![]()
पाचोरा–भडगाव रोड परिसरात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या मोठ्या साठ्यावर अन्न भेसळ विभागाने धडक कारवाई करत गुटखा माफियांच्या बेकायदेशीर जाळ्याला मोठा धक्का दिला आहे. या कारवाईदरम्यान अंदाजे ६ ते ७ पोते गुटखा, सुगंधी तंबाखू, पान मसाला तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे एक फोर व्हीलर वाहन जप्त करण्यात आले असून संबंधित मालकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
राज्यात विविध प्रकारच्या सुगंधी तंबाखू, गुटखा व पान मसाल्याच्या विक्रीवर निर्बंध असतानाही अशा पदार्थांचा काळाबाजार थांबण्याचे नाव घेत नसल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पाचोरा शहर, ग्रामीण भाग तसेच इतर तालुक्यांमध्ये या अवैध मालाचा पुरवठा होत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे ही कारवाई केवळ जप्तीपुरती मर्यादित नसून अवैध व्यापाराच्या खोलवर रुजलेल्या साखळीवर प्रशासनाने दिलेला स्पष्ट इशारा मानला जात आहे.
दरम्यान, पाचोरा शहर व तालुक्यासह इतर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विमल गुटखा पुरवठ्याशी संबंधित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करण – अर्जुन बाप बेटे की जोडीबाबत सातत्याने चर्चा होत असतानाही त्यांच्याकडे विशेष दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. या संदर्भातील वस्तुस्थिती काय आहे, याचा निष्पक्ष आणि सखोल तपास होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गुटख्याचा अवैध व्यापार हा केवळ महसूल किंवा कायद्याचा विषय नसून तो थेट जनतेच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. युवकांमध्ये वाढते व्यसन, तोंडाच्या कर्करोगासह विविध आजारांचे वाढते प्रमाण आणि सामाजिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता अशा पदार्थांवर कठोर नियंत्रण आवश्यक असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
स्थानिक स्तरावर मिळणाऱ्या माहितीनुसार रेल्वे तसेच इतर वाहनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुटखा पाचोरा परिसरात दाखल होत असल्याची चर्चा आहे. वाहतुकीसाठी विविध मार्गांचा वापर करून हा माल बाजारपेठेत पोहोचवला जात असल्याने तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानके, प्रमुख महामार्ग, गोदामे आणि संशयित साठवण केंद्रांवर अधिक बारीक लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे अशा प्रकारची धडक कारवाई आणि वाढलेली प्रशासकीय दक्षता ही महाराष्ट्राच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांच्यासारखी कठोर, शिस्तप्रिय आणि परिणामकारक अधिकारी व्यक्ती कार्यरत असल्यामुळे दिसून येत असल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करीत आहेत. अनेक वर्षांपासून अवैध व्यवसायांना अभय देणारी, हप्त्यांच्या व्यवहारांवर आधारलेली आणि कारवाईला अडथळा ठरणारी कथित साखळी आता मोडकळीस येऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी विविध विभागांतील यंत्रणा अधिक सक्रिय होत असून अधिकारी आणि कर्मचारीही ॲक्शन मोडमध्ये येऊन नियमांची प्रभावी अंमलबजावणी करत असल्याचे प्रथमच ठळकपणे जाणवत असल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू आहे.
अन्न भेसळ विभाग आणि पोलिसांनी केलेली ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद मानली जात असली तरी अवैध व्यापाराच्या मुळापर्यंत पोहोचून संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. केवळ जप्ती आणि गुन्हे दाखल करण्यापुरती मर्यादित न राहता या व्यवसायाला आर्थिक पाठबळ देणारे, वाहतूक करणारे आणि वितरण व्यवस्था चालविणारे घटकही समोर आणले गेल्यास गुटखा माफियांच्या बेकायदेशीर साम्राज्यावर प्रभावी आळा बसू शकतो. जनतेच्या आरोग्याचे रक्षण, कायद्याचा धाक आणि प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू राहणे ही काळाची गरज बनली आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
































