Home Dhyeya News Special पाचोरा रेल्वे स्थानकावर पाण्याची उधळपट्टी; सफाईसाठी आधुनिक यंत्रणा कधी येणार?

पाचोरा रेल्वे स्थानकावर पाण्याची उधळपट्टी; सफाईसाठी आधुनिक यंत्रणा कधी येणार?

0
400

Loading

पाचोरा : रेल्वे स्थानक परिसरातील स्वच्छता ही प्रवाशांच्या सुरक्षिततेसह रेल्वे प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे प्रतीक मानली जाते. मात्र पाचोरा रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म स्वच्छ करण्यासाठी अद्यापही नळीने मोठ्या प्रमाणात पाणी सोडून धुण्याची पद्धत वापरली जात असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असल्याचे चित्र समोर येत आहे. एका बाजूला पाणी बचतीबाबत जनजागृती केली जात असताना दुसऱ्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय होत असल्याने प्रवासी आणि नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या रेल्वे स्थानकावरील सफाईचे काम संबंधित ठेकेदारामार्फत केले जाते. सफाईचा ठेका मिळाल्यानंतरही प्लॅटफॉर्म स्वच्छतेसाठी आवश्यक असलेली आधुनिक यांत्रिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याची चर्चा आहे. परिणामी नळीच्या पाण्याने धुलाई करण्यावरच भर दिला जात असून त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा आरोप होत आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज असताना ही पद्धत कितपत योग्य आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. आज अनेक रेल्वे स्थानकांवर उच्च दाबाच्या जेट मशीन, फ्लोअर स्क्रबर, वॉटर-सेव्हिंग क्लिनिंग सिस्टीम आणि आधुनिक यांत्रिक सफाई उपकरणांचा वापर केला जातो. त्यामुळे कमी पाण्यात अधिक प्रभावी स्वच्छता होते, मनुष्यबळाची बचत होते आणि वेळही कमी लागतो. मात्र पाचोरा रेल्वे स्थानकावर अशी अत्यावश्यक यंत्रणा का उपलब्ध करून देण्यात आलेली नाही, याबाबत विविध स्तरांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित ठेकेदाराने सफाईचा ठेका स्वीकारूनही आवश्यक मशिनरी उपलब्ध न करणे, तसेच याकडे संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होणे, हा केवळ प्रशासकीय हलगर्जीपणाचा विषय आहे की यामागे अन्य काही कारणे आहेत, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. “डोळेझाक नेमकी कोणासाठी आणि कोणाकडून केली जात आहे?” हा प्रश्नही आता अधिक ठळकपणे विचारला जात आहे. रेल्वे स्थानकावर दररोज हजारो प्रवाशांची ये-जा होत असते. त्यामुळे स्वच्छतेच्या दर्जात कोणतीही तडजोड होऊ नये, अशी सर्वांची अपेक्षा असते. आधुनिक यंत्रणेमुळे प्लॅटफॉर्म अधिक स्वच्छ राहतील, पाण्याची बचत होईल आणि पर्यावरणपूरक पद्धतीने देखभाल करणे शक्य होईल. याशिवाय कामाची गुणवत्ता वाढून रेल्वे प्रशासनाची प्रतिमाही अधिक उंचावू शकते. पाणी ही दिवसेंदिवस मौल्यवान होत चाललेली नैसर्गिक संपत्ती आहे. त्यामुळे तिचा प्रत्येक थेंब जपणे ही केवळ नागरिकांचीच नव्हे तर सार्वजनिक यंत्रणांचीही जबाबदारी आहे. पाचोरा रेल्वे स्थानकावरील सफाईसाठी आधुनिक मशिनरीची तातडीने उपलब्धता करून पाण्याचा अपव्यय रोखावा, सफाई व्यवस्थेचे आधुनिकीकरण करावे आणि संबंधित ठेकेदाराच्या कामकाजाची वस्तुनिष्ठ तपासणी करावी, अशी मागणी आता प्रवासी, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!