक्के लागला. भाविका डीगंबर पाटील हिने ८८.४० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. जागृती धनराज जाधव ८३.८० आणि जीविका सुनील जाधव ८२ टक्के गुणांसह पुढील क्रमांकावर राहिल्या. सातगाव डोंगरी येथील पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालयाचा निकाल ५९.२५ टक्के लागला. राहुल हिरमल बारेला ६८.६०, सलोनी फरीद तडवी ६७.२० आणि अनिल झाका बारेला ६५.८० टक्के गुणांसह विद्यालयात अव्वल ठरले. या सर्व यशामागे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे नियोजन, गुणवत्तेला दिलेले प्राधान्य आणि शिक्षकांवर ठेवलेला विश्वास महत्त्वाचा ठरल्याची भावना व्यक्त होत आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भाऊसो. दिलीप ओंकार वाघ, चेअरमन नानासो. संजय ओंकार वाघ, मानस सचिव दादासो. ॲड. महेश देशमुख, व्हॉइस चेअरमन नानासो. व्ही. टी. जोशी यांच्या नेतृत्वाखाली संस्था ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पालकांचा वाढता विश्वास यामुळे पिटीसी संस्थेचा शैक्षणिक लौकिक अधिक भक्कम होत असल्याचे चित्र यंदाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. संस्थेच्या सर्व स्थानिक समित्यांचे चेअरमन, पदाधिकारी, संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे अभिनंदन केले असून भविष्यातही पिटीसी संस्था ग्रामीण शिक्षण क्षेत्रात अशीच गुणवत्तेची नवी उंची गाठत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here