![]()
पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा यांनी यंदाच्या एसएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्तापूर्ण परंपरा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि पालकांच्या पाठबळाच्या जोरावर विद्यालयाने ८७.२० टक्के इतका भक्कम निकाल नोंदविला असून संपूर्ण पाचोरा शहरात आणि तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यालयातील शिक्षीका श्रीमती संगीता लासुरकर यांचा भाचा ललित बळवंत आंबेकर याने तब्बल ९४.६० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला असून त्याच्या यशाची सर्वत्र कौतुकाने चर्चा होत आहे. यंदा विद्यालयातून एकूण ४६१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यसह घवघवीत यश मिळविले आहे. या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या स्पर्धेत यश मिळविले नाही तर मेहनत, शिस्त आणि सातत्य या मूल्यांचेही उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक ललित बळवंत आंबेकर याने ९४.६० टक्के गुणांसह पटकावला. द्वितीय क्रमांक हर्षल शैलेंद्र चौधरी याने ९३.४० टक्के गुण मिळवत प्राप्त केला तर मोहित गणेश पाटील याने ९२ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. स्वरूप अशोक राठोड याने ९१ टक्के गुणांसह चतुर्थ क्रमांक मिळविला तर खुशी मनोहर सोनवणे हिने ९० टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांनी विद्यालयाचे नाव उंचावत आपल्या पालकांच्या कष्टांचे चीज केले आहे. निकाल जाहीर होताच विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर शुभेच्छांचा वर्षाव केला. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भाऊसो. दिलीप ओंकार वाघ, चेअरमन नानासो. संजय ओंकार वाघ, मानस सचिव दादासो. ॲड. महेश देशमुख, व्हॉइस चेअरमन नानासो. व्ही. टी. जोशी, शालेय समिती चेअरमन दादासो. खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन अण्णासो. वासुदेव महाजन यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्याध्यापक एन. आर. पाटील (ठाकरे), उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, पर्यवेक्षिका ए. आर. गोहिल, पर्यवेक्षक आर. बी. बांठिया, पर्यवेक्षक महेश कौंडिण्य, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, यंदाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी श्री. गो. से. हायस्कूल प्रशासनाने एक आगळावेगळा उपक्रम राबविला. विद्यालयातील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा व त्यांच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देत त्यांचे अभिनंदन करण्यात आल्याने पालकांमध्येही आनंद आणि अभिमानाची भावना व्यक्त होत होती. या उपक्रमामुळे शाळा आणि पालक यांच्यातील आत्मीय नाते अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे, उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या घरी भेट देत त्यांना पुष्पगुच्छ, पेढे देऊन सत्कार केला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि पालकांच्या त्यागाचे कौतुक करत त्यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या. “यश ही केवळ गुणांची गोष्ट नसून सातत्य, मेहनत आणि योग्य संस्कार यांचे फलित असते,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या सत्कार प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक प्रीतम पाटील, आर. बी. कोळी तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या घरातील वातावरणही आनंदाने भारावलेले दिसून आले. आपल्या मुलांच्या यशाबद्दल बोलताना अनेक पालक भावूक झाले होते. विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन केलेला सन्मान हा त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी आणि पालकांशी जपलेले आत्मीय नाते यामुळे श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा हे केवळ शिक्षण देणारे विद्यालय न राहता विद्यार्थ्यांच्या यशस्वी भविष्याची भक्कम पायाभरणी करणारे प्रेरणास्थान ठरत असल्याचे चित्र या निकालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
































