![]()
पाचोरा, जि. जळगाव : काही दिवसांपूर्वी जादा दराने स्टॅम्प विक्री केल्याच्या प्रकरणात एका स्टॅम्प विक्रेत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केल्याची घटना घडल्यानंतर पाचोरा शहरातील मुद्रांक विक्री व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील काही स्टॅम्प विक्रेते केवळ स्टॅम्प किंवा बॉन्ड विक्री करण्याऐवजी संबंधित दस्तऐवज त्यांच्याकडूनच लिहून घेण्याची सक्ती करत असल्याची तक्रार नागरिकांकडून पुढे येत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रतिज्ञापत्र, करारपत्र, हमीपत्र, भाडेकरार किंवा इतर कायदेशीर कामांसाठी आवश्यक असलेले स्टॅम्प खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर काही ठिकाणी ग्राहकांना सरळ स्टॅम्प दिले जात नाहीत. त्याऐवजी संबंधित बॉन्ड किंवा कागदपत्र त्याच ठिकाणी तयार करून घेण्याचा आग्रह धरला जातो. काही ठिकाणी तर “आमच्याकडूनच बॉन्ड लिहून घेतल्यासच स्टॅम्प मिळेल” अशी भूमिका घेतली जात असल्याची तक्रार आहे. स्टॅम्प विक्री आणि दस्तऐवज लेखन या स्वतंत्र बाबी आहेत. नागरिकांना त्यांच्या पसंतीच्या वकील, दस्तलेखक किंवा जाणकार व्यक्तीकडून कागदपत्र तयार करून घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे स्टॅम्प खरेदीसाठी कोणत्याही व्यक्तीवर विशिष्ट ठिकाणीच दस्तऐवज तयार करून घेण्याची सक्ती करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. याशिवाय शहरातील काही स्टॅम्प विक्री केंद्रांवर उपलब्ध स्टॅम्प साठ्याची माहिती दर्शविणारे फलक नसल्याच्याही तक्रारी आहेत. कोणत्या मूल्याचे स्टॅम्प उपलब्ध आहेत, त्यांचा साठा किती आहे आणि कोणते मुद्रांक विक्रीसाठी शिल्लक आहेत याची माहिती ग्राहकांना मिळणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी अशी माहिती प्रदर्शित होत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन अनावश्यक गैरसोय होत आहे. पाचोरा शहरात दररोज मोठ्या प्रमाणावर बँक व्यवहार, शासकीय कामकाज, प्रतिज्ञापत्रे आणि विविध कायदेशीर प्रक्रियांसाठी स्टॅम्पची खरेदी-विक्री केली जाते. त्यामुळे या व्यवस्थेतील कोणतीही अनियमितता थेट सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम करणारी ठरू शकते. विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना अशा प्रकारांमुळे अतिरिक्त वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकारांची गंभीर दखल घेऊन नोंदणी व मुद्रांक विभागाने पाचोरा शहरातील सर्व स्टॅम्प विक्रेत्यांची विशेष तपासणी करावी, त्यांच्या विक्री नोंदी, उपलब्ध साठा आणि व्यवहार पद्धतीची पडताळणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच स्टॅम्प विक्रीसाठी कोणत्याही प्रकारची सक्ती, ग्राहकांची अडवणूक किंवा नियमबाह्य अटी लादल्या जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. पाचोरा, जि. जळगाव येथील मुद्रांक विक्री व्यवस्थेत पारदर्शकता आणि ग्राहकाभिमुखता कायम ठेवण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.






ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
































