![]()
जळगाव : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर महायुतीतील अंतर्गत संघर्षाला पूर्णविराम मिळाला असून शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानंतर उमेदवारी मागे घेतल्याने भाजपचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर (नंदू) महाजन यांच्या विजयाचा मार्ग मोठ्या प्रमाणात मोकळा झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील गणितांपेक्षा महायुतीतील अंतर्गत संबंध, कार्यकर्त्यांच्या भावना, स्थानिक नेतृत्वाचा सन्मान आणि राजकीय वास्तव यांची चर्चा अधिक रंगू लागली आहे. या संपूर्ण घडामोडीत पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी वेळोवेळी व्यक्त केलेली नाराजी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. विशेष म्हणजे त्यांची नाराजी स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांबाबत नसून भाजपमधील काही स्थानिक नेत्यांच्या बंडखोर भूमिकेबाबत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. लोकसभा, विधानसभा, विधान परिषद किंवा केंद्रातील निवडणुकांमध्ये महायुतीचा उमेदवार असेल तर आपण आणि आपले पदाधिकारी पूर्ण ताकदीने महायुती धर्माचे पालन करतो, अशी भूमिका किशोरआप्पा पाटील यांनी अनेकदा स्पष्ट केली आहे. मात्र जेव्हा त्यांच्या मतदारसंघातील निवडणुकांचा विषय येतो, तेव्हा भाजपमधील काही नेते आणि कार्यकर्ते विरोधी भूमिका घेतात किंवा बंडखोरी करतात, अशी त्यांची खंत राहिली आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे अशा बंडखोरांवर निवडणुकीपुरती कारवाई केली जाते; मात्र निवडणूक संपल्यानंतर पुन्हा त्यांनाच राजकीय महत्त्व, विविध पदे किंवा जबाबदाऱ्या दिल्या जातात, अशी भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत असते. त्यामुळे निष्ठेने महायुतीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार होणे आवश्यक असल्याचे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आणखी एक राजकीय वास्तव चर्चेत आले आहे. 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पाचोरा तालुक्यातील लोहारा जिल्हा परिषद गटाचा समावेश जामनेर विधानसभा मतदारसंघात करण्यात आला. म्हणजेच हा भाग प्रत्यक्षात नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे. गेल्या अनेक वर्षांत गिरीशभाऊ महाजन यांनी पाचोरा तालुक्याबाबत विशेष आत्मीयता आणि राजकीय जवळीक दाखविल्याची चर्चा सातत्याने होत असते. मात्र या प्रेमाचे प्रत्यक्ष निवडणूक निकालांमध्ये कितपत रूपांतर झाले, याचाही विचार होणे गरजेचे असल्याचे जाणकारांचे मत आहे. 2009 नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तीन निवडणुका पार पडल्या. मात्र स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या लोहारा जिल्हा परिषद गटातून भाजपचा सदस्य निवडून आणण्यात पक्षाला यश मिळाले नाही. एवढेच नव्हे तर पाचोरा तालुक्यात ज्या राजकीय फळीवर गिरीशभाऊ महाजन यांचा विशेष विश्वास असल्याचे मानले जाते, त्या फळीला देखील लोहारा गटासह परिसरात भाजपसाठी एकतर्फी वातावरण निर्माण करता आले नाही, अशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात होत असते. परिणामी, पाचोरा तालुक्यातील इतर जिल्हा परिषद गटांचा विषय बाजूला ठेवला तरी स्वतःच्या विधानसभा मतदारसंघातील लोहारा गटात भाजपची निर्विवाद ताकद उभी करण्यात आलेले अपयश हे देखील राजकीय विश्लेषणाचा महत्त्वाचा भाग ठरत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, एखाद्या नेत्याची ताकद केवळ राज्यस्तरीय प्रभावावर नव्हे तर त्याच्या स्वतःच्या प्रभावक्षेत्रातील संघटनात्मक यशावरही मोजली जाते. त्यामुळे लोहारा जिल्हा परिषद गटाचे वास्तव आणि तेथील निवडणुकांचे निकाल यांचाही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. विशेषतः पाचोरा तालुक्यातील राजकीय समीकरणांचे मूल्यांकन करताना स्थानिक जनाधार, संघटनात्मक क्षमता आणि मतदारांचा कल यांचा स्वतंत्रपणे अभ्यास करावा लागेल. दरम्यान, रेश्मा काळे यांनी वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशाचा सन्मान करत उमेदवारी मागे घेतल्याने महायुतीतील शिस्त आणि एकजूट अधोरेखित झाली असली तरी या निवडणुकीने महायुतीसमोरील अनेक अंतर्गत प्रश्न पुन्हा समोर आणले आहेत. त्यामध्ये घटक पक्षांमधील परस्पर विश्वास, स्थानिक नेतृत्वाचा सन्मान, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, भाजपमधील बंडखोरीबाबतची भूमिका आणि स्थानिक पातळीवरील संघटनात्मक वास्तव यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पाचोरा-भडगाव नगरपालिकेसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमदार किशोरआप्पा पाटील यांचे प्रभावी वर्चस्व असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांच्या भावना, त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या अपेक्षा याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. विधान परिषद निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र असले तरी या निवडणुकीने उत्तर महाराष्ट्रातील महायुतीच्या अंतर्गत राजकारणाचे अनेक पैलू समोर आणले आहेत. त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही आमदार किशोरआप्पा पाटील यांनी उपस्थित केलेले प्रश्न, लोहारा जिल्हा परिषद गटाचे वास्तव आणि स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे यांची चर्चा आगामी काळातही कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
































