स्वामीभक्ती, सेवा आणि समर्पणाचा अद्वितीय संगम : राजेश काळे परिवाराच्या पुढाकारातून पाचोरा येथे संपन्न झाला स्वामी समर्थ पादुका पालखी सोहळा

0

Loading

पाचोरा : अनंतकोटी ब्रह्मांडनायक अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज यांच्या पवित्र पादुका पालखीचे पाचोरा शहरात आगमन होताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. गेल्या २१ वर्षांपासून अखंड श्रद्धा, निस्सीम भक्ती आणि सेवाभाव जपत राजेश काळे व त्यांच्या परिवाराच्या पुढाकारातून हा धार्मिक सोहळा पाचोरा शहरात मोठ्या उत्साहात आयोजित केला जात आहे. यावर्षीही हजारो स्वामीभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आलेल्या पादुका परिक्रमा उपक्रमामागील उद्देश म्हणजे अक्कलकोट येथे प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेणे शक्य नसलेल्या वृद्ध, महिला, आजारी तसेच दूरवर राहणाऱ्या स्वामीभक्तांना त्यांच्या गावातच स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घडविणे हा आहे. या पवित्र कार्याला पाचोरा शहरात गेली दोन दशके राजेश काळे व त्यांचा परिवार तन, मन आणि धनाने योगदान देत असून त्यामुळे हा सोहळा शहरातील एक महत्त्वाचा आध्यात्मिक उत्सव म्हणून ओळखला जातो. सायंकाळी शहराच्या प्रवेशद्वारावर पादुका पालखी दाखल होताच राजेश काळे व त्यांच्या धर्मपत्नी सौ. अश्विनी राजेश काळे यांनी परिवारासह पादुकांचे विधिवत पूजन करून स्वागत केले. जय जय स्वामी समर्थच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद, भजनी मंडळांचे भक्तिगायन आणि स्वामी नामस्मरणाच्या वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले. या संपूर्ण स्वागत सोहळ्याचे नियोजन, व्यवस्थापन आणि भाविकांच्या सेवेसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची जबाबदारी काळे परिवाराने अत्यंत समर्पित भावनेने सांभाळली. त्यानंतर पादुका पालखीची भव्य मिरवणूक शहरातून स्वामी लॉन्सकडे मार्गस्थ झाली. मार्गभर भाविकांनी फुलांची उधळण करून पादुकांचे दर्शन घेतले. शहरातील अनेक नागरिकांनी आपल्या घरासमोर रांगोळ्या काढून तसेच दीपप्रज्वलन करून पालखीचे स्वागत केले. मिरवणुकीदरम्यान सर्वत्र स्वामी समर्थांच्या जयघोषांनी वातावरण भारावून गेले होते. स्वामी लॉन्स येथे पालखीचे आगमन झाल्यानंतर धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. या प्रसंगी सिद्धी विनोद कुलकर्णी आणि धनश्री विनोद कुलकर्णी या भगिनींनी आपल्या मधुर आवाजात स्वामी समर्थांची भजने, अभंग आणि भक्तिगीते सादर केली. त्यांच्या गायनामुळे उपस्थित भाविकांना भक्तिरसाचा अनोखा अनुभव लाभला. त्यानंतर स्वामी समर्थांच्या पवित्र पादुकांचे पूजन, आरती आणि नामस्मरण करण्यात आले. दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. हजारो भक्तांनी शांततेने रांगेत उभे राहून पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी स्वामीभक्तांच्या सेवेसाठी आणि दर्शन व्यवस्थेसाठी राजेश काळे, सौ. अश्विनी काळे आणि त्यांचा संपूर्ण परिवार स्वतः उपस्थित राहून प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष देत होता. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, दर्शनासाठी शिस्तबद्ध नियोजन तसेच विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. रात्री उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसाद व्यवस्था, भक्तांच्या स्वागताची तयारी, दर्शन व्यवस्थापन, निवास व्यवस्था आणि संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन यामध्ये राजेश काळे परिवाराचे योगदान विशेषत्वाने अधोरेखित झाले. गेल्या अनेक वर्षांपासून स्वामी समर्थांविषयी असलेली त्यांची अखंड श्रद्धा आणि सेवाभाव यामुळे हा सोहळा वर्षानुवर्षे अधिक भव्य आणि लोकाभिमुख होत असल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली. या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विनोद कुलकर्णी, दत्ता सोनार, योगेश जहागिरदार, निलेश सोनार, अश्विन वाघ, स्वप्नील सोनार, प्रताप पाटील, गजू सोनार, राम जळतकर, संजय पाटील, किशोर पुराणिक, विजू मानकरे, सागर तांबोळे, प्रशांत सोनार, बंटी पाटील, प्रकाश पाटील, गौरव घोडके, प्रमोद तांबटकर, कमलेश सोनवणे, मोहित दत्तू, विशाल पाटील, प्राची आमले, सुवर्णाताई पाटील, सविताताई आमले, करिष्मा पवार, खुशी पाटील, संदीप सिसोदिया, संतोष पाटील सर, अतुल सिरसमणी, अमित वाणी, अनिल सोनार, अंकित अग्रवाल, संकेत तांबोळी, वेदांग राजेश काळे, आदित्य अग्रवाल, अजितेश मांडोळे, निखिल खंडेलवाल, वरुण पर्सनानी, रितेश गिरवाणी, प्रवेश जैन, सागर पाटील, यश पुरषणानी, रामा पाटील (भातखंडे), भूषण पाटील, बाळू दलाल, सुधीर पाटील, फारुख खाटीक, ययाती सोनार, मयूर सोनार, जयप्रकाश जाधव, सचिन देशपांडे, रवी कुलकर्णी, सांबा पाटील, सुमित सोनार, राजीव चोरडिया, भरत प्रजापत, प्रशांत देव, वरुण साक्ते, पवन महाजन, यश टेकाम, अमोल ठाकूर, जितू काळे, यश पवार, भिकन पाटील, मनीष भोई, ऋषिकेश ढोले, सुजित धपारे, धनराज पाटील, संदीप शाहापूरकर, शशी वाणी ,
दर्शन येवले, निंबा वाघ, उमेश एरंडे, संजय पडोळ, नदीम शेख, आदित्य सोमवंशी
यांचे सहकार्य लाभले. तसेच पाचोरा शहरातील लक्ष्मी माता वारकरी संस्था परिवार तसेच त्यांचे प्रमुख योगेश महाराज मातोश्री सौ सुनीता योगेश माऊली, सर्व पत्रकार बांधव ,पाचोरा पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचारी, सोनार गल्ली मित्र मंडळ आणि स्वामी लॉन्स व्यवस्थापन यांनीही मोलाची भूमिका बजावली. रात्री पालखीचा मुक्काम स्वामी लॉन्स येथे करण्यात आला. पहाटे काळे परिवाराच्या वतीने स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करण्यात आला. वेदमंत्र, नामस्मरण आणि आरतीच्या मंगल वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. अभिषेकानंतर भाविकांनी पुन्हा एकदा पादुकांचे दर्शन घेतले आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद प्राप्त केला. त्यानंतर पालखीने पुढील प्रवासासाठी मार्गक्रमण केले. गेली २१ वर्षे अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून स्वामीभक्ती, सेवाभाव आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक बनली आहे. या संपूर्ण सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरलेले राजेश काळे, सौ. अश्विनी राजेश काळे आणि त्यांचा परिवार यांनी जपलेली श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाची परंपरा पाचोरा शहरासाठी प्रेरणादायी ठरत आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने आणि काळे परिवाराच्या समर्पित प्रयत्नांमुळे हजारो भाविकांना दरवर्षी आपल्या गावातच अक्कलकोटच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभत असून ही परंपरा भविष्यातही अशीच अखंड सुरू राहावी, अशी भावना उपस्थित स्वामीभक्तांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here